कॉर्डेलिया क्रूझ ड्रग प्रकरण
मुंबई – कॉर्डेलिया क्रूझ ड्रग प्रकरणातील अमली पदार्थविरोधी पथकाचे पंच आणि साक्षीदार प्रभाकर साईल यांचे १ एप्रिलच्या रात्री उशिरा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. साईल यांचे अधिवक्ता तुषार खंदारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चेंबूरमधील त्यांच्या घरी निधन झाले. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अभिनेते शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला सोडण्यासाठी प्रभाकर यांनी अमली पदार्थविरोधी पथकाचे अधिकारी समीर वानखेडे आणि केपी गोसावी यांच्यावर २५ कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप केला होता. प्रभाकर यांच्या आरोपाच्या आधारे महाराष्ट्र सरकारचे अल्पसंख्यांक कल्याण मंत्री नवाब मलिक यांनीही समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते.
आर्यन खान याच्याशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात प्रभाकर हे अमली पदार्थविरोधी पथकाचे स्वतंत्र साक्षीदार होते. धाडसत्राच्या वेळी स्वतः क्रूझवर उपस्थित असल्याचा दावा त्यांनी केला होता. ते म्हणाले होते की, पथकाने माझ्याकडून पंचनामा पेपर सांगून कोऱ्या कागदावर बळजोरीने स्वाक्षऱ्या करून घेतल्या होत्या. मला आर्यन किंवा इतर कुणाच्या अटकेविषयी माहिती नव्हती.