भारतातील दुसर्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती आणि प्रसिद्ध उद्योजक गौतम अदानी यांच्या विरोधात अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील फेडरल न्यायालयात भ्रष्टाचाराच्या प्रकरणी खटला प्रविष्ट करण्यात आला असून न्यायालयाने या प्रकरणी अदानी यांना अटक करण्याचा आदेशही दिला आहे. गौतम अदानींसह त्यांचा पुतण्या आणि अन्य ५ जण यांच्यावर या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ‘भारतात होणार्या सर्वांत मोठ्या सौरऊर्जा प्रकल्पाचे कंत्राट प्राप्त होण्यासाठी भारतामधील काही सरकारी अधिकार्यांना २ सहस्र १९ कोटी रुपयांची (२६५ दशलक्ष डॉलर्स) लाच देण्यात आली’, असा आरोप अमेरिकेतील सिक्युरिटी अँड एक्सचेंज कमिशनने केला आहे. या प्रकरणी अमेरिकेत गुन्हा नोंद होण्याचे कारण की, या प्रकल्पामध्ये अमेरिकेतील काहींनी गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीतून गौतम अदानी यांनी ३ अब्ज डॉलरपेक्षा अधिक कर्ज आणि रोखे गोळा केले; मात्र दिलेल्या लाचेच्या रकमेची माहिती गुंतवणूकदारांना देण्यात आली नाही. यामुळे अमेरिकेतील गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा आरोप करत हा गुन्हा नोंद झाला आहे. गौतम अदानी यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. येणार्या काळात याची चौकशी होऊन ‘नेमका काय प्रकार आहे ?’, तो बाहेर येईलच; परंतु या माध्यमातून जगभरातून भारतविरोधी शक्ती त्वरित सक्रीय झाल्या आहेत. हा प्रकार उघड होताच ‘बीबीसी’, तसेच ‘वायर’ या साम्यवादी आणि भारतविरोधी माध्यमांनी ‘भारतीय ऊर्जा प्रकल्पामध्ये भ्रष्टाचार’, अशा प्रकारे भारतविरोधी फेक नॅरेटिव्ह (खोटे कथानक) चालू केले. गौतम अदानी यांच्यावरील आरोपानंतर केनियाचे राष्ट्राध्यक्ष विल्यम रूटो यांनी अदानी समूहासमवेत असलेला विमानतळ विस्तार आणि ऊर्जा प्रकल्प या कामातील गुंतवणूक रहित करत असल्याची घोषणा केली. गौतम अदानी म्हणजे ‘भारत’ नाही; परंतु ते एक यशस्वी भारतीय उद्योजक आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची अपकीर्ती करण्यासाठी या प्रकरणाचा उपयोग केला जात आहे.
‘फेक नॅरेटिव्ह’ सिद्ध करून भारताची अपकीर्ती करण्याचा प्रकार साम्यवादी प्रसारमाध्यमांनी कायमच केला आहे. मागील महिन्यात ‘युनायटेड स्टेट्स कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडम’ या अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्याच्या आयोगाने प्रसारित केलेल्या ‘इंडिया कंट्री अपडेट’ या अहवालामध्ये भारतातील अल्पसंख्यांकांचे धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात आल्याची गरळओक केली. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी ही भारतातील मुसलमानांच्या विरोधात असल्याचे ‘फेक नॅरेटिव्ह’ डाव्या विचारांच्या माध्यमांनी निर्माण केले. या विरोधात देहली येथील शाहीनबाग येथे चालू असलेल्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देऊन भारताला अपकीर्ती करण्यात हीच माध्यमे पुढे होती. मणीपूरमधील हिंसाचार प्रकरणातही ‘भारतात अल्पसंख्य असुरक्षित आहेत’, हे चित्र असल्याचे फेक नॅरेटिव्ह उभे केले गेले. त्यामुळे गौतम अदानी यांचे हे प्रकरण उचलून भारताची अपकीर्ती केली जाणार, यात काही नवीन नाही; परंतु याला उत्तर देण्यासाठी भारतीय यंत्रणाही त्याहून सक्षम करण्याची आवश्यकता आहे.
भारताची घोडदौड रोखण्याचे षड्यंत्र !
जागतिक स्तरावरील व्यापारी संबंध प्रस्थापित करण्यासाठी पैशांची देवघेव होते, हे सर्वश्रुत आहे आणि अमेरिकेसारख्या भांडवलशाही देशात हे प्रकार भारतापेक्षा अधिक चालतात. अशा परिस्थितीत भारतात होणार्या एका प्रकल्पातील गुंतवणुकीमुळे अमेरिकेतील नागरिकांची आर्थिक हानी झाली म्हणून खटला प्रविष्ट होणे आणि त्याविरोधात लागलीच जागतिक पातळीवरील श्रीमंत असलेल्या भारतातील उद्योजकाच्या विरोधात गुन्हा नोंद होणे, हा प्रकार निश्चितच संशयास्पद आहे. मागील काही वर्षांत भारताची अर्थव्यवस्था बळकट होत आहे. भारतामधील दरडोई उत्पन्नाचा दर वाढत आहे. ‘सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्च’ या जागतिक अर्थकारणाचा अभ्यास करणार्या संस्थेने या शतकाच्या अखेरीस ‘भारत जगातील सर्वांत मोठी आर्थिक महासत्ता होईल’, असे नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे. यामध्ये वर्ष २०३२ पर्यंत भारत जर्मनी आणि जपान यांच्या अर्थव्यवस्थेलाही मागे टाकेल. अमेरिका आणि चीन यांपेक्षा भारताचे आर्थिक सरासरी उत्पन्न दर अधिक होईल, असेही नमूद केले आहे. त्या दिशेने भारताची पावले पडत आहेत. भारताचे पाऊल हे जागतिक आर्थिक महासत्तेकडे पडत आहे आणि यामध्ये भारतीय उद्योजकांची भूमिका मोठी आहे. भारतीय उद्योजकांच्या माध्यमातून अन्य देशांमध्ये भारताच्या उद्योगक्षेत्राविषयीची प्रतिमा थेट व्यक्त होते. त्यामुळे अनेक उद्योजक भारताकडे आकर्षित होतात. गौतम अदानी यांच्या या प्रकरणाद्वारे भारताची प्रतिमा मलिन करून भारताची घोडदौड रोखण्याचे षड्यंत्र यातून दिसून येते.
भारताची अपकीर्ती करण्यासाठीच !
या प्रकरणाचे अन्वेषण ‘फेडरेल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ या अमेरिकेच्या न्याय विभागाकडून चालू आहे. त्यामुळे या प्रकरणात तथ्य आहे, अशी आवईही डाव्या विचारांच्या माध्यमांनी उठवली आहे; मात्र ‘फेडरेल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’कडून चालू असलेल्या अनेक चौकशांचे अहवाल पुढे आले नाहीत. अमेरिकेच्या निवडणुकीत डॉनल्ड ट्रम्प निवडून येण्यासाठी रशियाने हस्तक्षेप करून ट्रम्प यांच्यासाठी जनमत सिद्ध केल्याच्या प्रकरणाचे अन्वेषणही ‘फेडरेल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ कडून चालू आहे; मात्र हे अन्वेषण सद्य:स्थितीत थांबले असल्याचा आरोप याच डाव्या विचारांच्या माध्यमांनी केला. तीच माध्यमे भारताची अपकीर्ती करण्यासाठी ‘फेडरेल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’च्या विश्वासार्हतेचे पुरावे देत आहेत. येनकेन प्रकरेण भारताची अपकीर्ती करण्यासाठी ‘फेक नॅरेटिव्ह’ निर्माण करण्यासाठी ही मंडळी कार्यरत आहेत.
दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या ‘फेक नॅरेटिव्ह’च्या विरोधात भारताने पाय रोवून उभे रहायला हवे; मात्र यापूर्वी अनेक वर्षे देशाचे नेतृत्व करणारा काँग्रेस पक्ष भारतविरोधी शक्तींची भाषा बोलत आहे. या प्रकरणातही राहुल गांधी यांनी चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच गौतम अदानी यांना अमेरिकेने अटक करण्याची मागणी केली आहे. काँग्रेसचे हे राजकारण प्रगल्भतेचे लक्षण नाही. कितीही राजकीय विरोध असला, तरी देशाचा मानसन्मान आणि प्रतिष्ठा यांसाठी एक होणे, हे राष्ट्रीयत्वाचे लक्षण आहे; मात्र राहुल गांधी बोलत असलेली भाषा आणि भारतविरोधी शक्तींची भाषा यांत साम्य आहे. त्यामुळे भारतविरोधी खोटे चित्रण निर्माण करण्यासाठी जागतिक पातळीवरच नव्हे, तर देशातही षड्यंत्र चालू असल्याचे हे द्योतक आहे.
अदानी यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून भारताची अपकीर्ती करणे, हा आंतरराष्ट्रीय भारतविरोधी षड्यंत्राचा भाग ! |