संपादकीय : वर्ष २०२५ आणि भविष्यवाणी !

अमेरिकेतील पाद्री बँडन डेल बिग्स यांनी ‘अमेरिकेत १० रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंप येईल आणि त्यात १ सहस्र ८०० लोकांचा मृत्यू होईल’, असे भाकीत वर्तवले आहे. पाद्री बिग्स यांनी दावा केला की, देवानेच त्यांना असे दाखवले आहे. पाद्री बिग्स यांनी यापूर्वी ट्रम्प याच्यावर प्राणघातक आक्रमण होण्याचे भाकीत वर्तवले होते, जे नंतर खरे ठरले. त्यामुळे त्यांच्या या नव्या भाकितामुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे; मात्र त्याच वेळी भूगर्भ शास्त्रज्ञांनी हे भाकीत फेटाळले आहे. आता पूर्ण वर्षभर हे भाकीत खरे होईल कि खोटे ठरेल, हा पहावे लागणार आहे; पण ‘वर्ष २०२५ मध्ये मोठ्या नैसर्गिक आपत्ती येणार आहेत’, अशी अनेकांची भाकीते आहेत. बाबा वेंगा या नावाने प्रसिद्ध असणार्‍या महिला भविष्यवेत्त्या यांनी ‘वर्ष २०२५ मध्ये युरोपमध्ये विनाशकारी युद्ध होईल आणि त्यात मोठी लोकसंख्या नष्ट होईल. युरोपमध्ये रशियाचे प्राबल्य निर्माण होईल’, असे भाकीत वर्तवून ठेवले आहे. प्रसिद्ध भविष्यवेत्ता नॉस्ट्रडॅमसच्या भाकितानुसार ‘पाश्चिमात्य देशांचा जगावर असलेला दबदबा नष्ट होईल. तेथे महामारी येईल. यात प्लेगही असू शकतो’, असे म्हटले आहे. भारतातील काही द्रष्ट्या संतांनी यापूर्वीच ‘आपत्काळ येणार’, असे सांगितले आहे. वर्ष २०२५ पासून ते येणार कि नाही, हे स्पष्ट म्हटलेले नसले, तरी सध्याची स्थिती आणि घडत असलेल्या मानवी अन् नैसर्गिक घटना पहाता जग विनाशाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे, असेच चित्र आहे. वर्ष २०२५ च्या केवळ १४ दिवसांतच याची झलक दिसू लागली आहे.

अमेरिकेतील कॅलिफोर्निया भागात लागलेल्या आगीमध्ये अब्जावधी रुपयांची संपत्ती नष्ट झाली आहे. ही हानी अनेक दशके भरून न येणारी आहे. विमान अपघाताच्याही अनेक घटना घडल्या आहेत. जर द्रष्टे संत आणि भविष्यवेत्ते आपत्काळाची पूर्वसूचना देत आहेत, तर जागतिक स्तरावरच याकडे गांभीर्याने पहात उपाययोजना काढली पाहिजे; मात्र तसा प्रयत्न कुणी करतांना दिसत नाही किंवा कुणी तसा विचारही मांडतांना दिसत नाही. यातून एकतर त्यांचा या भविष्यांवर विश्वास नाही किंवा ते या संदर्भात काही करू इच्छित नाहीत. अमेरिका, तसेच युरोपीय देश यांना जगावर दादागिरी करायची आहे. आता त्यांच्यातच वाद झाल्याने जग अशांत होत चालले आहे. विनाश येणार असेल, तेव्हा बुद्धीही चुकीचे निर्णय घेते, तसेच या देशांकडून होत आहे. शासनकर्त्यांच्या वृत्तीनुसार प्रजा वागते. या दोघांच्या विचारांवर निसर्ग अवलंबून असतो. सध्या सर्वच स्तरांवर अधर्म माजल्याने निसर्गाचा प्रकोप होत आहे आणि तोच विनाश घडवून आणणार आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत त्याला सामोरे जाण्याखेरीज पर्याय नाही. यात जर स्वतःचे रक्षण व्हावे, असे कुणाला वाटत असेल, तर त्याने देवाला शरण जाणे, हा एकमेव उपाय आहे.

येणार्‍या आपत्काळात स्वतःच्या रक्षणासाठी देवाला शरण जाऊन धर्माचरण करणे आवश्यक !