पश्चिम महाराष्ट्रात महायुतीचे वर्चस्व !
१० पैकी ९ जागा जिंकून महायुतीचा कोल्हापूर जिल्ह्यात मोठा विजय !
कोल्हापूर – ७६ टक्के असे सर्वाधिक मतदान झालेल्या कोल्हापूर जिल्ह्याकडे सर्वांचे लक्ष होते. १० पैकी ९ जागा जिंकून महायुतीने जिल्ह्यात वर्चस्व कायम ठेवले आहे. कोल्हापूर शहर मतदारसंघात शिवसेनेचे श्री. राजेश क्षीरसागर, करवीर मतदारसंघातून शिवसेनेचे श्री. चंद्रदीप नरके आणि शिवसेनेचे प्रकाश आबीटकर तिसर्यांदा विजयी झाले आहेत.
श्री. राजेश क्षीरसागर हे सातत्याने हिंदुत्वाच्या सूत्रावर प्रखर भूमिका मांडतात. त्यामुळे त्यांनी मिळवलेला विजय लक्षणीय आहे. कोल्हापूर शहर उत्तर मतदारसंघात भाजपचे अमल महाडिक (१७ सहस्र २०० मतांनी विजयी), इचलकरंजी येथून भाजपचे श्री. राहुल आवाडे, जयसिंगपूर येथून अपक्ष आणि भाजपचा पाठिंबा असलेले डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर (२८ सहस्र मताधिक्य) यांनी दुसर्यांदा, शाहूवाडी येथून जनसुराज्य शक्ती पक्षाचे श्री. विनय कोरे, हातकणंगले मतदारसंघात भाजपचा पाठिंबा असलेले डॉ. अशोक माने (४६ सहस्र ३९७ मतांचे मताधिक्य) विजयी झाले. कागल येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ आणि चंदगड येथून अपक्ष शिवाजी पाटील विजयी झाले आहेत. जिल्ह्यात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचे वर्चस्व पूर्णपणे मोडून काढण्यास भाजप यशस्वी झाला असून जिल्ह्यात काँग्रेसचा एकही उमेदवार जिंकलेला नाही.
सोलापूर येथे ५ जागांवर भाजप विजयी !
सोलापूर – सोलापूर जिल्ह्यात महायुतीला संमिश्र यश मिळाले असून ११ पैकी ५ जागांवर भाजप विजयी झाला आहे. उत्तर मतदारसंघात भाजपचे विजयकुमार देशमुख सलग पाचव्यांदा, तर दक्षिण मतदारसंघात भाजपचे सुभाष देशमुख हे तिसर्यांदा विजयी झाले आहेत. मध्य मतदारसंघात नवीन चेहरा असलेले भाजपचे तरुण उमेदवार देवेंद्र कोठे यांनी ‘एम्.आय्.एम्.’चे शाब्दी यांचा चुरशीच्या लढतीत पराभव केला. पंढरपूर मतदारसंघात विद्यमान आमदार समाधान आवताडे, माळशिरस येथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उत्तम जानकर आणि अक्कलकोट येथून सचिन कल्याणशेट्टी दुसर्यांदा विजयी झाले आहेत. सांगोला येथून ‘पीझंट अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया’चे डॉ. बाबासाहेब देशमुख, बार्शी येथून ठाकरे गटाचे दिलीप सोपल, तर माहोळ येथून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राजू खरे विजयी झाले.
सातारा येथे ६ ठिकाणी महायुतीचा विजय !
सातारा – सातारा जिल्ह्यात ८ पैकी ४ जागांवर भाजप, २ जागांवर शिवसेना आणि २ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. सातारा शहर येथून भाजपचे शिवेंद्रसिंहराजे भोसले हे सलग सहाव्यांदा विजयी झालेले आहेत. वाई येथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मकरंद पाटील आणि फलटण येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन पाटील विजयी झाले आहेत. शिवसेनेचे शंभूराज देसाई हे तिसर्यांदा आणि कोरेगाव येथून शिवसेनेचे महेश शिंदे विजयी झाले आहेत. माण-खटाव येथून भाजचे जयकुमार गोरे विजयी झाले. कराड येथे राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे सहा वेळा आमदार असलेले बाळासाहेब पाटील यांना भाजपचे मनोज घोरपडे यांनी पराभूत केले. राज्यात सर्वांत लक्षवेधी असणार्या लढतीत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा भाजपचे डॉ. अतुल भोसले यांनी पराभव केला.
सांगलीत ५ जागांवर भाजप विजयी !
सांगली – जिल्ह्यात ५ जागांवर भाजप, ३ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, तर एका जागेवर शिवसेना विजयी झाली आहे. यात सांगलीतून भाजपचे श्री. सुधीर गाडगीळ तिसर्यांदा, मिरज येथून डॉ. सुरेश खाडे हे चौथ्यांदा, शिराळा मतदारसंघात भाजपचे श्री. सत्यजित देशमुख, तर जत येथून गोपीचंद पडळकर विजयी झाले आहेत. तासगाव येथून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आणि तत्कालीन गृहमंत्री रा.रा. आबा पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील, तसेच ईश्वरपूर येथून जयंत पाटील विजयी झाले आहेत. विटा येथून सुहास बाबर हे शिवसेनेच्या तिकीटावर पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. जिल्ह्यात पलूस-कडेगाव मतदार सघात काँग्रेसचे विश्वजीत कदम यांच्या रूपाने केवळ एकमेव जागा निवडून आली आहे.
आवाडे घराण्यातील तिसरी पिढी राजकारणात !
इचलकरंजी – मतदारसंघात आमदार प्रकाश आवाडे यांचा मुलगा राहुल आवाडे हे प्रथमच भाजपकडून विजयी झाले आहेत. ते काँग्रेसचे माजी खासदार कलाप्पाणा आवाडे यांचे नातू आहेत. त्यामुळे राहुल आवाडे यांच्या रूपाने आवाडे घराण्यातील तिसरी पिढी राजकारणात राजकारणात सक्रिय झाली आहे.
पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस ९ आणि भाजप ९ जागांवर विजयी !
पुणे – पुणे जिल्ह्यांतील २१ विधानसभा मतदारसंघांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस ९ जागांवर, भाजप ९ जागांवर, शरदचंद्र पवार गट, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि अपक्ष यांचा १ उमेदवार विजयी झाला आहे. पुणेकरांचे लक्ष लागून राहिलेल्या कसब्यातून भाजपचे हेमंत रासने, छत्रपती शिवाजीनगरमधून भाजपचे सिद्धार्थ शिरोळे, कोथरूडमधून दुसर्यांदा भाजपचे चंद्रकांत पाटील, पुणे कॉन्टोन्मेंटमधून भाजपचे सुनील कांबळे यांनी विजय खेचून आणला. खडकवासलातून सलग ४ वेळा भाजपचे आमदार भीमराव तापकीर, पर्वतीतून तिसर्यांदा भाजपच्या माधुरी मिसाळ, वडगावशेरीतून शरदचंद्र पवार गटाचे बापूसाहेब पाठारे, हडपसरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार चेतन तुपे यांनी त्यांची जागा राखली. भोर येथे राष्ट्रीय काँग्रेसचे विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांचा पराभव करून राष्ट्रवादी काँग्रेसचे शंकर मांडेकर विजयी झाले. इंदापुरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय भरणे यांनी तिसर्यांदा विजय मिळवत हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला. पुरंदरातून मैत्रीपूर्ण लढतीमध्ये शिवसेनेचे विजय शिवतारे, मावळातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील शेळके विजयी, खेड-आळंदीतून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बाबाजी काळे, जुन्नरमधून अपक्ष सिद्धार्थ सोनवणे, शिरूर राष्ट्रवादीच्या माऊली कटके, दौंडमधून भाजपचे राहुल कुल, पिंपरीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे, चिंचवडमधून भाजपचे शंकर जगताप यांनी विजयी परंपरा राखली, तर भोसरीतून भाजपचे महेश लांडगे हे दुसर्यांदा निवडून आले.
बारामतीकरांचे ठरलंय तसे केले !
आमचे ठरलंय, ‘सुप्रियाताई लोकसभेला आणि विधानसभेला दादा’ हे बारामतीकरांनी सिद्ध केले. बारामती विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांना बहुमताने विजयी केले.
परळी (बीड)- परळी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धनंजय मुंडे, बीड शहर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संदीप क्षीरसागर, गेवराई येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह पंडित, आष्टी मतदारसंघात भाजपचे सुरेश धस, केज येथून भाजपच्या सौ. नमिता मुंदडा, तर माजलगाव येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश सोळंके विजयी झाले आहेत.
लातूर येथून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा काँग्रेसचे उमेदवार धीरज देशमुख पराभूत झाले आहेत.
नगर जिल्ह्यात ५ भाजप, ५ काँग्रेस, तर १ जागेवर शिवसेना विजयी !
नगर – नगर जिल्ह्यात ५ जागांवर भाजप, ५ जागांवर काँग्रेस, तर १ जागेवर शिवसेना विजयी झाली आहे. कर्जत जामखेड येथे शरदचंद्र पवार गटाचे रोहित पवार विजयी झाले.
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर अशा सर्वच जिल्ह्यांमध्ये महायुतीने वर्चस्व राखले
- महायुती ४४
- अन्य – ४
- मविआ १०
- एकूण जागा – ५८