भारतात पेट्रोल-डिझेल महागण्याची शक्यता

नवी देहली – रशियाकडून कच्च्या तेलावर भारताला याआधी देण्यात आलेली सूट रहित होणार असल्याने पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. ‘बीपीसीएल्’ (भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड) आणि ‘एच्पीसीएल्’ (हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड) या दोन भारतीय तेल आस्थापनांचे रशियन आस्थापन ‘रोसनेफ्ट’शी झालेल्या तेल करारास अपयश आले आहे. ‘रॉयटर्स’ वृत्तसंस्थेने हे वृत्त प्रकाशित केले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरेल १२४ डॉलर झाली आहे, तसेच डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन होत असल्याने भारतात पेट्रोल-डिझेल यांच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रशियाशी आधी झालेल्या करारानुसार पुढील ६ मास केवळ ‘इंडियन ऑईल कॉर्पोरेशन’च सवलतीच्या दरात कच्चे तेल विकत घेऊ शकते.