पळून जाण्यासाठी साहाय्य नव्हे, तर दारूगोळा हवा आहे !

युक्रेनच्या राष्ट्र्राध्यक्षांनी अमेरिकेला सुनावले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की

कीव (युक्रेन) – युक्रेनमध्ये युद्ध चालू आहे. या वेळी मला देशातून पळून जाण्यासाठी साहाय्य नको, तर युद्ध लढण्यासाठी दारूगोळा हवा आहे, येथून पळून साहाय्य नव्हे, अशा शब्दांत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी अमेरिकेला सुनावत अमेरिकेने देऊ केलेले साहाय्य नाकारले.

झेलेंस्की आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यामध्ये २५ फेब्रुवारीला सहाय्याविषयी सविस्तर चर्चा झाली. या वेळी बायडेन यांनी झेलेंस्की यांना युक्रेनमधून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी साहाय्य देऊ केले; मात्र झेलेंस्की यांनी रशियन सैनिकांचा प्रतिकार करण्याचा निर्धार व्यक्त केला, तसेच राजधानी कीवध्येच रहाणार असल्याचे ठामपणे सांगत अमेरिकेचे साहाय्य नाकरले. झेलेंस्की पुढे म्हणाले,‘‘आम्ही सर्व जण येथे आहोत. आम्ही सर्व येथे आमच्या देशाचे आणि स्वातंत्र्याचे रक्षण करत आहोत आणि कायम येथेच उभे राहू.’’

युक्रेनला अण्वस्त्र बनवू देणार नाही ! – रशिया

आमचा उद्देश युक्रेनवर नियंत्रण मिळवण्याचा नाही; मात्र रशियाच्या सुरक्षेशी कोणतही तडजोड केली जाणार नाही. आम्ही युक्रेनला कोणत्याही स्थितीमध्ये अण्वस्त्र बनवू देणार नाही, असे विधान रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या बैठकीत केले.

रशियाच्या रणगाड्यांना रोखण्यासाठी युक्रेनच्या सैनिकाने स्वतःला बाँबद्वारे उडवले !

रशियाच्या रणगाड्यांना रोखण्यासाठी युक्रेनच्या एका सैनिकाने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता एका पूलावर उभे राहून स्वतःला बाँबद्वारे उडवून दिले. यामुळे या ठिकाणी युक्रेनच्या सीमेला जोडणारा मुख्य रस्ताच रशियन रणगाड्यांसाठी बंद झाला आहे.

व्हायटली स्काकुन व्हॉलोडिमायरोव्हिच असे या सैनिकाचे नाव आहे. या सैनिकाला मरर्णोत्तर पुरस्कार देऊन त्याचा सन्मान करण्यात येणार असल्याचे युक्रेनच्या सैन्याने सांगितले.

अमेरिकेकडून युक्रेनला ३५० मिलियन डॉलर्सचे साहाय्य !

युद्धात युक्रेनला प्रत्यक्ष साहाय्य करण्यापासून माघार घेणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनला ३५० दशलक्ष डॉलर्स देण्याची घोषणा केली. अमेरिकेतील ‘व्हाईट हाऊस’ने याविषयी निवेदन प्रसिद्धीस दिले आहे.

रशियाकडून फेसबूकवर अंशतः बंदी !

रशियाच्या नागरिकांचे स्वातंत्र्य आणि अधिकार यांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत रशियाने फेसबूकवर अंशतः बंदी घातली आहे. फेसबूकवर चुकीची माहिती प्रसारित करण्यासाठी दबाव असल्याचाही आरोप रशियाने केला आहे.

सुमारे १ लाख युक्रेसवासियांनी देश सोडला !

रशियाच्या आक्रमणामुळे घाबरलेल्या सुमारे १ लाख युक्रेनवासियांनी देश सोडून पळ काढला आहे. या लोकांनी शेजारी देश असलेले पोलंड, रोमानिया, स्लोवाकिया, हंगेरी आणि मल्डोवा या देशांत आश्रय घेतला आहे. पोलंडने तर युक्रेनवासियांठी विस्थापितांच्या छावण्याही उभारल्या आहेत.

अधिकार्‍यांच्या सूचनेशिवाय सीमेवर जाऊ नका ! – भारतीय दूतावासाची सूचना

युक्रेनमधील भारतीय दूतावासाने २६ फेब्रुवारीला एक नियमावली जारी करून युक्रेनमधील भारतियांना दूतावासातील भारतीय अधिकार्‍यांच्या सूचनेविना कुठल्याही सीमेवरील चौक्यांवर न जाण्याची सूचना केली आहे.

रत्नागिरीतील ८ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले !

युक्रेनमध्ये रत्नागरी जिल्ह्यातील ८ विद्यार्थी अडकल्याची माहिती मिळाली आहे. त्यांपैकी ३ देवरूख येथील आहेत. यांतील काही विद्यार्थी खारकिव येथे वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. खारकिव मध्ये परिस्थिती चिघळली असून विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हालवण्यात आले आहे.

________________________

दुसर्‍या दिवशीच्या युद्धात युक्रेनचे १९८ नागरिक मारले गेल्याचे सांगितले जात आहे.

___________