नांदेड – जिल्ह्यातील विधानसभेच्या निवडणुकीत ९ जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवित महाविकास आघाडीचा दारूण पराभव केला आहे. काँग्रेसचे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार मोहनअण्णा हंबर्डे यांना पराभव पत्करावा लागला आहे. हदगाव विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे बाबुराव कदम कोहळीकर हे ३० सहस्र मताधिक्यांनी विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार आणि विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचा पराभव केला. किनवट-माहूर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आणि विद्यमान आमदार भीमराव केराम हे दुसर्यांदा विजयी झाले आहेत. भोकर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार अधिवक्त्या श्रीजया चव्हाण या ५० सहस्र मतांनी विजयी झाल्या आहेत. नायगाव येथील भाजपचे उमेदवार राजेश पवार दुसर्यांदा ६३ सहस्र मतांनी विजयी झाले आहेत. पवार यांना पक्षातंर्गत मोठा विरोध झाला होता. भाजपमधील काही नेत्यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. देगलूर-बिलोली मतदारसंघातून भाजपचे उमेदवार जितेश अंतापूरकर हे विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार निवृत्ती कांबळे सांगवीकर यांचा पराभव केला. मुखेड येथे भाजपचे विद्यमान आमदार डॉ. तुषार राठोड यांनी विजयाची हॅट्रीक केली आहे. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार बालाजी पाटील कथावकर यांचा पराभव केला. कंधार-लोहा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर हे २८ सहस्र मतांनी विजयी झाले. नांदेड उत्तर मतदारसंघातूनही शिवसेनेचे उमेदवार आणि विद्यमान आमदार बालाजी कल्याणकर हे विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार अब्दुल सत्तार यांचा पराभव केला. नांदेड उत्तरमधून महाविकास आघाडीत बिघाडी झाली होती.