Hindenburg Shut Down : अदानी उद्योगसमूहावर आरोप करणारे हिंडेनबर्ग रिचर्स आस्थापन बंद !

जे ठरवले होते, ते पूर्ण झाल्याने आस्थापन बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे संस्थापकांनी केले स्पष्ट !

‘हिंडेनबर्ग रिसर्च’ चे संस्थापक नॅथन अँडरसन

नवी देहली – अमेरिकी आस्थापन ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ बंद होणार असल्याची घोषणा या आस्थापनाचे संस्थापक नॅथन अँडरसन यांनी १५ जानेवारीला रात्री केली. त्यांनी ‘एक्स’वर एक ‘पोस्ट’ लिहून ही घोषणा केली. ‘आस्थापन बंद करण्याचा निर्णय आम्ही घेत आहोत, आम्ही जे काही ठरवले होते ते पूर्ण झाल्याने आता आम्ही आस्थापन बंद करत आहोत’, असे त्यांनी यात म्हटले आहे; मात्र आस्थापन बंद करण्यामागे कोणतेही ठोस कारण नॅथन यांनी सांगितलेले नाही. वर्ष २०१७ मध्ये हे आस्थापन चालू झाले होते.

ऑगस्ट २०२४ मध्ये हिंडेनबर्ग रिसर्च आस्थापनाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात भारतातील अदानी उद्योगसमुहावर केलेल्या आरोपानंतर अदानी समूहाला अब्जावधी रुपयांची हानी झाली होती. हिंडेनबर्गने अहवालात दावा केला होता, ‘सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया’च्या (‘सेबी’च्या) प्रमुख माधबी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच हे अदानी समुहाशी जोडलेल्या आस्थापनामध्ये भागीदार आहेत.

संपादकीय भूमिका

आस्थापनाच्या संस्थापकांनी आस्थापन बंद करण्यामागील ठोस कारण सांगितलेले नाही, यातून हे आस्थापन केवळ भारतीय उद्योगाला हानी पोचवण्यासाठीच स्थापन झाले होते का ? आता अमेरिकेत ट्रम्प सरकार येणार असल्याने ते बंद करण्यात येत आहे का ? असे प्रश्न उपस्थित होत आहेत !