ख्रिस्ती महिलांना ‘लव्ह जिहाद’मध्ये अडकवण्यासाठी अनेक प्रयत्न होत आहेत !

केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन् यांचे चर्चच्या कार्यक्रमात विधान !

कन्नूर् (केरळ) – चर्चच्या बिशपांनी ‘जिहाद’ या शब्दाचा उच्चार जरी केला, तरी त्यांच्या विरोधात अनेक ठिकाणी गुन्हे नोंद होतात. ‘लव्ह जिहाद’विषयी चर्चच्या नेतृत्वाने बोलायचे नाही, तर मग कोण बोलणार ? ख्रिस्ती महिलांचे धर्मांतर करण्याचे अनेक प्रयत्न होत आहेत. त्यांना ‘लव्ह जिहाद’मध्ये अडकवण्याचे अनेक पुरावे यापूर्वी समोर आले आहेत, असे विधान केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन् यांनी चर्चच्या एका कार्यक्रमात केले. ‘नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार चर्चच्या या प्रश्‍नाकडे गांभीर्याने बघत आहे’, असेही ते या वेळी म्हणाले.

मुरलीधरन् पुढे म्हणाले की, इस्लामी आतंकवादामुळे जागतिक स्तरावर ख्रिस्ती धर्माची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. इराक, सीरिया आणि श्रीलंका येथील ख्रिस्ती धर्मियांचे मोठ्या प्रमाणात रक्त सांडले आहे. एकीकडे पोप फ्रान्सिस सर्वांना प्रेम आणि सौहार्द यांचे आवाहन करत असतांना, इस्लामी कट्टरतावाद्यांनी वर्ष २०१८ मध्ये ऐन ‘इस्टर’ (ख्रिस्ती धर्मियांचा एक सण) सणाच्या दिवशी श्रीलंकेत अनेक ख्रिस्त्यांची हत्या घडवून आणली होती.

संपादकीय भूमिका

केरळमध्ये अनेक ख्रिस्ती तरुणींना धर्मांधांकडून लव्ह जिहादमध्ये अडकवून त्यांतील काही जणींना जिहादी आतंकवादी कारवायातही सहभागी करून घेण्यात आल्याचे, तसेच इस्लामिक स्टेटमध्ये त्यांना भरती केल्याचे यापूर्वीच समोर आले आहे. केंद्रीय मंत्र्यांनी हा प्रकार रोखण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे !