संपादकीय
|
आंध्रप्रदेशमधील गुंटूर येथील कोथापेट भागामध्ये देशाचे विभाजन करणार्या महंमद अली जीना यांच्या नावाचा ‘टॉवर’ (मनोरा) आहे. या मनोर्यावर हिंदुत्वनिष्ठांनी २६ जानेवारीला राष्ट्रध्वज फडकावण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे आंध्रप्रदेशात ‘देशाचे तुकडे करणार्या जीना यांच्या नावाने टॉवर आहे’, ही माहिती पुढे आली. हेच कशाला ? देशाच्या राजधानीच्या आजूबाजूच्या जवळजवळ ३६५ गावांना मोगल आक्रमकांची नावे आहेत. या गावांना पूर्वी हिंदूंच्या देवतांवरून नावे देण्यात आली होती. देहलीचे पुरातत्व विभागाचे माजी संचालक डॉ. धरमवीर शर्मा यांनी याविषयीची माहिती उघड केली आहे. देशातील अनेक भागांत ब्रिटीश, मोगल आणि काही ठिकाणी पोर्तुगीज यांनी नामकरण केलेल्या वास्तू, परिसर किंवा शहरे आहेत.
आक्रमकांच्या विजयस्मृती जोपासल्या !
या देशाच्या बहुसंख्य हिंदु जनतेवर ज्यांनी अत्याचार केले, त्यांची नावे देशातील कोणतीच वास्तू, रस्ता आदींना नको, हे साधे सरळ गणित आहे. आक्रमकांनी येथील मूळ नावे पालटून त्यांची नावे ठेवली आहेत. त्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्यावर ती पालटणे ही खरे तर साहजिक कृती होती; कारण जगभरात हे सर्वत्र झाले आहे. यासाठी काही पुष्कळ प्रखर राष्ट्रभक्तीची आवश्यकता आहे असे नाही. ‘अत्याचार्यांचे नाव पुसणे आणि स्वसंस्कृतीतील नाव ठेवणे’ ही एक उत्स्फूर्त उपजत आणि आपलेपणाची भावना आहे; परंतु आतापर्यंत अधिक काळ सत्तेत असलेल्या काँग्रेसला किंचित्साही राष्ट्राभिमान असल्याचे दिसून येत नाही. या उलट ती स्वतःच राष्ट्राचे शत्रू असल्याप्रमाणे वागत असल्याने तिने ब्रिटीश आणि मोगल या शत्रूंच्या प्रतिकांचा अगदी मायेने प्रतिपाळ केला. काँग्रेसने देशाचा सत्य इतिहास दडपल्यामुळेच आज जिना यांच्या नावाने मनोरा असला काय, रस्ता असला काय किंवा विद्यापीठ असले काय बहुसंख्य जनतेलाही आता त्याचे काहीच वाटत नाही. जगात कुठल्याही देशात अशा प्रकारे शत्रूच्या नावाची स्मारके मिरवली जात नाहीत. मुंबईत नुकत्याच टिपू सुलतानचे नामकरण केलेल्या पटांगणाच्या नावाचा विधीमंडळात ठरावही झालेला नव्हता आणि आता ती जागा सांडपाणी प्रकल्पाची असल्याचे पुढे येत आहे; पण भाजप वगळता कुणी त्याविषयी काही बोलले नाही. भारतात अद्यापही कित्येक रस्ते, चौक, स्थानके, परिसर, वसाहती, गावे, शहरे, विद्यापिठे यांना परकीय आक्रमकांची नावे दिली आहेत आणि काँग्रेसच्या मुसलमानांच्या तुष्टीकरणाच्या धोरणामुळे बहुसंख्य हिंदूंचीही त्याविषयीची संवेदनशीलताही लोप पावली आहे.
पोलिसांची हिंदुविरोधी ‘तत्परता’ !
जेव्हा काही धर्माभिमान्यांना एखाद्या वास्तूला आक्रमकांचे नाव असल्याचे लक्षात येते आणि ते त्याविरोधात आवाज उठवतात, तेव्हा त्यांच्यावरच कारवाई केली जाते. म्हणजे सरकार स्वतःही काही प्रयत्न करत नाही आणि जे करतात, त्यांनाही ते करू न देता त्यांच्यावर उलट कारवाई केली जाते. हे अजब गणितही केवळ भारतातच पहायला मिळत असेल. ‘जीना टॉवर’वर राष्ट्रध्वज फडकावणार्या या हिंदूंना तत्परतेने अटक करण्यात आली. देहलीत ‘औरंगजेब रोड’ची पाटी पालटणार्यांना कह्यात घेण्यात आले. मुंबईतील पटांगणाचे टिपू सुलतान असे नामकरण पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते परस्पर केले गेले. त्याला विरोध करणार्या हिंदुत्वनिष्ठांना पोलिसांनी कह्यात घेतले. मोगल आक्रमकांच्या नावात पालट केले, तर पोलिसांना दंगली होण्याची भीती वाटते. दंगली करणार्यांना पकडण्याची मानसिकता अस्मिताहीन पोलिसांमध्ये नाही; मात्र धर्माभिमान्यांना तत्परतेने पकडून त्यांचा छळ करण्याचे कर्तव्य ते चोख बजावतात.
परकीय नावे का नकोत ?
उत्तरप्रदेशच्या योगी सरकारने स्वतःहून पुढाकार घेऊन ‘इलाहाबाद’ स्थानकाचे ‘प्रयागराज’ नामकरण केले. यासहित अन्यही काही स्थानकांना असलेली परकीय आक्रमकांची नावे स्वतःहून पालटली. ‘फैजाबाद’चे ‘अयोद्धा’ केले. ‘यांसह अनेक स्थानिक परिसरांची इस्लामी नावे मुख्यमंत्री योगी यांनी पालटली आहेत. वर्ष २०१७ मध्ये परकीय आक्रमकांची नावे पालटण्याचा निर्णय मुख्यमंत्री योगी यांनी घेतला, तसे केंद्रानेही देशभर केले पाहिजे. धर्माभिमानी नेतेच असे निर्णय घेऊन त्याची कार्यवाही करू शकतात. राष्ट्राभिमान केवळ मनात असून चालत नाही, तो कृतीत आणण्याची धमक आणि आत्मबल हे धर्माचरणाने येते, हेच यावरून लक्षात येते. नाहीतर महाराष्ट्रातील औरंगाबादचे नामकरण ‘संभाजीनगर’ करण्याविषयीचे घोंगडे अजूनही भिजत आहे. महाराष्ट्रातील ‘उस्मानाबाद’चे ‘धाराशीव’ आणि ‘अहमदनगर’चे ‘अंबिकानगर’ करणेही अद्याप राहूनच गेले आहे. देशातही नामांतराचा निर्णय घेण्यासाठी आवश्यकता असेल, तर तसा कायदाही करू शकतो. आता कित्येक मुसलमान ‘त्यांचे पूर्वजही राम, कृष्ण किंवा हिंदु होते’ हे उघडपणे मान्य करायला लागले आहेत. आक्रमकांची नावे पालटली नाहीत, तर पुढील पिढीला त्यांनी आपल्या पूर्वजांवर केलेले अत्याचार कधी कळतच नाहीत. त्यामुळे देशाची राष्ट्र आणि धर्म अस्मिता निर्माण होण्याच्या संदर्भात अपरिमित हानी झाली. गोव्यात आजही अनेक शहरे आणि गावे यांना पोर्तुगीज नावे असून त्यांचा उच्चार पोर्तुगीज भाषेनुसार केला जातो. त्यात कुणालाच काही चुकीचे वाटत नाही. पर्यायाने त्यामुळे पोर्तुगिजांनी केलेले हिंदूंचे हालही लक्षात रहात नाहीत. संपूर्ण भारताचा गौरव असलेले विश्वविख्यात नालंदा विद्यापीठ उद्ध्वस्त करणारा मोगल आक्रमक बख्तियार याच्या नावाच्या बख्तियारपूर या रेल्वे स्थानकावर उतरून नालंदा विद्यापिठाचे गतवैभव पहाण्यासाठी जावे लागते, यासारखी दुःखद गोष्ट हिंदूंसाठी कुठली असेल ? स्वसंस्कृतीतील महापुरुषांची नावे राष्ट्र आणि धर्म अस्मिता सदैव जागृत ठेवतात आणि परकीय आक्रमकांची नावे या अस्मितेचा लय करतात. यासाठीच ती पालटायला हवीत. देशातील सर्वत्रची परकीय आक्रमकांची नावे कायमस्वरूपी पुसण्यासाठी जनतेला हिंदु राष्ट्राची वाट पहावी लागणार आहे, असेच वाटते !