झळा या लागल्या जिवा..

भारतात उन्हाळा चालू आहे. गेल्या काही वर्षांत निसर्गचक्र बिघडलेले दिसत आहे. पावसाळ्यात दक्षिणेकडील आणि पूर्वेकडील काही राज्ये वगळता देशात उन्हाळाच असल्याचे दिसून येतो. हिवाळा उत्तर भारतातील काही राज्यांत असतो. आता उन्हाळा असतांना संपूर्ण देशात उष्णतेची लाट आली आहे. या लाटेत प्रत्येक जण तप्त होत आहे; मात्र यात असेही जीव आहेत, ज्यांना उष्णता काय असते, हे ठाऊक नाही. जे वातानुकूलित घरात रहातात, वातानुकूलित गाडीतून जातात, वातानुकूलित कार्यालयात बसतात, त्यांना याच्या झळा लागत नाहीत. यामधील मोठी संख्या ही ‘या उष्णतेवर उतारा शोधायला हवा’, असे सांगणाऱ्यांचीच आहे, असेही म्हटले जाते; म्हणजे प्रशासकीय अधिकारी, शासनकर्ते, उद्योगपती आदी लोक अशा जीवनशैलीत जगत असतात. त्यांनी वातावरणातील उष्णता न्यून करण्यावर ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना काढणे आवश्यक आहे; मात्र त्यांच्याकडून तसे होत नसल्याने केवळ भारतच नव्हे, तर संपूर्ण पृथ्वीवरील उष्णतेत वाढ होत आहे. ही वाढ अशीच कायम राहिली, तर पुढील काही वर्षांत पृथ्वीवर जीवसृष्टी नष्ट होण्याचा धोका आहे. केवळ प्रलय आल्यामुळेच जीवसृष्टी नष्ट होते, असे नाही, तर उष्णतेमुळेही ही गोष्ट होऊ शकते, हे लक्षात घेतले पाहिजे. भारतीय हवामान विभागाचेच म्हणणे आहे, ‘भूमीवरील आणि समुद्राचे तापमान वाढल्याने जगभरात वादळ, अतीवृष्टी अन् दुष्काळ यांचा प्रकोप वाढेल. भूमीचा ओलावा आणि क्षमता अल्प होईल. याचा थेट परिणाम अन्न सुरक्षेवर होईल. हिमनद्या वितळतील. पुराचा धोका निर्माण होईल. पाऊस न झाल्यास दुष्काळ पडेल. अन्न आणि जल संकट निर्माण होईल. हे पालट अत्यंत वेगाने होत आहेत. हवामानातील पालट रोखण्याविना बचावाचा कोणताच मार्ग नाही.’

उष्णतेला उत्तरदायी वीज !

आता हवामानातील पालट रोखण्यासाठी गेल्या वर्षापासून प्रयत्न चालू आहे. लोकांमध्ये जागृती करण्याचाही प्रयत्न होत आहे; मात्र प्रश्न असा आहे की, याला किती जणांनी गांभीर्याने घेतले आहे ? पृथ्वीवर उष्णता निर्माण होण्याचे जे स्रोत आहेत, त्यावर केली जाणारी उपाययोजना युद्ध पातळीवर होत आहे का ? याचे जर उत्तर पाहिले, तर ‘नाही’ असेच आहे. ‘ते शक्यही नाही’, अशाच मानसिकतेतून उत्तरदायी लोक त्याकडे पहात आहेत; कारण ज्यावर उपाययोजना काढायला पाहिजे, त्याच्यापैकी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोळशापासून होणारी वीजनिर्मिती, वातानुकूलित यंत्रणा, वाहने आणि उद्योगधंदे या मुख्य गोष्टी आहेत. जगभरातील वातानुकूलित यंत्रणा बंद झाली, तर पृथ्वीवरील ४५ टक्के विजेचा वापर अल्प होईल. म्हणजे वीजनिर्मिती अल्प होईल. ती अल्प झाली की, त्यासाठी लागणाऱ्या कोळशाचा वापर अल्प होईल आणि त्यामुळे होणारे प्रदूषण अन् उष्णता अल्प होईल. एका विजेमुळेच कितीतरी प्रमाणात उष्णता आणि प्रदूषण निर्माण होत आहे. ज्या विजेमुळे आपल्याला लाभ मिळतात, त्या विजेमुळे होणारी हानी किती मोठी आहे, हे लक्षात घ्यायला हवे. पुढील काही वर्षांत त्याचा वापर अल्प करायचा म्हटला, तर ते अशक्यच आहे. उलट जगातील इंधनाचा साठा कधीतरी संपणार, यामुळे सध्या वाहने विजेवर चालवण्याचा प्रयत्न केला जात आहे; म्हणजेच अधिक वीजनिर्मिती करावी लागणार. हे एकीकडे चालू असतांना दुसरीकडे भारतात कोळशाच्या टंचाईमुळे काही राज्यांतील वीजनिर्मिती ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे कधीतरी होणारच असल्याने विदेशात औष्णिक वीजनिर्मिती केंद्रे आहेत. भारतात अशी पुष्कळच अल्प केंद्रे आहेत.

ऑक्सिजनची निर्मिती कशी होणार ?

जगातील उष्णतावाढीमागे सर्वांत महत्त्वाचे कारण कार्बनडाय ऑक्साईड आहे. पूर्वी पृथ्वीवर दाट जंगल होते. मनुष्याने कथित विकासाच्या नावाखाली आणि लोकसंख्या वाढीमुळे ही जंगले नष्ट करून तेथे काँक्रिटची जंगले निर्माण केली. झाडे वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईड शोषून घेऊन ऑक्सिजन उत्सर्जित करतात. आता जगात इतक्या मोठ्या प्रमाणात कार्बनडाय ऑक्साईड उत्सर्जित होतांना ते शोषून घेऊन ऑक्सिजन सोडणारी वनेच नष्ट झाल्यामुळे या कार्बनडाय ऑक्साईडचे वातावरणातील प्रमाण वाढतच आहे आणि त्यामुळे उष्णता निर्माण होत आहे. ‘मनुष्याने विज्ञानाद्वारे प्रगती केली’, असे म्हटले जाते; मात्र मनुष्याला अद्याप कार्बनडाय ऑक्साईड शोषून मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन उत्सर्जित करणारे यंत्र बनवता आलेले नाही. काही रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट असले, तरी त्याला मर्यादाच आहे, हे लक्षात घ्यायला हवे. म्हणजे ‘विज्ञानाने प्रगती झाली कि विज्ञान मनुष्याला आणि या जीवसृष्टीला विनाशाकडे नेत आहे ?’, याचा विचार कधी होणार ?, हाच मोठा प्रश्न आहे. सध्याची जगाची जीवनशैली पहाता उष्णता निर्माण होण्याचे स्रोत नष्ट करणे अशक्यच आहे. त्यामुळे प्रथम जीवनशैली पालटणे आवश्यक आहे. औद्योगिक क्रांतीच्या पूर्वी संपूर्ण जगात वीज नव्हती. त्यामुळे विजेवर चालणारे उद्योग आणि यंत्रे नव्हती. त्यामुळे निसर्ग स्वच्छ होता. कोरोनाच्या २ वर्षांत आपण यातील बहुतेक गोष्टी थांबल्यामुळे स्वच्छ निसर्ग सर्वांनाच म्हणजे जगभरातील लोकांना अनुभवायला मिळाला होता. त्याच्या असंख्य घटना दिसून आल्या होत्या. म्हणजेच काय तर सर्व ठप्प झाले, तर पृथ्वीचे रक्षण होऊ शकते. जर असे करायचे असेल, तर जीवनशैलीच पालटावी लागेल आणि ही उत्क्रांती असेल; मात्र ही जीवनशैली पालटणे अशक्य नाही.

जीवनशैली पालटण्यासाठी मनुष्याला प्रचंड त्याग करावा लागणार आहे. साधना करणाऱ्या व्यक्तीला त्याग करण्यास कोणतीही समस्या नसते; मात्र ज्याला उपभोग घेण्यात अधिक आवड असते, त्याला अवघड जाते. जीवसृष्टीचे रक्षण करण्यासाठी साधनेतून निर्माण होणारा त्याग आता अत्यंत आवश्यक ठरणार आहे. अशा त्यागी जिवांचे रक्षण निसर्ग करील, यात शंका नाही; कारण हिंदु धर्मानुसार निसर्गातही देव आहे !

हवामान पालटामुळे होणारा जीवसृष्टीचा विनाश रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न हवेत !