इस्लामी पद्धतीचे ‘हलाल प्रमाणपत्र’ देणे, हे धर्मनिरपेक्षतेच्या विरुद्ध ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रत्नागिरीत पार पडले एक दिवसीय प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन !

रत्नागिरी, ६ एप्रिल (वार्ता.) – ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेला समांतर अशी स्वतंत्र इस्लामी अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे कारस्थान इस्लामी संघटना करत आहेत. हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे. कुराण या धर्मग्रंथात हलाल अर्थव्यवस्थेविषयी कुठेही स्पष्ट उल्लेख नाही. देशात आहार उत्पादनांविषयी प्रमाणपत्र देण्यास एफ्.एस्.एस्.ए.आय. (भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण) आणि एफ्.डी.ए.(अन्न आणि औषध प्रशासन) यांसारख्या अधिकृत सरकारी संस्था असतांना पैसे घेऊन इस्लामी पद्धतीचे प्रमाणपत्र देणे, हे धर्मनिरपेक्षतेच्या विरुद्ध आहे आणि देशाच्या बहुसंख्यांक उद्योजकांवर, वंशपरंपरेने मांसाचा व्यापार करणार्‍या हिंदु खाटीक समुदायावर केलेला अन्याय आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले. ३ एप्रिल या दिवशी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचे एक दिवसीय प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन शहरातील अंबर सभागृहात झाले. त्या वेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर सद्गुरु सत्यवान कदम, दापोली येथील ह.भ.प. किशोर महाराज चौगुले आणि श्री. मनोज खाडये उपस्थित होते.

व्यासपिठावर डावीकडून ह.भ.प. किशोर महाराज चौगुले, सद्गुरु सत्यवान कदम आणि श्री. मनोज खाडये अन् समोर वेदमंत्रपठण करतांना पुरोहित श्री. प्रसाद सहस्रबुद्धे आणि श्री. मयुर जोशी

अधिवेशनाच्या प्रारंभी पुरोहित श्री. प्रसाद सहस्रबुद्धे आणि श्री. मयुर जोशी यांनी वेदमंत्रपठण केले. त्यानंतर हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी अधिवेशनाच्या निमित्ताने पाठवलेल्या संदेशाचे वाचन सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम यांनी केले. त्यानंतर हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद गादीकर यांनी अधिवेशनाचा उद्देश सांगितला. या अधिवेशनाचे सूत्रसंचालन कु. कृपाली भुवड आणि कु. नारायणी शहाणे यांनी केले. या प्रांतीय हिंदु अधिवेशनाला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते.

मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

श्री. मनोज खाडये पुढे म्हणाले की, देशाच्या बहुसंख्यांक उद्योजकांच्या, तसेच वंशपरंपरेने मांसाचा व्यापार करणार्‍या हिंदु खाटीक समुदायाच्या आर्थिक हिताचे रक्षण करणार्‍या राज्यघटनेच्या कलम ४६ चे हे उल्लंघन आहे. राज्यघटनेने दिलेल्या स्वातंत्र्याविषयी निधर्मीवादी सातत्याने टाहो फोडत असतात; मात्र धर्मनिरपेक्ष भारत सरकारच्याच भारतीय पर्यटन विकास महामंडळ, एअर इंडिया, तसेच रेल्वे केटरिंग या सर्व संस्था केवळ हलाल मांस पुरवठा करणार्‍यांनाच कंत्राट देतात. भारतीय लोकशाहीचे सर्वोच्च स्थान असणार्‍या संसदेतील भोजनव्यवस्थाही रेल्वे केटरिंगकडे आहे. तिथेही बहुसंख्य हिंदूंना स्वतःच्या धार्मिक आधारानुसार मांस खाण्याचे स्वातंत्र्य नाही. हिंदूंनी अशा सरकारी संस्थांना जाब विचारला पाहिजे, तसेच जोपर्यंत ते धार्मिक आधारानुसार आहार उपलब्ध करून देत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या खाद्यपदार्थांवर बहिष्कार टाकायला हवा.

हलाल आणि झटका मांस यांतील भेद !

हलाल मांस म्हणजे प्राण्यांचे तोंड मक्केच्या दिशेला करून त्यांच्या गळ्याची नस चिरली जाते आणि त्यांना तडफडत मरू दिले जाते. त्यात प्राण्यांचे रक्त मोठ्या प्रमाणात वहाते. याउलट हिंदु किंवा शीख धर्मांमध्ये ‘झटका’ पद्धतीने प्राण्यांची हत्या केली जाते. त्यात प्राण्यांची मान एकाच घावात कापली जात असल्याने त्यांना अल्प प्रमाणात त्रास होतो.

शिकलेले कृतीत आणतो, तो खर्‍या अर्थाने शिकतो ! – सद्गुरु सत्यवान कदम

सद्गुरु सत्यवान कदम

आताचा काळ हा संधीकाळ आहे. संधीकाळात केलेल्या साधनेचा अनेक पटींनी लाभ होतो. भगवंताचे वचन आहे, ‘माझ्या भक्तांचा नाश होणार नाही.’ भगवंत भक्ताचे रक्षण करतो, यासाठी आपल्याला भगवंताचे भक्त व्हायला पाहिजे. भक्त प्रल्हाद या एका भक्तासाठी भगवंताला अवतार घ्यावा लागला. ही भक्तीची शक्ती आहे. या प्रांतीय अधिवेशनातून सर्वांनाच प्रेरणा मिळाली आहे. उत्साह जाणवत आहे. अनेक गोष्टी शिकायलाही मिळाल्या. शिकलेले आपण कृतीत आणण्याचा प्रयत्न करूया. शिकलेले कृतीत आणतो, तो खर्‍या अर्थाने शिकतो.

असे अधिवेशन तालुकास्तरावर व्हायला हवे ! – ह.भ.प. नंदकुमार कालेकर महाराज, दापोली

ह.भ.प. नंदकुमार कालेकर महाराज

आपण सर्वांनी पवित्र आणि अलौकिक कार्यात सहभाग नोंदवला. प्रत्येकाच्या अंतर्मनामध्ये आपल्या हिंदु धर्माविषयीची स्फूर्ती जागृत होत होती. अशा प्रकारचे अधिवेशन तालुका स्तरावर व्हायला हवे, जेणेकरून सर्वांपर्यंत हा विषय पोचेल. हा विषय तळा-गाळातील हिंदूंपर्यंत पोचायला हवा. जोपर्यंत तळातील हिंदूंपर्यंत हा विषय पोचत नाही, तोपर्यंत आध्यात्मिक क्रांती घडणे अशक्य आहे.

हिंदूबहुल धर्मनिरपेक्ष देशात हिंदूंवर होणारे अन्याय थांबवण्यासाठी धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्र’च हवे ! – विनय पानवळकर, हिंदु जनजागृती समिती

श्री. विनय पानवळकर

भारत अनादी अनंत काळापासून ‘हिंदु राष्ट्र’च आहे. याच भूमीत हिंदूंना वंदनीय असे श्रीराम-कृष्णादी अनेक अवतार झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्यही याच भूमीतले. स्वातंत्र्यानंतर मुसलमानांनी धर्माच्या आधारावर पाकिस्तान आणि बांगलादेश निर्माण केले गेले आणि दुर्दैवाने भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आले. या ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘सर्वधर्मसमभावा’च्या नावाखाली अन्य पंथियांना सोयीसुविधा पुरवल्या जातात आणि देशातील बहुसंख्य हिंदूंवर मात्र अन्याय होत आहे. सर्व सरकारी धोरणे, अनुदान, संरक्षण अल्पसंख्यांकांसाठीच आहे. भारतात राहूनही ‘वन्दे मातरम्’ आणि ‘भारत माता की जय’ असे म्हणायला नकार देणार्‍या मुसलमानांना हज यात्रेसाठी, शाळा-महाविद्यालयांत शिकण्यासाठी, मदरशातील मौलवींना अनुदान दिले जात आहे आणि हिंदूंच्या वेदपाठशाळा मात्र दुर्लक्षित केल्या जातात, गुरुकुले बंद झाली आहेत, कुंभमेळ्याला येणार्‍या हिंदु भाविकांना कर लागू केला जातो. देशातील अन्य धर्मियांची प्रार्थना स्थळे शासनाच्या कह्यात नाहीत, केवळ हिंदूंची मंदिरे आहेत. आज आपल्या देशाच्या समानतेच्या तत्त्वातील ही असमानता आहे. धर्मनिरपेक्ष देशात ‘हिंदूंना कायदा आणि अल्पसंख्यांकांना फायदा’ असे समीकरण झाले आहे. अशा धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदूंवर होणारे अन्याय थांबवण्यासाठी धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्र’च हवे.

हिंदु धर्म आणि आपल्या भारत देशाला लाभलेला सांस्कृतिक वारसा जतन करणे हे आपले कर्तव्य ! – संजय जोशी, हिंदु जनजागृती समिती

श्री. संजय जोशी

भारताला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे लोटली; पण स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर झाले नाही. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या प्रजेची पितृवत काळजी घेत. छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका असणार्‍या गड-दुर्गांकडे पुरातत्व विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. भारताच्या स्वातंत्र्यामध्येही मोलाचा वाटा असणारे आणि ज्यांना आपण ‘लोकमान्य’ अशी पदवी दिली, अशा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे रत्नागिरी येथील स्मारकही असेच दुर्लक्षित आहे. असे अनेक गडकोट, स्मारके, नद्या, समुद्र यांचीही अशीच दुरवस्था झाली आहे. आपल्या हिंदु धर्माला आणि देशाला लाभलेला हा सांस्कृतिक वारसा जतन करणे, हे आपले कर्तव्य आहे. यासाठी स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर होणे आवश्यक आहे.

आध्यात्मिक उन्नतीसाठी व्यष्टी साधनेसह समष्टी साधना आवश्यक ! – सम्राट देशपांडे, सनातन संस्था

श्री. सम्राट देशपांडे

सततच्या आनंदासाठी साधना करणे आणि गुरुकृपा सातत्याने असणे आवश्यक आहे. कर्म, भक्ती, ज्ञान, ध्यान आदी कोणत्याही योगमार्गाने साधना केली, तरी अध्यात्मात प्रगती होण्यासाठी गुरूंविना तरणोपाय नसतो. जलद गुरुप्राप्ती व्हावी आणि गुरुकृपा सातत्याने होत रहावी, यासाठी करावयाची साधना म्हणजे गुरुकृपायोगानुसार साधना. साधनेची व्यष्टी साधना आणि समष्टी साधना अशी दोन अंगे आहेत. व्यष्टी साधनेच्या आठ अंगांना ‘अष्टांग साधना’ म्हणतात. यामध्ये स्वभावदोष निर्मूलन, अहं-निर्मूलन यांसाठी प्रयत्न करणे, नामजप, सत्संग, सत्सेवा, भावजागृती, सत्साठी त्याग, प्रीती यांचा समावेश होतो.

आपत्काळातून तरून जाण्यासाठी साधनाच हवी ! – डॉ. (सौ.) साधना जरळी, सनातन संस्था

डॉ. (सौ.) साधना जरळी

सध्याची परिस्थिती फार भयावह आहे. सुरक्षिततेची भावनाच नाही. कोरोना संसंर्गाच्या कालावधीमध्ये आपण आपत्काळाची छोटीशी झलक अनुभवली. हा आपत्काळ अचानक आलेला नाही. मागील काही वर्षांमध्ये झालेल्या अधर्मामुळे हा आपत्काळ आला आहे. धर्मशिक्षण दिले जात नसल्याने अधर्म बळावू लागला. पाश्‍चात्त्य संस्कृतीनुसार आचरण करून आपण आपली दैवी, निसर्गाला पूरक अशी हिंदु संस्कृती विसरलो. अनेक भविष्यवत्त्यांनी येणार्‍या आपत्काळाविषयी सांगितले आहे. या आपत्काळातून तरून जाण्यासाठी ‘साधना करणे’ हाच एकमेव पर्याय आहे.

अधिवेशनाला उपस्थित असलेले रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील हिंदुत्वनिष्ठ

अधिवेशनातील हिंदुत्वनिष्ठांचे मनोगत

१. ह.भ.प. दादा रणदिवे, लांजा – जीवन कसे जगावे ? हे आज शिकता आले. धर्माचे रक्षण करतांना सद्गुरु प्राप्त झाले की, जीवनात कोणतीही उणीव रहात नाही. अंतःकरणातील ज्योत प्रज्वलित होते.

२. ह.भ.प. संतोष महाराज वनगे, सावर्डे – जिथे ईश्‍वराचे अधिष्ठान असेल, तिथे साधकाला किंवा शिष्याला कोणतीही चिंता रहात नाही. गुरु शिष्याला घेऊन पुढे जातात, शिष्याला प्रेरणा देतात. धर्माला कितीही ग्लानी आली असली, तरी गुरु ती दूर करतात.

३. ह.भ.प. शाम महाराज गायकर, दापोली – धर्माचे देणे काय आहे ? ते ओळखले तरी कार्य होते. असे कार्य होण्यासाठी त्यामध्ये सातत्य असणे आवश्यक आहे. हिंदु जनजागृती समितीने हे सातत्य टिकवले, म्हणूनच समितीने हाती घेतलेले कार्य पूर्ण होत आहे.

४. श्री. दीपक कांबळी, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग – प्रेरणादायी मार्गदर्शन मिळाले. आपल्याला संघटित होण्याची आवश्यकता आहे, यासाठी आम्ही सिद्ध आहोत. या पुढे हिंदूंनी अन्यायाच्या विरोधात मोठा लढा दिला पाहिजे.

५. श्री. अविनाश आंब्रे, लोटे – आजच्या अधिवेशनात ‘हलाल’ विषयी माहिती मिळाली. फार मोठे संकट आपल्यासमोर उभे असल्याची जाणीव झाली. हे संकट गुप्त पद्धतीने आणि पद्धतशीरपणे नियोजनपूर्वक आणले गेले आहे, असे लक्षात आले. राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील विषय विविध आंदोलनांमधून निश्‍चितपणे येतील आणि हे कार्य मनापासून करण्याचा प्रयत्न करीन.

६. श्री. प्रशांत परब, चिपळूण – कौरव-पांडव यांच्या युद्धात कौरव १०० असूनही जिंकू शकले नाहीत, ५ पांडव जिंकले. हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून चांगले मान्यवर आपल्याला लाभले आहेत, त्यांच्यावर विश्‍वास ठेवून अधिकाधिक धर्माचे कार्य करायला हवे. मिळालेल्या ज्ञानाची शिदोरी जेवढी लोकांमध्ये वाटता येईल तेवढी वाटू. आज आमच्या घरात गीता नाही, मुलांना ती वाचून दाखवली नाही, ही मोठी खंत आहे. त्यासाठी प्रयत्न करूया.

७. श्री. दिलीप दिवेकर, सोनगाव, खेड – आजच्या अधिवेशनातून आपल्यावर होणार्‍या अन्यायाविषयी समजले. आज सांगितलेल्या विषयासंदर्भात मनन करून ते आचरणात आणण्याची ग्वाही देतो.

आभार

अधिवेशनासाठी अंबर सभागृह विनामूल्य उपलब्ध करून दिल्याविषयी सभागृहाचे मालकांचे आभार मानण्यात आले.

अधिवेशनात सहभागी संघटना

राजे प्रतिष्ठान, चिपळूण; श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान; बजरंग दल, चिपळूण; वारकरी संप्रदाय, लांजा; पाटीदार समाज, खेड; दापोली तालुका वारकरी संप्रदाय; हिंदु राष्ट्र सेना; आम्ही फक्त शिवभक्त; पतंजलि योग समिती; महालिंग मित्रमंडळ, धामणंद; श्री मरुधर विष्णु समाज सेवा संघ, रत्नागिरी.

अधिवेशनातील सहभागी झालेल्या काही हिंदुत्वनिष्ठांचे अभिप्राय !

१. ह.भ.प. किशोर महाराज चौगुले, दापोली :  सर्व हिंदु बांधवांनी आपापल्या संघटना, संप्रदाय, पंथ आणि समाज अशा एकाच मर्यादेपर्यंत न रहाता हिंदु राष्ट्रासाठी एकत्र येणे आवश्यक आहे.

२. श्री. निलेश नाटेकर, बांदा- सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग : अधिवेशनाचा हेतू आणि उद्देश प्रेरणादायी आहे. आपण धर्मासाठी काही तरी करावे असे वाटले. साधकांच्या संपर्कात रहाण्यासाठी प्रयत्न करीन. हिंदु राष्ट्रासाठी जे दायित्व मिळेल ते पार पाडेन.

३. श्री. संजय कोळंबकर, देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग : हिंदु जनजागृती समिती मागील अनेक वर्षे हिंदूंमध्ये धर्माभिमान चेतावण्याचे प्रयत्न करत आहेत. या कार्यात मला जमेल तेवढा सहभाग मी घेणार आहे. महिला आणि मुलांमध्ये जागृती केली पाहिजे. यासाठी घरोघरी आणि मित्रांजवळ जाऊन प्रबोधन  करणार.

४. श्री. सचिन राजाराम चंदुरकर, राजापूर : धर्म विसरलेला हिंदू अशा अधिवेशनातून जागृत होईल आणि तो अन्य हिंदूंनाही जागृत करेल. हे अधिवेशन नसून भगवान श्रीकृष्णाचे सुनियोजित कार्य असून त्याची हिंदूंवर कृपादृष्टी आहे. हिंदु राष्ट्र ही भगवान श्रीकृष्णाची इच्छा आहे आणि त्यासाठी आम्ही धर्मप्रेमी नक्कीच कृतीशील होऊ. हे अधिवेशन म्हणजे हिंदु राष्ट्राकडे वाटचाल आहे, असे मला वाटले. धर्मजागृती आणि प्रशिक्षण वर्ग घेण्यासाठी प्रयत्न करीन.

५. श्री. संदीप शिवराम मांडवकर, दापोली, जि. रत्नागिरी : हिंदु धर्माची होणारी अवहेलना आणि हिंदु धर्मावरील आघात वेळीच थांबवण्यासाठी लोकांमध्ये हिंदु धर्माची महानता पोचवण्याचे कार्य समिती करत आहे. मी हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी होणार आहे.