वलसाड (गुजरात) येथे ‘माझा आदर्श नथुराम गोडसे’ याविषयावर वक्तृत्व स्पर्धा  

पालक आणि राजकीय पक्ष यांच्या विरोधानंतर विषय निवडणारा सरकारी अधिकारी निलंबित

वलसाड (गुजरात) – येथील सरकारी आणि खासगी शाळांमधील ५ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी कुसुम विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये ‘मारो आदर्श नथुराम गोडसे’ (माझा आदर्श नथुराम गोडसे) असा विषय होता. यामध्ये पंडित नथुराम गोडसे यांना आदर्श म्हणणार्‍या मुलाला पहिले पारितोषिक देण्यात आले. यामुळे वाद निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांचे पालक आणि काही राजकीय पक्ष यांनी याला विरोध केला आहे. गृहमंत्री हर्ष संघवी यांनी या संदर्भात चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. ‘संबंधितांवर कारवाई केली जाईल’ असे संघवी यांनी म्हटले आहे. सरकारने या प्रकरणी विषय निवडणार्‍या युवा विकास अधिकारी नीताबेन गवळी यांना निलंबित केले आहे.

गुजरात सरकारच्या युवा सेवा आणि सांस्कृतिक उपक्रम विभाग यांच्या अंतर्गत  जिल्हास्तरीय बाल प्रतिभा शोध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा कुसुम विद्यालय या विनाअनुदानित शाळेमध्ये घेण्यात आली. शाळेच्या अधिकार्‍यांनी सांगितले, ‘आम्ही केवळ कार्यक्रम आयोजित करण्यासाठी जागा दिली होती आणि शाळेतील कुणीही त्यात भाग घेतला नाही.’ मुख्याध्यापिका अर्चना देसाई यांनी सांगितले, ‘वक्तृत्व स्पर्धेचा विषय स्थानिक सरकारी कार्यालयाकडून देण्यात आला होता. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशावरूनच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.’

(म्हणे) ‘गांधी यांना मानता कि गोडसे यांची पूजा करता ?’ – काँग्रेसचा भाजपला प्रश्‍न

गांधी यांना मानणार्‍या काँग्रेसने गांधी यांच्या वधानंतर सहस्रो ब्राह्मणांच्या हत्या केल्याचा आरोप आहे. त्यांची घरे, दुकाने जाळण्यात आली, लुटण्यात आली. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देहलीमध्ये काँग्रेसवाल्यांकडून साडेतीन सहस्र शिखांची हत्या करण्यात आली. इतरांना प्रश्‍न विचारणार्‍या काँग्रेसने याचे प्रथम स्पष्टीकरण द्यावे ! – संपादक

काँग्रेसने टीका करतांना म्हटले, ‘भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इतिहास पालटण्याचा कट रचत आहेत. ‘गांधी यांना मानता कि गोडसे यांची पूजा करता ?’, असा प्रश्‍न भाजपला काँग्रेसवाल्यांनी विचारला आहे.