अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांची उणीदुणी काढण्यात व्यस्त ! – परशुराम उपरकर, राज्य सरचिटणीस, मनसे

परशुराम उपरकर, राज्य सरचिटणीस, मनसे

कणकवली – राज्याच्या अधिवेशनात आमदारांचे विविध प्रश्‍न, तसेच मतदारसंघासाठीचा विकासनिधी, सांघिक विकासकामे याविषयी मांडणी केली जाते; मात्र सध्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकमेकांची उणीदुणी काढली जात आहेत. लोकप्रतिनिधी कोट्यवधीची माया कशी जमा करतात, हे दाखवून देत जनतेची करमणूक केली जात आहे. त्यामुळे सध्या चालू असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सभागृहाची प्रतिष्ठा राखली जात नाही, अशी टीका मनसेचे राज्य सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली.

येथील मनसेच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत उपरकर बोलत होते. या वेळी परशुराम उपरकर म्हणाले, ‘‘सध्या वाढलेली महागाई, अडचणी या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्‍नांवर विधिमंडळात चर्चा होतांना दिसत नाही. प्रशासनातील अनेक अधिकारी निगरगठ्ठ झाले आहेत. संबधित खात्याच्या मंत्र्याला जे जमणार नाहीत, असे आर्थिक घोटाळे अनेक अधिकारी एकमेकांच्या संगनमताने करतात. हेही उघड होत आहे. त्यामुळे सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष, तसेच विरोधी भाजप हे पक्ष अपकीर्त होत आहेत. टक्केवारीच्या राजकारणात जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत प्राप्त झालेला निधी मागील वर्षी अखर्चित राहिला होता. यावर्षीही तशीच स्थिती आहे. रिक्त असलेली जिल्हा शल्यचिकित्सक, प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांची पदे भरण्यात सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. त्यांना जनतेच्या आरोग्याचे, तसेच इतर प्रश्‍नांचे काहीच वाटत नाही. त्यामुळे जनतेच्या विकासासाठी खर्च होणार्‍या निधीवर जनतेने स्वतः लक्ष ठेवून दर्जेदार काम करून घेणे आवश्यक आहे. (जनतेने लक्ष ठेवायचे, तर असले लोकप्रतिनिधी हवेत कशाला ? जनता अशा लोकप्रतिनिधींना निवडून देते, हीच जनतेची मोठी चूक आहे !- संपादक ) आता जनतेलाच या लोकप्रतिनिधींवर अंकुश ठेवावा लागेल, तरच काही प्रमाणाततरी परिस्थिती सुधारेल.