झारखंडमधील नौशाद शेख गेल्या ३ वर्षांपासून ४० लाख खर्च करून बांधत आहेत भगवान श्रीकृष्णाचे मंदिर !

हामीदपूर येथे रहाणारे नौशाद शेख बांधत असलेले भगवान श्रीकृष्णाचे मंदिर

रांची (झारखंड) – झारखंडमधील दुमका येथील हामीदपूर येथे रहाणारे नौशाद शेख हे ४० लाख खर्च करून भगवान श्रीकृष्णाचे मंदिर बांधत आहेत. ‘पार्थसारथी मंदिर’ या नावाने हे मंदिर बांधले जात आहे. वर्ष २०१९ पासून याचे बांधकाम चालू आहे.

१. नौशाद यांनी सांगितले की, एकदा मी बंगालमधील मायापूरला फिरायला गेलो होतो. त्या वेळी माझ्या स्वप्नात भगवान श्रीकृष्ण आले होते. भगवान श्रीकृष्णाने मला सांगितले, ‘मी स्वतः तुझ्या परिसरात बसलो आहे. मग तू मला भेटायला येथे का आलास ? तेथेच तू जा.’ यानंतर मी पार्थसारथी मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. इस्लाममध्ये गरजूंची सेवा करण्यास सांगितले आहे, तसेच ‘प्रत्येक धर्माचा आदर करा’, असेही म्हटले आहे. या मंदिरात १४ फेब्रुवारीला अभिषेक होणार आहे. या वेळी पिवळ्या वस्त्रांतील १०८ महिला ‘कलश यात्रा’ काढणार असून ५१ पुजारी संपूर्ण वैदिक मंत्रोच्चारांत हा विधी करणार आहेत. आतापासून मंदिराच्या आवारातच हवन करता येणार आहे. याशिवाय मंदिराच्या आवारात कीर्तन शेड, स्वयंपाकघर आणि पूजा करणार्‍या पुजार्‍यांसाठी स्वतंत्र खोली बनवण्यात येणार आहे.

२. हेतमपूर संस्थानमधील पुती महाराज यांनी ३०० वर्षांपूर्वी पार्थसारथीच्या पूजेला प्रारंभ केला होता. तेव्हा या ठिकाणी हेतमपूर संस्थानाचा दरबार असायचा. त्या काळात ते ‘जंगल महाल’ म्हणून ओळखले जात होते; मात्र संस्थान संपुष्टात आल्यानंतर येथील पूजेचं काम बंद पडले. ४ दशकांनंतर पार्थसारथी उपासना कादीर शेख, अबुल शेख आणि लियाकत शेख यांनी पुनरुज्जीवित केली. या तिघांच्या मृत्यूनंतर नौशाद शेख वर्ष १९९० पासून ही परंपरा पुढे चालवत आहेत.