‘मुंबई पीस फेस्टिव्हल २०२२’ च्या विरोधात हिंदु जनजागृती समितीची पोलीस आयुक्तांकडे तक्रार !

अंधश्रद्धा पसरवणारा कार्यक्रम रहित करून आयोजकांवर गुन्हे नोंदवण्याची मागणी !

मुंबई, १४ मे (वार्ता.) – महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असतांनाही चमत्काराचे खोटे करणारा ‘मुंबई पीस फेस्टिव्हल २०२२’ हा कार्यक्रम १९ मे या दिवशी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे आयोजित करण्यात आला आहे.

हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणे आणि अंधश्रद्धा पसरवणे या कार्यक्रमाच्या विरोधात १३ मे या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असतांनाही अंधश्रद्धा पसरवणार्‍या कार्यक्रमाला अनुमती कशी ? – हिंदु जनजागृती समिती

समितीने केलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, धर्माच्या नावाखाली धादांत खोटे प्रकार दाखवून जनतेच्या डोळ्यांत धूळफेक, तसेच अंधश्रद्धेला प्रोत्साहन दिले जात आहे. महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अर्थात ‘महाराष्ट्र नरबळी आणि अन्य अमानुष, अघोरी अन् दुष्कर्म प्रथा अन् काळी जादू अधिनियम २०१३’ हा कायदा लागू आहे. असे असतांना या कार्यक्रमाविषयी असाध्य रोग, जीवनातील विविध समस्या दूर करणे अशा स्वरूपाचे अवैज्ञानिक दावे केले जात आहेत. अंधश्रद्धा पसरवणार्‍या अशा कार्यक्रमामध्ये अनेक हिंदूंना धर्मांतरीत केल्याच्या घटनाही घडतात. ‘महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असतांनाही अंधश्रद्धा पसरवणार्‍या अशा कार्यक्रमाला अनुमती कोणत्या आधारावर दिली ?’, अशी विचारणा हिंदु जनजागृती समितीने केली आहे.

हा कार्यक्रम रहित करून आयोजक, पाद्री बसिंदर सिंह आणि या कार्यक्रमाचे विज्ञापन करणारे हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार राखी सावंत, जॉनी लिव्हर यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची मागणी समितीने केली आहे. यापूर्वी १२ मे या दिवशी हा कार्यक्रम होणार होता; मात्र तो रहित करण्यात आला.

समितीने केलेली तक्रार –

(तक्रार वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा)

संपादकीय भूमिका

धर्मरक्षणासाठी सतर्क आणि तत्पर असणार्‍या हिंदु जनजागृती समितीचा आदर्श अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांनीही घ्यावा !