वेंगुर्ला – पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात अमली पदार्थांची दिवसाढवळ्या होणारी तस्करी, लागवड, सेवन आणि वाहतूक यांवर तातडीने आळा घालावा, अशी मागणी वेंगुर्ला येथील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक आणि स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते अन् नागरिक यांनी एका निवेदनाद्वारे वेंगुर्ला पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांच्याकडे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की,
सध्या पर्यटनदृष्ट्या सामाजिक आणि आर्थिक विकास होतांना परराज्यातून जिल्ह्यात होणारी मद्याची अवैध वाहतूक, अमली पदार्थांची तस्करी, जिल्ह्यातील दुर्गम भाग आणि डोंगर पायथ्याशी होणारी अमली पदार्थांची लागवड, काही ठिकाणी उघडपणे, तर काही ठिकाणी छुप्या पद्धतीने होणारी अमली पदार्थांची खरेदी-विक्री, अल्पवयीन मुलांना लागलेली अमली पदार्थ सेवनाची सवय या घटनांमुळे अनेक प्रश्न पालक आणि नागरिक यांच्यासमोर उभे राहिले आहेत.
वेंगुर्ला शहर आणि तालुका यांचा विचार करता नागरिक आणि शासकीय यंत्रणा यांची एकत्रित दक्षता समिती स्थापन करून अमली पदार्थांच्या व्यापाराला आळा घालण्यासाठी विशेष कृती आराखडा सिद्ध करून त्याची कार्यवाही करण्याची वेळ आली आहे. तालुकास्तरीय अमली पदार्थ विरोधी समितीची तात्काळ स्थापना करून प्रत्येक १५ दिवसांनी आढावा घेतला जावा. याविषयी तातडीने तहसील कार्यालयात बैठक घेण्यात यावी. याविषयी योग्य ती कार्यवाही त्वरित व्हावी अन्यथा पोलीस महासंचालक, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे दाद मागावी लागेल.
वेंगुर्ला शहरात चालणार्या अमली पदार्थांच्या व्यवहारांच्या ठिकाणांची सूची नागरिकांकडून पोलिसांना सादरवेंगुर्ला शहरात अमली पदार्थांच्या व्यवसायासाठी निमुसगा ते लाईट हाऊसपर्यंत, कन्याशाळा आवार, बी.एस्.एन्.एल्. कार्यालयाच्या मागे, कॅम्प स्टेडियम, तहसीलदार कार्यालयाच्या आजूबाजूचा परिसर, धावडेश्वर स्मशानभूमीचा परिसर, डच वखार, नगरपरिषद कचरा डेपो ते दाजी परब यांच्या बागेकडील रस्ता, होळकर मंदिराकडे जाणारा रस्ता, पॉवरहाऊस वीजमंडळ कर्मचारी वसाहतीजवळ, वेंगुर्ला बंदर, रहाटाची विहीर ते तांबळेश्वर स्मशानभूमी, कुंभवडे परिसर, पाटकर हायस्कूल परिसर या भागांत अमली पदार्थांचा व्यवहार चालतो, अशी माहिती या वेळी पोलीस निरीक्षकांना देण्यात आली आहे. (जनतेला अमली पदार्थांचा व्यवसाय कुठे चालतो याची सविस्तर माहिती मिळते, मग सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या पोलिसांना ती कशी मिळत नाही ? – संपादक) |
हे निवेदन आधार फाऊंडेशनचे सचिव नंदन वेंगुर्लेकर आणि काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते ईर्षाद शेख यांनी पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांना दिले. या निवेदनावर विविध स्तरांतील २६ जणांच्या सह्या आहेत.
संपादकीय भूमिकाअसे निवेदन का द्यावे लागते ? अमली पदार्थांची तस्करी होत असल्याचे पोलिसांच्या लक्षात कसे येत नाही ? कि माहिती असूनही ‘आर्थिक’ लाभासाठी दुर्लक्ष केले जाते ? असा प्रश्न जनतेला पडतो ! |