महर्षींच्या आज्ञेने श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ महाराष्ट्रातील डहाणूजवळ असलेल्या श्री महालक्ष्मीगड येथे गेल्यावर आलेल्या अनुभूती

श्री महालक्ष्मीगडावर असलेली श्री महालक्ष्मीदेवी

१. महर्षींनी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना डहाणूजवळ असलेल्या श्री महालक्ष्मीगड येथील श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेण्यास सांगणे

‘१.३.२०२० या दिवशी बेंगळुरू येथे सप्तर्षि जीवनाडीपट्टी क्रमांक १४२ चे वाचन झाले. त्यामध्ये महर्षींनी सांगितले, ‘कार्तिकपुत्री (श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ) यांच्या जन्माचे रहस्य महर्षींनी अनेक सहस्र वर्षांपूर्वीच लिहून ठेवले होते. त्याचप्रमाणे त्यांच्या दैवी प्रवासाविषयीही महर्षींनी लिहिले आहे. त्यांचा पुढील प्रवास मुंबईच्या दिशेने होणार आहे. आधी त्यांनी गणेशपुरी येथील स्वामी नित्यानंद यांच्या समाधीमंदिराचे दर्शन घ्यावे. नंतर वज्रेश्वरीदेवीचे दर्शन घ्यावे. गणेशपुरी आणि वज्रेश्वरी येथील दर्शन घेऊन झाल्यानंतर त्यांनी डहाणूजवळ श्री महालक्ष्मीगड नावाचा गड आहे, तेथे जावे. त्या गडावर आणि गडाच्या पायथ्याशी श्री महालक्ष्मीदेवीचे मंदिर आहे. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना त्या गडावर चढणे शक्य नसल्यास त्यांच्या समवेत असलेल्या साधकांनी गडावर जाऊन यावे आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी गडाच्या पायथ्याशी असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरातील देवीचे दर्शन घ्यावे.’

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

५.३.२०२० या दिवशी संध्याकाळी ६ वाजता महर्षींनी सांगितल्याप्रमाणे श्रीचित्‌‌शक्ति गाडगीळकाकूंनी महालक्ष्मीगडाच्या पायथ्याशी असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले.

श्री महालक्ष्मीगडाच्या पायथ्याशी असलेल्या मंदिरातील श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतांना श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

२. श्री महालक्ष्मीगडाच्या पायथ्याशी असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीच्या दर्शनाच्या वेळी जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

२ अ. श्रीचित्‌‌शक्ति गाडगीळकाकूंनी श्री महालक्ष्मीदेवीला ‘हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, अशी प्रार्थना केल्यावर श्री महालक्ष्मीदेवीच्या गळ्यातील हार डाव्या बाजूने खाली येणे : श्री महालक्ष्मीगडाच्या पायथ्याशी असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरात गेल्यावर श्रीचित्‌‌शक्ति गाडगीळकाकू देवीला प्रार्थना करत होत्या. त्या वेळी देवीला घातलेला हार देवीच्या डावीकडून खाली आला. श्रीचित्‌‌शक्ति गाडगीळकाकू त्या पुजार्‍यांना म्हणाल्या, ‘‘आम्ही हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी देवीला प्रार्थना केली. तुम्ही देवीचा हार आम्हाला द्याल का ?’’ तेव्हा त्या पुजार्‍याने लगेच तो हार श्रीचित्‌‌शक्ति गाडगीळकाकूंना प्रसाद म्हणून दिला.

श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेऊन गाडीत बसल्यावर जवळ आलेल्या गायीला कुरवाळतांना श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

२ आ. श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन झाल्यावर श्रीचित्‌‌शक्ति गाडगीळकाकू गाडीत बसल्यावर त्यांच्याजवळ एक गाय आणि ३ कुत्री येणे आणि श्रीचित्‌‌शक्ति काकूंनी त्यांना खाऊ देणे, त्याच वेळी महर्षींनी भ्रमणभाष करून त्याविषयी सांगणे : श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेऊन आल्यावर श्रीचित्‌‌शक्ति गाडगीळकाकू गाडीत बसल्या. त्या वेळी एक गाय आणि काही कुत्रे गाडी जवळ आले. त्याच वेळी पू. (डॉ.) ॐ उलगनाथनजी यांनी आम्हाला भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘महर्षि म्हणत आहेत की, कार्तिकपुत्रीच्या (श्रीचित्‌‌शक्ति गाडगीळकाकू यांच्या) जवळ एक गाय आणि ३ कुत्रे आले आहेत का ? अन् कार्तिकपुत्री त्यांना काही तरी खायला देत आहेत का ?’’ तेव्हा आम्ही गाडीकडे पाहिले, तर श्रीचित्‌‌शक्ति गाडगीळकाकू त्या गायीला आणि कुत्र्यांना काहीतरी खायला देत होत्या. गाडीच्या आजूबाजूला एकूण ६ कुत्री असली, तरी त्यातील ३ कुत्री श्रीचित्‌‌शक्ति गाडगीळकाकू यांच्याजवळ आली होती. यावरून महर्षींची सर्वज्ञता आमच्या लक्षात आली आणि महर्षींच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.

२ इ. श्री महालक्ष्मीगडावरील महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेणे : दुसर्‍या दिवशी, म्हणजे ६.३.२०२० या दिवशी सकाळी ७ वाजता श्रीचित्‌‌शक्ति गाडगीळकाकू यांच्या समवेत सेवा करणारे साधक श्री. विनायक शानभाग आणि श्री. विनीत देसाई श्री महालक्ष्मीगडावर गेले. गडावर जायला ८५० पायर्‍या आहेत आणि त्यानंतरही थोड्या दूर अंतरापर्यंत चालत जावे लागते. गडावर एका गुहेच्या आत श्री महालक्ष्मीदेवीचे मंदिर आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला, म्हणजे गुहेत एके ठिकाणी पाणी सतत वहात असते.

२ ई. गडावरील श्री महालक्ष्मीदेवीच्या दर्शनासाठी गेल्यावर जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

२ ई १. श्री महालक्ष्मीदेवीचे तीर्थ, शेंदूर आणि तेथील माती मिळणे : श्री महालक्ष्मीगडावरील मंदिरातील पुजार्‍याने आम्हाला श्री महालक्ष्मीदेवीचे तीर्थ, शेंदूर आणि देवीच्या स्थानातील माती आश्रमात ठेवण्यासाठी दिली.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

२ ई २. श्री महालक्ष्मीदेवी दोन लहान मुलींच्या रूपात येणे, त्यांनी नेहमी एकमेकींशी खेळणे, त्यांतील एका महालक्ष्मीचे मंदिर गडावर बांधणे, तर दुसरीचे मंदिर गडाच्या पायथ्याशी बांधणे अन् विशेष म्हणजे श्रीचित्‌‌शक्ति गाडगीळकाकूंना स्वप्नात त्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याशी खेळत असल्याचे दिसणे : येथील पुजारी म्हणाले, ‘‘श्रीमहालक्ष्मीदेवी येथे २ लहान मुलींच्या रूपात आली. ‘त्या दोन्ही लहान मुली सतत सुपलीने (लहान सुपाने) खेळत असत’, असे गावकरी म्हणतात. ‘या गावात असलेले दारिद्र्य दूर करण्यासाठी देवी आली होती’, असेही म्हटले जाते. पुढे एका महालक्ष्मीसाठी गडावर एका गुहेत मंदिर बांधण्यात आले आणि दुसर्‍या महालक्ष्मीसाठी गडाच्या पायथ्याशी दुसरे मंदिर बांधण्यात आले.’’ विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी श्रीचित्‌‌शक्ति गाडगीळकाकूंना पडलेल्या एका स्वप्नात त्या ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा हात हातात घेऊन खेळत आहेत’, असे दिसले होते.

३. तमिळ भाषेतील नाडीपट्टीमध्ये महर्षींनी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या दोघी श्री महालक्ष्मीचीच रूपे असल्याचे सांगणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी असलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या दोघी ‘श्री महालक्ष्मीदेवीचीच रूपे आहेत’, असे महर्षींनी तमिळ भाषेत आढळणार्‍या नाडीपट्टीमध्ये लिहून ठेवले आहे. त्यामुळे ‘श्री महालक्ष्मीगडाशी संबंधित दोन्ही महालक्ष्मी, म्हणजे श्रीसत्‌शक्ति बिंदाताई आणि श्रीचित्‌‌शक्ति गाडगीळकाकू आहेत’, असे गडावर गेलेल्या साधकांना वाटले.

 

४. श्री महालक्ष्मीगडावरील श्री महालक्ष्मी श्रीसत्‌शक्ति बिंदाताईंशी संबंधित असणे आणि कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी श्रीचित्‌‌शक्ति गाडगीळकाकूंशी संबंधित असणे

श्री महालक्ष्मीगडाच्या इतिहासाविषयी पू. (डॉ.) ॐ उलगनाथन् यांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीचा संबंध श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याशी आहे आणि डहाणूजवळ असलेल्या श्री महालक्ष्मीगडावरील श्री महालक्ष्मीचा संबंध श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याशी आहे. श्री महालक्ष्मीगडावरील श्री महालक्ष्मीच्या कृपेने श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ साधनेत आल्या आणि त्यांना ‘सायली’ नावाची मुलगी झाली. (श्रीचित्‌‌शक्ति गाडगीळकाकूंच्या मुलीचे नाव ‘सायली’ आहे. – संकलक)

श्री. विनायक शानभाग

५. दत्तगुरु, परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीचित्‌‌शक्ति गाडगीळकाकू यांच्यातील लक्षात आलेले आध्यात्मिक नाते

श्री महालक्ष्मीगड येथील श्री महालक्ष्मीदेवीचे वस्त्र आणि गडावरील देवीचा ध्वज प्रतिवर्षी ‘दत्तजयंती’च्या दिवशी पालटला जातो. दत्तात्रेयांचे वडील म्हणजे महर्षि अत्री आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे गोत्रही अत्री आहे. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा जन्मही दत्तजयंतीच्या दिवशी झाला आहे.

६. श्री महालक्ष्मीगडावरील श्री महालक्ष्मीचे दर्शन घेऊन तीर्थ श्रीचित्‌‌शक्ति गाडगीळकाकूंना देतांना पाऊस येणे

श्री महालक्ष्मीगडावर जाऊन आलेल्या साधकांनी श्रीचित्‌‌शक्ति गाडगीळकाकूंना श्री महालक्ष्मीदेवीचे शेंदूर, तीर्थ आणि माती दिली, तेव्हा मोठा पाऊस पडला. ‘त्या वेळी पंचक्रोशीत इतर कुठेही पाऊस पडला नाही’, असे आम्हाला नंतर कळले. तेव्हा हा पाऊस म्हणजे ‘श्री महालक्ष्मीदेवीचा वरुणाशीर्वाद होता’, असे आम्हाला जाणवले.’

– श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), बेंगळुरू, कर्नाटक. (१४.३.२०२०)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या आणि संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक