भारतीय राजकारणाच्या इतिहासात अलीकडे कधी नव्हे अशा आशादायी घटना घडत आहेत. अलीकडच्या काळात उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मध्यप्रदेश, आसाम, कर्नाटक, गोवा आदींपैकी काही राज्यांनी गोहत्याबंदी कायदा केला, काही राज्यांनी धर्मांतरबंदी कायदा केला, तर काहींनी समान नागरी कायदा करण्याचा प्रयत्न केला. हिंदुहिताचे निर्णय घेण्यामध्ये गोव्यासारखे छोटेसे राज्यही अग्रेसर ठरले आहे. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत गेल्या काही मासांपासून घेत असलेले हिंदुहिताचे आणि गोव्याच्या हिताचे निर्णय निश्चितपणे स्वागतार्ह आहेत अन् त्यासाठी त्यांचे सर्वत्र कौतुकही होत आहे.
प्राचीन काळापासून भारत निर्विवाद ‘हिंदु राष्ट्र’ होता. मोगलांसह अनेक परकियांच्या आक्रमणांना यशस्वीपणे सामोरे जाऊन हे हिंदु राष्ट्र ताठ मानेने उभे होते. काँग्रेसींनी धर्माच्या आधारे देशाची फाळणी करून हा देश धर्मनिरपेक्ष बनवला आणि तेव्हापासून देशाची झपाट्याने अधोगतीकडे वाटचाल चालू झाली. फाळणीनंतर निर्माण झालेला पाकिस्तान मात्र इस्लामी देश बनला आणि आज तोच पाकिस्तान आपल्याविरुद्ध धर्मयुद्ध पुकारून आपल्या मुळावर उठला आहे. त्यास आता अन्य इस्लामी देशही साहाय्य करत आहेत. नूपुर शर्मा प्रकरणात भारताविरुद्ध १५ इस्लामी देशांनी दंड थोपटले आहेत. हा विरोध केवळ आपला देश ‘हिंदु’ आहे आणि त्या हिंदु धर्मियांच्या देशात मुसलमानांच्या श्रद्धास्थानांचा कथित अवमान झाला आहे, यासाठी आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. ताज्या वृत्तानुसार, नूपुर शर्मा प्रकरणात ‘अल् कायदा’ या कट्टर जिहादी आतंकवादी संघटनेने भारतातील भाजप सरकारला ‘भगवे आतंकवादी’ असे संबोधत आक्रमण करण्याची धमकी दिली आहे. सांगायचे तात्पर्य इतकेच की, संपूर्ण जग आपल्याकडे ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून बघते आणि आपण मात्र स्वतःला ‘सेक्युलर’ म्हणवून घेण्यात धन्यता मानतो ! नूपुर शर्मा प्रकरण, हिजाबबंदी प्रकरण यांसह समान नागरी कायदा, धर्मांतरबंदी कायदा, गोहत्याबंदी कायदा आदींना हिंदुहिताच्या कायद्यांना विरोध, ही त्याची काही प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. या सर्वांना विशिष्ट धर्मियांच्या व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली विरोध केला जातो.
धडक निर्णय आवश्यकच !
अशात वर उल्लेखिल्याप्रमाणे काही राज्यांत हिंदुहिताचे होत असलेले निर्णय स्वागतार्ह ठरतात. गोव्यात असे निर्णय होणे, हे एकाअर्थी अधिक आवश्यक आणि म्हणूनच महत्त्वाचे आहेत; कारण अत्याचारी पोर्तुगिजांनी गोव्यावर ४०० वर्षे राज्य केले आणि ‘इन्क्विझिशन’च्या माध्यमातून हिंदूंवर मोगल आणि इंग्रज यांच्यापेक्षा भयानक अत्याचार केले. हिंदूंनी धर्मांतर न केल्यास त्यांना आगीत ढकलणे, नखे उपटून काढणे, कातडी सोलून त्यावर मिठाचे पाणी टाकणे, असे नानाविध अमानवीय अत्याचार केले आहेत.
विशेष म्हणजे या अत्याचारांविषयी आजच्या गोवेकरांनाच फारशी माहिती नाही. हा सत्य दडपण्याचा परिणाम आहे. पोर्तुगिजांनी हिंदूंची श्रद्धाकेंद्रे असलेल्या मंदिरांचाही मोठ्या प्रमाणात विध्वंस केला. या मंदिरांच्या पुनर्उभारणीसाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बाह्या सरसावल्या आहेत. त्यांनी पोर्तुगिजांनी विध्वंस केलेल्या मंदिरांची पुनर्उभारणी करण्याची घोषणा केली आणि त्यासाठी अर्थसंकल्पात २० कोटी रुपयांची भरीव तरतूदही केली. गोव्याच्या इतिहासात प्रथमच एखाद्या मुख्यमंत्र्याने असे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दुसरे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे, ते म्हणजे गोव्याची प्रतिमा सुधारण्याचे. दुर्दैवाने सध्या जगात गोव्याची प्रतिमा ‘बाई आणि बाटली’ अशी झाली आहे. अशात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘गोवा ही देवभूमी आहे’, असे ठणकावून सांगत ‘परशुराम भूमी’ असलेल्या गोव्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. गोव्याची चुकीची प्रतिमा पालटण्यासाठी मात्र सरकारला एवढ्यावरच थांबून चालणार नाही, तर अमली पदार्थ, कॅसिनो, मद्य आदींवर बंदी घालण्याचे धाडस दाखवावे लागेल; कारण याच गोष्टींमुळे गोव्याची प्रतिमा मलीन झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी नुकतीच राज्यातील ‘मसाज पार्लर’, ‘स्पा’, ‘डान्स बार’ आदींवर कारवाई करण्याची सूचना देऊन त्या दिशेने एक पाऊल टाकले आहे.
गोव्यातील हिंदूंना आणखी एक सतावणारा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे त्यांचे बलपूर्वक करण्यात येणारे धर्मांतर. हिंदूंचे असे धर्मांतर करणाऱ्या शिवोली येथील ‘फाइव्ह पिलर’ चर्चचा पाद्री डॉम्निक याला पोलिसांनी थेट बेड्या घातल्या. सध्या तो जामिनावर आहे. तथापि त्याच्या कारवाया सर्वश्रुत असूनही आजपर्यंत त्याच्यावर कारवाई करण्याचे कुणाचे धाडस झाले नव्हते, ते विद्यमान भाजप सरकारने दाखवले. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची हिंदुहितैषी निर्णयांची घौडदौड येथेच थांबली असे नाही, तर त्यांनी अन्यायी पोर्तुगीज राजवटीविरुद्ध कुंकळ्ळी येथे झालेल्या भीषण रणसंग्रामाच्या स्मरणार्थ प्रत्येक वर्षाच्या १५ जुलैला ‘राष्ट्रीय युद्ध स्मरण दिन’ पाळण्याची घोषणा केली. कुंकळ्ळीच्या रणसंग्रामाचा इतिहास ज्यांना ज्यांना ज्ञात असेल किंवा ज्यांनी वाचला-ऐकला असेल, त्यांना पोर्तुगिजांची राक्षसी प्रवृत्ती कळल्याविना राहिली नसेल. अशा आसुरी वृत्तीच्या पोर्तुगिजांच्या राजवटीला धडा शिकवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांनाही मुख्यमंत्री डॉ. सामंत विसरले नाहीत. गोव्यात नुकत्याच झालेल्या शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा पाठ्यपुस्तकांत समावेश करण्याची घोषणा केली. एकूणच गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी हिंदुहितैषी निर्णयांचा जो धडाका लावला आहे, तो प्रत्येक हिंदूला हर्षाेल्हासित करणारा आहे. ही प्रत्येक घोषणा सत्यात उतरवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. त्यासाठी त्यांना हिंदुद्वेषी प्रवृत्तींच्या टीकेला सामोरे जावे लागू शकेल. हे निर्णय होऊ न देण्यासाठी अनेक विरोधक आटापिटा करतील, तेव्हा अशांनाही समजेल अशा भाषेत उत्तरे देण्याची सिद्धता त्यांना करून ठेवावी लागेल. अर्थात् हिंदूंनीही मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयांचे केवळ स्वागत करून न थांबता त्यांच्या मागे ठामपणे उभे रहाण्याचे दायित्व पार पाडावे. हे त्यांचे धर्मकर्तव्यच आहे !
हिंदुहितैषी निर्णय घेणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या मागे ठामपणे उभे रहाणे, हे समस्त हिंदूंचे धर्मकर्तव्यच ! |