गोव्याचे पर्यावरण तथा कायदामंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी मडगाव येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलतांना विद्यार्थ्यांना अमली पदार्थांपासून दूर रहाण्याचे आवाहन केले. त्यानंतर अमली पदार्थांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या ‘सनबर्न’ या ‘इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक’ (इ.डी.एम्.)विषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना मंत्र्यांनी ‘अमली पदार्थ सर्वत्र उपलब्ध असतात’, असे विधान केले. राज्यातील युवा पिढीभोवती अमली पदार्थांचा विळखा वाढत असल्याचे हे द्योतक आहे. आलेक्स सिक्वेरा हे गोव्यातील एक ज्येष्ठ लोकप्रतिनिधी आहेत. तळागळातील परिस्थितीशी त्यांचे जवळचे नाते आहे. गोव्यातील शहरी भाग सोडाच गावांमध्येही अमली पदार्थांची विक्री आणि सेवन यांच्या घटना उघडकीस आल्या आहेत. ही सत्यस्थिती आहे आणि ती नाकारता येत नाही. त्यामुळे मंत्र्यांचे विधान गांभीर्याने घेऊन त्यावर विचारविनिमय करणे आणि गोव्याची युवा पिढी मद्यपान अन् अमली पदार्थ यांच्या आहारी जाण्यापूर्वी त्यावर नियंत्रण ठेवणे, हे गोव्याच्या दृष्टीने हिताचे ठरेल.
१. गोव्यात अतीमद्यप्राशन किंवा अमली पदार्थ यांमुळे तरुण मृत्यूमुखी पडण्याच्या घटनांमध्ये वाढ
गोव्यातील अनेक कुटुंबांतील कर्तेसवरते पुरुष आणि तरुण मुले अतीमद्यप्राशन केल्याने किंवा अमली पदार्थांच्या आहारी गेल्याने कुटुंबियांना दु:खाच्या खाईत लोटून ऐन तारुण्यात मृत्यूमुखी पडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
अ. नुकतीच मायणा-कुडतरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारूच्या नशेत पतीने पत्नीला सुर्याने भोसकण्याची घटना घडली आहे. गोवा सरकारने नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात अतीमद्यप्राशनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची सूची सादर केली होती. यामध्ये गेल्या ५ वर्षांत १५५ जणांचा मृत्यू झाला असून दारूच्या आहारी गेलेल्यांची संख्या ८ सहस्र ६८६ नोंद झाल्याची माहिती लिखित स्वरूपात देण्यात आली होती. दारूच्या नशेत किंवा अमली पदार्थांच्या नशेत गाडी चालवल्याने झालेल्या अपघातांचीही माहिती पुढीलप्रमाणे देण्यात आली होती.
आ. गोव्यात अपघात होऊन मृत्यूमुखी पडणार्यांची संख्याही देशाच्या सरासरीपेक्षा अधिक आहे. गोव्यात मागील ३ वर्षांत अपघाती मृत्यू झालेल्यांची अधिकृत माहिती पुढे दिली आहे.
इ. विधानसभेत सरकारने दिलेल्या एका उत्तरानुसार गेल्या साडेपाच वर्षांच्या कालावधीत, म्हणजेच वर्ष २०१९ ते १५ जून २०२४ पर्यंत राज्यभरात अमली पदार्थ व्यवहाराविषयीचे एकूण ८५२ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. वयोगटानुसार अमली पदार्थ गुन्हेगारांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
ही सरकारने पुरवलेली अधिकृत आकडेवारी आहे. खरे पहाता ही माहिती, म्हणजे हिमनगाचे टोक आहे. गोव्याच्या कानाकोपर्यातून समोर येणार्या अमली पदार्थांविषयीच्या घटनांची नोंद घेता युवकांमध्ये अमली पदार्थांचा विळखा वाढत चालला असल्याचे दिसून येते.
२. जनहिताच्या दृष्टीने सरकारकडून अपेक्षित उपाययोजना
अ. अमली पदार्थांच्या दुष्परिणामाविषयी जनजागृती करणे
गोवा राज्य अमली पदार्थमुक्त करण्यासाठी शक्य त्या सर्व उपाययोजना केल्या जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत स्पष्ट केले होते. त्यात जनजागृती कार्यक्रम, जिल्हास्तरीय बैठका, अमली पदार्थांचा धोका रोखण्यासाठी इतर राज्यांशी समन्वय इत्यादी कार्यक्रम राबवले जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे अमली पदार्थांची तस्करी आणि इतर अवैध मार्गाने होणारा व्यवसाय रोखण्यासाठी पोलिसांचे अमली पदार्थविरोधी पथक सर्व शक्तीनिशी कार्यरत आहे. असे असले, तरीही अमली पदार्थांचा विळखा वाढतच असल्याचे दिसत आहे.
आ. ‘हॅपीनेस इंडेक्स’ (आनंदाच्या मोजमापनाचा निर्देशांक) वाढवण्यासाठी अमली पदार्थविरोधी कृती समिती स्थापन करावी !
गोव्यातील लोकांचा ‘हॅपीनेस इंडेक्स’ (आनंदाच्या मोजमापनाचा निर्देशांक) वाढवण्याच्या दृष्टीने गोवा सरकार उपाययोजना करत आहे. नुकतेच गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी लोकांना भेडसावणार्या समस्या दूर करण्याच्या दृष्टीने ‘सीएम् हेल्पलाईन’ क्रमांक प्रसारित केली आहे. गोव्यातील जनता आता ९३१९८२८५८१ या क्रमांकावर त्यांच्या तक्रारी प्रविष्ट करू शकणार आहे. मुख्यमंत्र्यांनी ‘सीएम् हेल्पलाईन’ क्रमांक घोषित करतांना सांगितले, ‘गोव्यातील लोकांचा ‘हॅपीनेस इंडेक्स’ वाढवण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.’ अमली पदार्थांचे सेवन, अतीमद्यप्राशन किंवा इतर व्यसने यांमुळे अनेक कुटुंबे दु:खाच्या खाईत लोटली जातात. हे रोखण्यासाठी आणि समाज व्यसनमुक्त करण्यासाठी अमली पदार्थविरोधी कृती समिती स्थापन केली पाहिजे. या कृती समितीच्या माध्यमातून सरकार लोकांना अमली पदार्थांच्या विळख्यातून सोडवू शकेल आणि गोव्यातील लोकांचा ‘हॅपीनेस इंडेक्स’ वाढवण्याच्या दृष्टीने ते आणखी एक महत्त्वाचे पाऊल ठरू शकते.
इ. गोव्यातील युवा पिढीला साधना शिकवणे !
व्यसनाधीनतेला आध्यात्मिक कारण आहे. त्यामुळे व्यसनमुक्तीसाठी शारीरिक आणि मानसिक स्तरांवर कितीही प्रयत्न केले, तरी त्याचा २० ते ३० टक्केच लाभ होतो. त्यामुळे व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या लोकांना त्यातून बाहेर काढण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी त्याला यश प्राप्त होत नाही. या पीडित लोकांना साधना सांगून ती त्यांच्याकडून करवून घेतली पाहिजे. त्यांना ईश्वराच्या नामस्मरणाचे, सत्संगाचे महत्त्व सांगितले, तर त्यांना आनंद मिळत जाईल. हा आनंद एवढा उच्च प्रतीचा असेल की, अमली पदार्थ सेवनामुळे किंवा मद्यप्राशनामुळे मिळणारे सुख त्यांना अल्प प्रतीचे वाटेल आणि नंतर त्यांचे व्यसन सुटेल. हेच शाश्वत सत्य आहे. गोमंतभूमीत याविषयीची एक पुष्कळ मोठी प्रचीती सर्वांसमोर आहे, ती म्हणजे श्रीक्षेत्र तपोभूमी, कुंडई येथील थोर संत ब्रह्मीभूत प.पू. ब्रह्मानंद स्वामी महाराज यांनी केलेले व्यसनमुक्तीचे महान कार्य ! त्यांनी व्यसनपीडित आणि गरीब समाजाला साधना सांगितली अन् ती त्यांच्याकडून करवून घेतली. त्यामुळे गोव्यातील सहस्रो लोक ईश्वरीकृपेने व्यसनमुक्त झाले आणि आनंदी जीवन जगू लागले.
ब्रह्मीभूत प.पू. ब्रह्मानंद स्वामी यांचे समाजाच्या उद्धाराचे हे आदर्श उदाहरण डोळ्यांसमोर ठेवून सरकारने पावले उचलावीत. शाळा-महाविद्यालयांमध्ये ‘आनंदप्राप्तीसाठी साधना’ हा विषय शिकवावा. शाळांच्या अभ्यासक्रमात हा विषय समाविष्ट करावा. त्यामुळे युवा पिढीवर साधनेचा संस्कार होईल. सुसंस्कृत समाजाची निर्मिती होईल. हळूहळू गोव्यातील संपूर्ण समाज आनंदी होईल आणि गोव्याचा ‘हॅपीनेस इंडेक्स’ निश्चित वाढेल.
– श्री. उमेश नाईक, उपसंपादक, दैनिक ‘सनातन प्रभात’
• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |