तिसरे महायुद्ध झाले, तर अणूबाँबचा वापर होईल ! – रशिया

आतापर्यंत अनेक संत, भविष्यवेत्ते तिसर्‍या महायुद्धाविषयी सांगत आहेत. त्यामुळे विनाशकारी अशा महायुद्धातून वाचण्यासाठी साधनाच करणे आवश्यक आहे, हे जाणा ! – संपादक


रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह

मॉस्को (रशिया) – तिसरे महायुद्ध झाल्यास त्यामध्ये अणूबाँबचा वापर होईल आणि ते फार विध्वंसक असेल, असे विधान रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी केले आहे. सर्गेई लावरोव्ह यांनी रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाचे समर्थन करतांना म्हटले की, युक्रेनला अण्वस्त्रे मिळाली, तर ती रशियासाठी फार धोकादायक ठरू शकतात. रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणामुळे पाश्‍चात्त्य देशांचा दबाव वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी २७ फेब्रुवारी या दिवशी अण्वस्त्रे डागणार्‍या दलास सिद्ध रहाण्याचा आदेश दिलेला आहे.

रशियाकडे किती अणूबाँब आहेत ?

रशियाकडे ६ सहस्र अणूबाँब असल्याचे सांगितले जात आहे. त्यामध्ये दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी शहरांवर टाकलेल्या अणूबाँबच्या संहारक शक्तीपेक्षा सहस्र पट शक्तीशाली अणूबाँब रशियाकडे आहेत. एखाद्या मोठ्या बॅगेत सहज मावतील, अशा आकाराचे, तसेच किरणोत्सर्ग अधिक होईल आणि उष्णतेमुळे विध्वंस अल्प होईल अशा प्रकारचे अणूबाँबही विकसित करण्यात आले आहेत.

अणूबाँब टाकण्याची सज्जता !

रशियाकडे १०० किलोमीटरपासून ते अगदी १० सहस्र किलोमीटरपेक्षा कितीतरी अधिक अंतरावर अचूक मारा करण्याची क्षमता असलेली विविध क्षेपणास्त्रे आहेत. ही क्षेपणास्त्रे एकाच वेळी विविध क्षमेतेचे अणूबाँब वाहून नेऊ शकतात. तसेच शत्रूराष्ट्रात घुसून अणूबाँब टाकणारी विशेष लढाऊ विमाने रशियाकडे आहेत. तसेच पाण्याखालून क्षेपणास्त्र डागत आक्रमण करू शकणार्‍या विविध अणू पाणबुड्याही रशियाकडे आहेत.