एकदा भारित झाल्यानंतर २५० कि.मी. पर्यंत धावणार
पुणे – महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पदार्पणानिमित्त स्वारगेट एस्.टी. बस स्थानक येथे परिवहन मंडळ, पुणे विभागाच्या ‘शिवाई’ या बससेवेचा शुभारंभ, तसेच विद्युत् प्रभारक केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहनमंत्री अधिवक्ता अनिल परब, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, परिवहन विभागाचे अधिकारी, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते. या वेळी ‘राज्य परिवहन महामंडळाने आपल्या बससेवेत काळानुरूप पालट केले असून महामंडळाच्या बसच्या माध्यमातून सुरक्षित अणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे’, असे अजित पवार यांनी सांगितले. ‘शिवाई’ बसची ‘पुणे ते नगर’अशी पहिली फेरी चालू करण्यात आली. ही बस एकदा भारित झाल्यानंतर २५० कि.मी.पर्यंत धावणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
‘शिवाई’ एस्.टी.ची वैशिष्ट्ये
‘शिवाई ’बस ‘बॅटरी’वर चालणारी आहे. त्यामुळे बस प्रदूषणविरहित, पर्यावरणपूरक, वातानुकूलीत आणि आवाज विरहित आहे. बस एकदा भारित झाल्यानंतर अधिकाधिक २५० कि.मी. पर्यंत जाऊ शकते. प्रत्येक प्रवाशासाठी स्वतंत्र आणि स्वनियंत्रित वातानुकूलीत ‘लुव्हर’ (वाऱ्याचा झोत नियंत्रित करण्यासाठी पट्ट्या असलेली खिडकी) बसवण्यात आले आहे. बसमध्ये ४३ प्रवाशांसाठी बैठक व्यवस्था आणि प्रत्येक दोन ‘सीट’च्या मध्ये दोन्ही प्रवाशांचे भ्रमणभाष भारित करण्यासाठी सोय करण्यात आली आहे. चालक कक्षात प्रवासी घोषणा यंत्रणा बसवली आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रवाशांना सावध करण्यासाठी यंत्रणा असून त्याचे ‘बटन’ (कळ) चालक कक्षात आहे. प्रवासी कक्षातील हालचालीवर देखरेखीसाठी छायाचित्रक प्रवासी कक्षात बसवण्यात आला आहे. प्रवाशांच्या मनोरंजनासाठी ‘ॲन्ड्रॉईड टीव्ही’ बसवण्यात आला आहे.