अमेरिकी काँग्रेस सदस्याच्या पाकव्याप्त काश्मीर दौर्‍याचा भारताकडून निषेध

नवी देहली – अमेरिकन काँग्रेसच्या महिला सदस्या इल्हन ओमर यांनी पाकव्याप्त काश्मीरचा दौरा केला असून भारताने त्याचा निषेध केला आहे. ‘यातून ओमर यांची संकुचित मानसिकता दिसून येते’, असे भारताने म्हटले आहे. भारताच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी पत्रकारांशी बोलतांना ओमर यांच्या या दौर्‍यावर टीका केली.
ओमर सध्या पाकच्या ४ दिवसांच्या दौर्‍यावर आहेत.

बागची म्हणाले की, भारतीय संघराज्याचा भाग असलेल्या जम्मू-काश्मीरचा काही भाग पाकने बळकावला आहे आणि त्याच भागाचा ओमर यांनी दौरा केल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. या दौर्‍यामुळे भारताच्या प्रादेशिक एकात्मकतेचे तसेच सार्वभौमत्वाचे उल्लंघन होत असल्यामुळे आम्ही त्याचा निषेध करत आहोत.

संपादकीय भूमिका

भारत किती दिवस असा निषेध करत बसणार ? आता शाब्दिक विरोधापुरते सीमित न रहाता पाकव्याप्त काश्मीरवर नियंत्रण मिळवण्यासाठी भारताने ठोस पावले उचलावीत, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !