‘काश्मीरचा वाद चर्चेद्वारे सोडवला पाहिजे !’ – पाकचे पंतप्रधान इम्रान खान

  • काश्मीरचा प्रश्‍न पाकने बंदुकीच्या बळावर वर्ष १९४८ मध्ये निर्माण केला आहे आणि तो बंदुकीच्या बळावरच भारताने सोडवणे आवश्यक आहे. गेल्या ७५ वर्षांत पाकने चर्चेच्या नावाखाली भारताच्या डोळ्यात धूळफेक करून काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद निर्माण करून लक्षावधी लोकांची हत्या केली आहे, हे भारत विसरणार नाही ! – संपादक
  • आर्थिक डबघाईला गेलेल्या पाकला भारताशी आर्थिक हितसंबंध सुधारायचे आहेत, असे तो म्हणतो. जोपर्यंत पाकव्याप्त काश्मीर भारताला मिळत नाही, तोपर्यंत भारताने पाकशी कोणताच आर्थिक व्यवहार न करता त्याची अद्दल घडवली पाहिजे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते ! – संपादक
पाकचे पंतप्रधान इम्रान खान

इस्लामाबाद (पाकिस्तान) – दक्षिण आशियामध्ये स्थायी स्वरूपात शांतता निर्माण करणे, हे राजकीय धोरणावर अबलंबून आहे. सीमा प्रश्‍न आणि काश्मीर यांसारख्या प्रलंबित प्रश्‍नांवर चर्चेद्वारे, तसेच आंतरराष्ट्रीय कायद्याच्या आधारे तोडगा काढणे आवश्यक आहे, असे विधान पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले आहे. इम्रान खान चीनच्या दौर्‍यावर जात आहेत. या पार्श्‍वभूमीवर त्यांनी हे विधान केले आहे. चीनची राजधानी बीजिंगमध्ये शीतकालीन ऑलिंपिक ४ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहेत. त्याच्या उद्घाटनाला उपस्थित रहाण्यासाठी इम्रान खान तेथे जात आहेत. या ऑलिंपिकवर अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांनी यापूर्वीच बहिष्कार घातला आहे.

(म्हणे) ‘उघूर मुसलमानांवर अत्याचार होत असल्याच्या बातम्या चुकीच्या !’

इम्रान खान यांनी चीनला अशा प्रकारे निर्दोष ठरवून ‘ते मुसलमानांचे रक्षक नसून विश्‍वासघातकी आहेत’, हे स्पष्ट केले आहे. एरव्ही भारतातील मुसलमानांवरील कथित अत्याचारांविषयी गळा काढणारा पाक किती ढोंगी आहे, हे भारतातील मुसलमानांनी लक्षात घ्यावे ! – संपादक

इम्रान खान यांनी चीनच्या दौर्‍यावर जाण्यापूर्वी इस्लामाबादमध्ये पत्रकारांशी बोलतांना चीनमधील उघूर मुसलमानांवर होणार्‍या अत्याचारांविषयीही मत व्यक्त केले. ते म्हणाले की, आमच्या राजदूतांनी चीनच्या शिनझियांग प्रांताचा दौरा केला. तेथे त्यांना उघूर मुसलमानांवर अत्याचार होत असल्याच्या आरोपामध्ये कोणतेही तथ्य सापडले नाही.