मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांना फटका, महायुतीचेच वर्चस्व !
मुंबई शहर आणि उपनगर मधील एकूण ३६ जागांवर महायुतीने तब्बल २३, तर महाविकास आघाडीने १३ जागांवर विजय मिळवला आहे. यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मोठा फटका बसला आहे. मुंबईत २२ जागा लढवून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला केवळ ९ जागांवर विजय मिळवला आला. या तुलनेत १५ जागा लढवून शिवसेनेचे ७ आमदार निवडून आले. महायुतीमध्ये भाजप १५, शिवसेना ७, तर राष्ट्रवादी काँग्रेस १ अशा जागा जिंकल्या. महाविकास आघाडीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे ९, समाजवादी पक्ष २ आणि काँग्रेस २ अशा जागा जिंकल्या. मुंबईत उद्धव बाळासाहेब ठाकरे २२ आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट अन् समाजवादी पक्ष यांनी ११ जागा, तर महायुती म्हणून भाजप १८, शिवसेना १५, तर राष्ट्रवादी काँग्रेस यांनी ३ जागा लढवल्या होत्या.
मनसेचे खाते उघडले नाही
मनसेने राज्यात तब्बल १२८ जागा लढवल्या; मात्र एकाही जागेवर मनसेचा उमेदवार निवडून येऊ शकला नाही. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांनी माहीम मतदार संघातून निवडणूक लढवली; मात्र तेथे ते पराभूत झाले. वर्ष २०१९ मध्ये ठाणे जिल्ह्यातून विजयी झालेले मनसेचे एकमात्र आमदार राजू पाटील हेही या निवडणुकीत पराभूत झाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १ लाख ५९ मतांनी विजयी !
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे जिल्ह्यातील कोपरी – पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून १ लाख ५९ हजार ६० मतांनी विजयी झाले. त्यांनी केदार दिघे यांना पराभूत केले.
नवी मुंबईसह रायगड येथील विजयी उमेदवार !
ऐरोली येथे भाजपचे गणेश नाईक विजयी झाले आहेत. बेलापूर मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे संदीप नाईक आणि भाजपच्या मंदा म्हात्रे यांच्यामध्ये चुरशीची लढत झाली. यामध्ये मंदा म्हात्रे विजयी झाल्या. रायगड जिल्ह्यात सातही मतदारसंघ प्रस्थापितांनी राखले आहेत. महायुतीचे सातही उमेदवार निवडून आले असून महाविकास आघाडी मतदारांवर प्रभाव पाडण्यात निष्प्रभ ठरली आहे. पनवेल मतदारसंघात भाजपचे प्रशांत ठाकूर यांना १ लाख ५७ सहस्र ८०८ मते मिळवून विजयी झाले, तर प्रतिस्पर्धी शेकापचे पराभूत उमेदवार बाळाराम पाटील यांना १ लाख ९ सहस्र ३०२ मते पडली.
पेण विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार रविशेठ पाटील पुन्हा एकदा विजयी झाले. कर्जतमधून शिवसेनेचे महेंद्र थोरवे विजयी झाले. उरण मतदारसंघात भाजपचे महेश बालदी विजयी झाले. अलिबाग विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे महेंद्र दळवी विजयी झाले. श्रीवर्धन येथे महायुतीच्या अदिती तटकरे विजयी झाल्या.
महाडमध्ये शिवसेनेचे भरत गोगावले सलग चौथ्यांदा निवडून आले. त्यांनी ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप यांचा पराभव केला.
नाशिक जिल्ह्यात ५ ठिकाणी भाजप, ७ ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, २ जागा शिवसेना, तर १ जागी अन्य विजयी !
नाशिक – नाशिक जिल्ह्यात ५ ठिकाणी भाजप, ७ ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, २ जागा शिवसेना, तर १ जागी अन्य विजयी झाले. यात प्रामुख्याने नाशिक मध्यमधून भाजपच्या देवयानी फरांदे, मालेगाव बाह्यमधून शिवसेनेचे दादा भुसे १ लाख ६ सहस्र ६०६ मताधिक्यांनी विजयी झाले. मालेगाव मध्यतून ‘इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेम्बली ऑफ महाराष्ट्र’चे असिफ शेख रशिद विजयी झाले. येवलातून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, तर बागलाणमधून भाजपचे दिलीप बोरसे हे १ लाख २९ सहस्र २९७ मतांनी विजयी झाले.
राज्याला आता विरोधी पक्ष नेताच नसेल !
राज्यात महाविकास आघाडीकडे विरोधी पक्ष नेते पद येईल असा कोणत्याच पक्षाला यश मिळालेलं नाही. किमान दहा टक्के जागा (किमान २९ जागा) निवडून याव्या लागतात. एवढ्या जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस यांपैकी कुणाकडेच नसल्याने राज्याला आता विरोधी पक्ष नेताच नसेल. वर्ष २०१४ आणि २०१९ मध्ये केंद्रात भाजप सरकार असतांना देशात विरोधी पक्ष नेताच नव्हता.
मतदानावर हिंदूंच्या मतांचा प्रभाव !
लोकसभेच्या निवडणुकीत मालेगाव, धुळे, मुंबई आदी जिल्ह्यांतील १४ मतदारसंघांमध्ये मुसलमानांची एकगठ्ठा मते महाविकास आघाडीला मिळाली होती; मात्र या विधानसभेच्या निवडणुकीत हिंदूंच्या मतांचा प्रभाव दिसून आला.
फेक नॅरेटिव्ह वर ‘एक है, तो सेफ है’ची मात !
लोकसभा निवडणुकीत ‘भाजप देशात बहुमताने आल्यास राज्यघटना पालटेल’, असे महाविकास आघाडीकडून ‘फेक नॅरेटिव्ह’ (खोटे कथानक) पसरवण्यात आले होते. त्याचा फटका महायुतीला बसला होता. विधानसभेच्या निवडणुकीत याचा फटका बसू नये, यासाठी महायुतीकडून राज्यात ‘संविधान जागृती’ अभियान राबवण्यात आले. या निवडणुकीत ‘एक है, तो सेफ है’ (एकत्र असलो, तर सुरक्षित राहू) आणि ‘बटेंगे तो कटेंगे’ (विभाजित झालो, तर कापले जाऊ) या आवाहनांनी ‘फेक नॅरेटिव्ह’वर मात केली.
सातारा येथील भाजपचे उमेदवार शिवेंद्रराजे भोसले सर्वाधिक मताधिक्याने विजयी !
राज्यात सर्वाधिक मताधिक्याने सातारा येथील भाजपचे उमेदवार शिवेंद्रराजे भोसले हे १ लाख ४२ सहस्र १२४ मताधिक्याने विजयी झाले. त्या खालोखाल परळी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे हे १ लाख ३८ सहस्रांपेक्षा अधिक मतांनी विजयी झाले.
लाडक्या बहिणींचा महायुतीला प्रचंड प्रतिसाद !
गेल्या दीड वर्षापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एस्.टी.मध्ये महिलांसाठी तिकिटामध्ये ५० टक्के सवलत चालू केली. यामुळे युवती आणि महिला यांना मोठा दिलासा मिळाला. गेल्या ५ मासांपूर्वी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रतिमास १ सहस्र ५०० रुपये देण्याचा निर्णय घेतला. याचा अनेक महिलांना लाभ झाला. यामुळे राज्यातील महिला, युवती यांनी महायुतीला भरभरून मतदान केले. महायुतीच्या विजयात ‘लाडकी बहीण’ योजनेचा वाटा मोठा आहे.
सातत्याने हिंदुविरोधी भूमिका घेणारे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव !
काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सतत हिंदुविरोधी भूमिका घेतात. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात त्यांनी जाणीवपूर्वक सनातन संस्थेला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आणि सनातन संस्थेवर बंदीची मागणी केली. ऋषितुल्य व्यक्तीमत्त्व असलेल्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांना अटक करण्याची मागणीही त्यांनी विधानसभेत केली होती. या सर्वांचे उत्तर हिंदु मतदारांनी मतपेटीच्या माध्यमातून दिले. चव्हाण यांचा पराभव झाला.
सलग ८ वेळा निवडून येणार्या बाळासाहेब थोरातांचा शिवसेनेच्या अमोल खताळ यांच्याकडून पराभव !
संगमनेर येथे काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांचा शिवसेनेचे नवखे असलेले अमोल खताळ यांनी केलेला पराभव लक्षवेधी ठरला. बाळासाहेब थोरात हे गेल्या ४ दशकांपासून या मतदारसंघातून आमदार होते.
साकोली येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विजयी झाले असून त्यांनी भाजपचे उमेदवार अविनाश आनंदराव ब्राह्मणकर यांना २०८ मतांनी पराभूत केले.
छत्रपती संभाजीनगर येथे भाजपचे अतुल सावे यांच्याकडून इम्तियाज जलील यांचा पराभव !
छत्रपती संभाजीनगर येथे पूर्व मतदारसंघातून भाजपचे अतुल सावे यांनी एम्.आय.एम्. पक्षाचे इम्तियाज जलील यांचा १ सहस्र १८१ मतांनी पराभव करून विजय मिळवला. विजयानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘जो हिंदु हित की बात करेगा, वही देश में राज करेगा’, अशा घोषणा दिल्या.
इम्तियाज जलील पिछाडीवर रहाताच कार्यकर्त्यांचा गोंधळ !एम्.आय.एम्. पक्षाचे उमेदवार आणि माजी खासदार इम्तियाज जलील प्रारंभी आघाडीवर होते; मात्र नंतर ते पिछाडीवर राहिले. त्यामुळे जलील यांच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राच्या बाहेर गोंधळ घातला. पोलिसांनी समर्थकांवर सौम्य लाठीमार करून त्यांना पांगवले. |
छत्रपती संभाजीनगर येथे भाजपचे प्रशांत बंब विजयी !
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर मतदारसंघात अतिशय चुरशीच्या लढतीत भाजपचे प्रशांत बंब विजयी ठरले आहेत. त्यांनी शरदचंद्र पवार गटाचे सतीश चव्हाण यांचा पराभव केला. त्यांच्यात प्रथमपासून अटीतटीची लढत चालू होती. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा फटका मराठवाड्यातील भाजपच्या उमेदवारांना बसणार, अशी शक्यता होती; मात्र तसे झाले नाही. गंगाखेडमध्ये राष्ट्रीय समाजवादी पक्षाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांचा दुसर्यांदा विजय झाला आहे. त्यांनी ठाकरे गटाचे उमेदवार विशाल कदम यांचा पराभव केला.
उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ येथील मतदारसंघांतील निकाल !
जळगाव येथे भाजपचे उमेदवार आणि मंत्री गिरीश महाजन यांचा दणदणीत विजय !
जामनेर मतदारसंघातून भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचा विजय झाला आहे. जिल्ह्यातील ११ पैकी ६ मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरी झाल्याचे दिसून आले आहे. बंडखोरांना माघारी घेण्यासाठी महायुतीपुढे मोठे आव्हान होते; मात्र अनेक ठिकाणी बंडखोरी रोखण्यात मंत्री गिरीश महाजन यांना अपयश आले होते.
चाळीसगाव येथे भाजपचे उमेदवार मंगेश चव्हाण यांनी गटाचे उमेदवार उमेश पाटील यांचा दारूण पराभव केला. पाचोरा येथे शिवसेनेचे किशोर पाटील यांनी अपक्ष उमेदवार शिंदे आणि ठाकरे गटाच्या वैशाली पाटील यांचा पराभव केला. जळगाव ग्रामीण भागात शिवसेनेचे उमेदवार गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार गुलाबराव देवकर यांचा पराभव केला. मुक्ताईनगर येथे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार गटाच्या उमेदवार रोहिणी खडसे यांचा दारूण पराभव केला आहे. चोपडा येथे शिवसेनेचे चंद्रकांत सोनावणे विजयी झाले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार राजू तडवी यांचा पराभव केला. रावेर येथे भाजपचे अमोल जावळे यांनी काँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांचा पराभव केला. जळगाव शहरातील भाजपचे उमेदवार सुरेश भोळेमामा यांनी ठाकरे गटाच्या उमेदवार जयश्री महाजन यांचा पराभव केला. अमळनेर (जिल्हा जळगाव) येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल पाटील, एरंडोल येथे शिवसेनेचे अमोल पाटील, तर जामोद (जिल्हा जळगाव) येथे भाजपचे डॉ. संजय कुटे विजयी झाले.
वर्धा जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व !
वर्धा – वर्धा जिल्ह्यात भाजपचे ४ उमेदवार विजयी झाले आहेत. देवळी मतदारसंघात इतिहास घडला. ५ वेळा सलग विजयी होणारे काँग्रेसचे रणजित कांबळे यांचा प्रथमच पराभव भाजपचे राजेश बकाने यांनी केला. आर्वी मतदारसंघात काँग्रेसच्या मयुरा काळे यांचा पराभव करून भाजपचे सुमित वानखेडे यांनी विजय मिळवला आहे. हिंगणघाट येथे भाजपचे समीर कुणावार यांचा विजय झाला. या मतदारसंघात तिसर्यांदा आमदार होणारे ते पहिले विजयी वीर ठरले आहेत. वर्धा मतदारसंघात डॉ. पंकज भोयर विजयी झाले.
हिंगोली येथे २ गटांत हाणामारी !
हिंगोली शहरात निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना आणि भाजप या गटांत हाणामारी झाली. यामध्ये ४ जण घायाळ झाले आहेत, तर १ तरुण गंभीर घायाळ झाला आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेमुळे पोलीस बंदोबस्त वाढवला असून शहरातून मिरवणूक काढण्यास मनाई केली आहे. पोलिसांनी येथील डीजेही कह्यात घेतला आहे.
नागपूर – नागपूर येथे भाजपचे उमेदवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडधे यांचा पराभव केला. काटोल येथील भाजपचे चरनसिंह ठाकूर, सावनेर येथील भाजपचे उमेदवार आशिष देशमुख विजयी झाले. नागपूर पूर्वचे भाजपचे उमेदवार कृष्णा खोपडे, मध्य येथे भाजपचे उमेदवार प्रवीण दटके, पश्चिममधून काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे, तर उत्तरमधील काँग्रेसचे उमेदवार डॉ. नितीन राऊत विजयी झाले. कामठी येथून भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे विजयी झाले. रामटेक येथील शिवसेनेचे आशिष जैस्वाल विजयी झाले.
अमरावती – बडनेरा (जिल्हा अमरावती) येथे महायुतीचे उमेदवार रवि राणा विजयी झाले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे गटाचे सुनील खराटे यांचा पराभव केला.
अमरावती येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुलभा खोडके, काँग्रेसचे उमेदवार डॉ. सुनील देशमुख, तिवसा (जिल्हा अमरावती) येथील काँग्रेसच्या उमेदवार यशोमती ठाकूर, धामणगाव रेल्वे येथील भाजपचे उमेदवार प्रताप अडसड विजयी झाले. दर्यापूर येथे उद्वव ठाकरे गटाचे उमेदवार गजानन लवटे विजयी झाले. मेळघाट येथील भाजपचे उमेदवार केवलराम काळे, अचलपूर येथील भाजपचे उमेदवार प्रवीण तायडे आणि मोर्शी येथील भाजपचे उमेदवार उमेश यावलकर विजयी झाले.
चंद्रपूर – ब्रह्मपुरी मतदारसंघातून विजय वडेट्टीवार यांचा विजय झाला.
धुळे – साक्री येथे शिवसेनेच्या श्रीमती मंजुळा गावीत विजयी झाल्या आहेत. धुळे ग्रामीण येथे भाजपचे राघवेंद्र (रामदादा) पाटील विजयी झाले. धुळे शहरात भाजपचे अनुप अग्रवाल यांचा विजय झाला. नवापूर येथे काँग्रेसचे शिरीषकुमार नाईक विजयी झाले आहेत. सिंदखेडा येथे भाजपचे जयकुमार रावल यांचा विजय झाला आहे. शिरपूर येथे भाजपचे काशीराम पावरा यांचा विजय झाला आहे.
नंदुरबार – येथे भाजपचे विजयकुमार गावीत विजयी झाले आहेत.
बुलढाणा – मलकापूर येथील भाजपचे आमदार चैनसुख संचेती, बुलढाणा येथे शिवसेनेचे उमेदवार संजय गायकवाड, चिखली (जिल्हा बुलढाणा) येथील भाजपच्या आमदार सौ. श्वेता महाले, सिंदखेडराजा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मनोज कायंदे, मेहकर मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाचे सिद्धार्थ खरात, तर खामगाव येथे भाजपचे आकाश फुंडकर विजयी झाले.
अकोला – मूर्तिजापूर येथे भाजपचे हरिश पिंपळे विजयी झाले.
वाशिम – रिसोड येथे काँग्रेसचे अमित झनक विजयी झाले. त्यांनी शिवसेनेच्या उमेदवार भावना गवळी यांचा पराभव केला. वाशिम येथे भाजपचे श्याम खोडे विजयी झाले आहेत. कारंजा येथे भाजपच्या सई डहाके विजयी झाल्या.
अन्य विजयी उमेदवार !
तुमसर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजू कारेमोरे, भंडारा येथे शिवसेनेचे नरेंद्र भोंडेकर, मोरगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकुमार बडोले, आमगाव येथे भाजपचे उमेदवार संजय पुरम विजयी झाले. आरमोरी येथे काँग्रेसचे उमेदवार रामदास मेश्राम, तर अहेरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मरावबाबा आत्राम विजयी झाले. बल्लारपूर येथील भाजपचे उमेदवार आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसचे उमेदवार संतोषसिंह रावत यांचा पराभव केला. भोकर येथे भाजपच्या श्रीजया चव्हाण विजयी झाल्या. बदनापूर येथे भाजपचे उमेदवार नारायण कुचे, तर भोकरदन येथे भाजपचे संतोष दानवे विजयी झाले. अकोट येथे भाजपचे प्रकाश भारसाकळे विजयी झाले. बाळापूर येथे उद्धव ठाकरे गटाचे नितीश देशमुख विजयी झाले, तर अकोला पश्चिम येथे काँग्रेसचे उमेदवार साजिद खान विजयी झाले. अकोला (पूर्व) मधून भाजपचे रणधीर सावरकर विजयी झाले आहेत. चाळीसगाव (जिल्हा यवतमाळ) येथे भाजपचे उमेदवार मंगेश चव्हाण विजयी झाले आहेत. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे संतूक हंबर्डे विजयी झाले. जालना जिल्ह्यात भाजपचे संतोष दानवे, बबनराव लोणीकर आणि नारायण कुचे विजयी झाले, तर शिवसेनेचे अर्जुन खोतकर आणि हिकमत उडान विजयी झाले.