(एक्झिट पोल म्हणजे मतदानोत्तर चाचणी)
मुंबई (महाराष्ट्र) / रांची (झारखंड) : ऑक्टोबरमध्ये, म्हणजेच अवघ्या २ महिन्यांपूर्वी ज्याप्रकारे हरियाणा विधानसभा निवडणुकांमध्ये ‘एक्झिट पोल’चे अंदाज मोठ्या प्रमाणात चुकले होते. अगदी तसेच चित्र या वेळीही पहायला मिळाले. २० नोव्हेंबरला मतदान झाल्यानंतर बहुतेक ‘एक्झिट पोल्स’नी महाराष्ट्रात महायुतीला विजयी घोषित केले होते, परंतु बहुतेक चाचण्यांमध्ये महायुतीला अधिकाधिक १६०-१७० जागा मिळतील, असा अनुमान होता. एकट्या ‘पोल डायरी’ने केलेल्या चाचणीतही महायुती अधिकाधिक १८६ जागा जिंकेल, असा अनुमान वर्तवला होता. प्रत्यक्षात ‘पोल डायरी’शीसुद्धा तुलना केली असता महायुतीला तब्बल ४५ जागा (२३१ जागा) अधिक मिळाल्या. यातून पुन्हा एकदा मतदानोत्तर चाचण्यांचा फोलपणा चव्हाट्यावर आला आहे. लोकसभेच्या मतदानोत्तर चाचण्या असोत कि कोणत्याही विधानसभेच्या, वारंवार दिसणारा हा भेद आता या चाचण्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे, अशी चर्चा सामाजिक माध्यमांत होतांना दिसत आहे.
झारखंड निवडणुकांचा विचार करताही साधारणपणे हेच अनुभवास आले. येथे झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस यांच्या आघाडीला तब्बल ५७ जागा मिळाल्या. प्रत्यक्षात केवळ ‘एक्सिस माय इंडिया’नेच त्यांना ४९-५९ जागा मिळतील, असा अनुमान वर्तवला होता. अन्य बहुतांश ‘एक्झिट पोल्स’ने भाजपला बहुमत मिळेल, असे म्हटले होते. काहींनी त्रिशंकू अवस्था निर्माण होईल, असे म्हटले होते. प्रत्यक्षात आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस यांना दोन तृतीयांशहूनही अधिक जागांवर विजय मिळतांना दिसत आहे.