धर्म : गोळी कि चैतन्याचे बीज ?

संपादकीय

‘धर्म अफूची गोळी आहे कि चैतन्याचे बीज ?’, हे येत्या काळात संपूर्ण विश्वाला लक्षात येईल !

जितेंद्र आव्हाड

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नुकतेच कोल्हापूर येथे दौऱ्यावर असतांना ‘धर्माची गोळी दिली की, लोक झोपून रहातात, हे ‘त्यांना’ ठाऊक आहे’, असे साम्यवादी थाटाचे वक्तव्य करून अमली पदार्थ प्रकरणातील एका संशयित आरोपीची बाजू घेतली आहे. भारतातील बहुसंख्य हिंदूंच्या जिवावर गडगंज श्रीमंत झालेले आणि तरीही भारतात ‘असहिष्णुते’चे वातावरण अनुभवणारे अभिनेते शाहरुख खान यांच्या मुलावर म्हणजेच आर्यन खानवर अमली पदार्थ बाळगल्याचा आरोप होता. त्याच्या संदर्भात कळवळा आल्याने आव्हाड यांनी वरील वक्तव्य केले. शाहरुख खान यांना आव्हाड यांच्या बंगल्यावर हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ता अनंत करमुसे यांना झालेल्या मारहाणीचे प्रकरण कदाचित् ठाऊक नसावे, नाहीतर ‘असहिष्णु कोण आहेत ?’, हे त्यांना लक्षात आले असते. अमली पदार्थांनी या देशाच्या युवा पिढीची काय हानी केली आहे, हे आव्हाड यांना ठाऊक नाही, असे नव्हे. असे असतांनाही त्याविषयीच्या संशयिताची बाजू घेणे, म्हणजे ‘आव्हाड यांनाच विशिष्ट धर्माचे प्रेम आणि हिंदु धर्माची ‘ॲलर्जी’ आहे कि काय ?’, असे वाटते. अर्थात् ते कळवा-मुंब्रा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे त्यांना अशी वक्तव्ये अधुन मधून करावी लागत असतील, हेही तितकेच खरे. मागे एकदा कल्याण येथे बोलतांना अ ाव्हाड म्हणाले होते, ‘‘तुम्ही ५० वर्षे येथे रहाता, घरात शिधापत्रिका आहे आणि तरीही तुम्हाला घराबाहेर काढले जात असेल, तर इथे काही बापाचे राज्य आहे का ?’’ घुसखोरीला प्रत्यक्ष चालना देणारेच हे विधान नाही का ? कित्येक घुसखोरांना शिधापत्रिका मिळाल्या आहेत, हे सर्वश्रुत आहे. एखादी व्यक्ती आपल्या घरात घुसून आपल्यावर कुरघोडी करू लागली, तर आपण तिला घरात ठेवून घेऊ का ? बांगलादेशी घुसखोरांचे विविध प्रकारच्या गुन्ह्यांतील प्रमाण चिंताजनक आहे आणि त्यांनी हिंदूंना अन्न, निवारा आदी मूलभूत हक्कांपासून मोठ्या प्रमाणात वंचित ठेवले आहे, हेही सर्वांना ठाऊक आहे. असे असूनही सरकार जर घुसखोरांना पायबंद घालण्यासाठी काही पावले उचलत असेल, तर त्याला अशा प्रकारे विरोध करणे, म्हणजे एकप्रकारे राष्ट्रविरोधी विचार आणि कृती यांना चालना देणेच नव्हे का ?

‘आव्हाड यांनी केलेल्या वरील वक्तव्यातील ‘त्यांना’ हा शब्द भाजपला धरून आहे’, असे समजावे लागते; कारण केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या यंत्रणांनी टाकलेल्या धाडीत आर्यन खान यांना अटक झाली होती. वरील सूत्राच्या अनुषंगाने आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले. पवार यांच्यावर आडून काही बोलले जात असले, तरी थेट उघडपणे टीका करण्याचे धैर्य मात्र आतापर्यंत कुणातही नव्हते. तो आरंभ करण्याचे श्रेय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मिळाले. त्यांच्यानंतर भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आंग्लभाषेत पवार यांच्याविषयी अनेक सूत्रांचे ट्वीट केले. आता अगदी स्थानिक नेतेही त्यांच्याविरोधात उघडपणे बोलू लागले. काही कलाकार आणि सामान्य मुले यांना त्यासाठी अटक झाली. अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या काळात शाहरुख खान यांना ही ‘असहिष्णुता’ वाटत नाही, हेही विशेष आहे; मात्र हे चक्र असे फिरले कसे काय ? हे धैर्य सामान्य माणसात कसे
आले ? आणि आता हे वादळ थांबण्याचे नाव घेत नाही, तर याचा शेवट काय होणार ? याची उत्तरे काळाच्या पडद्याआड दडलेली आहेतच; परंतु यातून बोध घेण्याचे सूत्र म्हणजे ‘धर्मात नेहमी सत्याचा जय होतो; किंबहुना धर्म म्हणजेच सत्य आणि नित्य. असत्य आणि अधर्म काळाच्या ओघात नष्ट होऊन सत्य तेच टिकते.’

धर्म चैतन्यजागृतीचे बीज

आव्हाड यांच्यासह जे जे धर्माचा ‘अफूची गोळी’ या अर्थाने उल्लेख करतात, त्यांना सांगावेसे वाटते की, ‘धर्म’ ही अफू देऊन झोपवणारी गोळी नव्हे, तर चैतन्याचे बीजारोपण करून जागृत करणाऱ्या स्रोताची धार आहे. ‘जेव्हा जेव्हा या समाजाला धर्मचैतन्याची गोळी मिळाली, तेव्हा तेव्हा हा समाज जागृत झाला आणि अधर्माविरोधात लढला’, असे इतिहास सांगतो. आव्हाड यांना सत्य इतिहासाचे वावडे आहे; परंतु तरीही हे कालातीत सत्य त्यांना ठाऊक नाही, असे नाही. सर्वांचे दैवत असणारे छत्रपती शिवराय यांना ज्या जिजाबाईंनी मोठे केले, असे आव्हाड मानतात, त्या जिजाबाईंनी त्यांना राम-कृष्ण यांच्याच गोष्टींचे, म्हणजे धर्माचेच धडे दिले. त्यातूनच त्यांचे अधर्माविरोधात लढण्याचे स्फुल्लिंग चेतवले गेले. ही धर्माची ताकद आहे. अगदी लोकमान्य टिळक यांनीही ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ लिहिला. आव्हाड यांना हिंदु धर्माचेच वावडे आहे. हिंदु धर्माचा संदर्भ येतो, तेव्हा पुरो(अधो)गाम्यांना ती अफूची गोळी वाटते; मग मुसलमानांचा धर्म म्हणजे काय जिहादची गोळी का ? जर ‘धर्म ही अफूची गोळी आहे’, तर साम्यवाद ही तर जीवनव्यवस्था उद्ध्वस्त करणारी मृत्यूची गोळी आहे. कालगतीप्रमाणे हिंदूंमधील धर्मबीज परत एकदा जागृत होत आहे. त्यामुळे अनेक वर्षे हिंदूंच्या मनात असलेल्या स्वप्नांना आता वाट मिळत आहे आणि सर्वांनाच आश्चर्य वाटू शकते अशा घटना वेगाने घडत आहेत. त्यामुळे आव्हाड यांना पवार यांची कुणी केलेली अपकीर्ती ही वरवर दिसणारी घटना वाटली, तरी धर्म, काळ आणि इतिहास यांच्या स्तरांवर त्याचे काही अर्थ आहेत. त्यामुळे येथे सांगायचे सूत्र म्हणजे ‘धर्म ही अफूची गोळी आहे कि चैतन्याचे बीज आहे ?’, हे सत्य सर्वांना समजण्याची वेळ जवळ आली आहे. धर्माचा आणि अर्थात्च सनातन धर्माचा डंका विश्वात वाजण्याची वेळ आता जवळ आली आहे. येत्या काळात आव्हाड यांच्यासह सर्वांनाच त्याची प्रचीती येईल !