मुंबई, २३ नोव्हेंबर (वार्ता.) – महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक निकाल आहे. लोकांनी मतांचा, प्रेमाचा वर्षाव महायुतीवर केला आहे. सर्वच घटकातील लोकांनी महायुतीवर प्रेम दाखवले, त्यासाठी मी त्यांना धन्यवाद देतो. हे सर्वसामान्यांचे सरकार असल्याने आम्ही सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला. आम्ही जनतेची मते नाही, तर मने जिंकली आहेत. निकालानंतर आमचे दायित्व आणखी वाढले आहे, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडले. विधानसभा निवडणुकीच्या निकालाविषयीच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, जनतेच्या ऋणात राहून एकोप्याने युती काम करेल. विकास हा अजेंडा समोर ठेवून राज्यातील सर्वांगीण विकास करण्याचा आम्ही प्रयत्न करू.
‘एक है, तो सेफ है !’ आवाहन महाराष्ट्रातील जनतेने स्वीकारले ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
महाराष्ट्राच्या जनतेसमोर आम्ही नतमस्तक आहोत. हा निकाल म्हणजे जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर दाखवलेला विश्वास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले ‘एक है तो सेफ है !’चे आवाहन महाराष्ट्रातील जनतेने स्वीकारले आहे, हे या निकालावरून सिद्ध झाले आहे.