‘इस्रायलकडून पॅलेस्टिनी नागरिकांवर अमानुष अत्याचार !’ – अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल

  • अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलने कधीच काश्मीरमधील हिंदूंवर धर्मांधांकडून झालेल्या अमानुष अत्याचारांचा अहवाल प्रसिद्ध का केला नाही, हे सांगील का ? – संपादक
  • श्रीलंकेमधील तमिळांवर श्रीलंकेच्या सैन्याकडून करण्यात आलेल्या अत्याचारांविषयी असा अहवाल का बनवण्यात आला नाही ? – संपादक

जेरुसलेम (इस्रायल) – लंडन येथील अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल या मानवाधिकारांसाठी कार्यरत असणार्‍या संस्थेने ‘इस्रायलकडून पॅलेस्टिनी नागरिकांवर अनन्वित अत्याचार करण्यात आले आणि त्यांना वर्णद्वेषी वागणूक देण्यात आली’, असा २११ पानांचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. इस्रायलव्याप्त पॅलेस्टिनी भागात सर्वेक्षण करून हा अहवाल बनवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

या अहवालात इस्रायलकडून पॅलेस्टिनी भूमीवर करण्यात आलेले अतिक्रमण, पॅलेस्टिनी नागरिकांच्या मालमत्तेची लुबाडणूक, अनेक पॅलेस्टिनी नागरिकांच्या निर्घृण हत्या, नागरिकांचे त्यांच्या इच्छेविरोधात करण्यात आलेले स्थलांतर आणि त्यांना नागरिकत्व देण्यास सातत्याने मिळणारा नकार, अशी अनेक सूत्रे मांडण्यात आली आहेत.

इस्रायलचा अहवालास विरोध

इस्रायलने म्हटले की, केवळ एका वर्षाच्या निरीक्षणाच्या आधारे अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलकडून करण्यात आलेले हे दावे इस्रायलची अपकीर्ती करण्यासाठी केले जात आहेत. इस्रायलविषयी जगातील इतर देशांचे मत कलुषित करण्यासाठी जाणीवपूर्वक या संस्थेकडून अपसमज पसरवले जात आहे, असा आरोप केला आहे.

दुसरीकडे इस्रायलमध्ये असलेले अमेरिकेचे राजदूत टाॅम नाइड्स यांनी हा अहवाल ‘हास्यास्पद’ असल्याचे ट्वीट करून त्यास विराेध दर्शवला आहे.