रझा अकादमीवर बंदी का घातली जात नाही ?

  • विधानसभेत भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांचा घणाघात !

  • ‘जो हिन्दू हित की बात करेगा, वही देशपर राज करेगा !’ – आमदार मंगलप्रभात लोढा यांची विधानसभेत घोषणा

  • सनातनवर बंदीची आग्रही मागणी करणार्‍यांचे सडेतोड खंडण करणारे आमदार मंगलप्रभात लोढा यांचे आभार ! –  श्री. चेतन राजहंस, प्रवक्ते, सनातन संस्था

भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा

मुंबई, २४ डिसेंबर (वार्ता.) – विधानसभेच्या सभागृहात २३ डिसेंबर या दिवशी काही सदस्यांकडून सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी केली गेली. आतंकवादी कारवाया करणार्‍या आतंकवाद्यांची शिक्षा माफ करावी, अशा मागणीचे राष्ट्रपतींना पत्र पाठवणारे विधीमंडळातील काही सदस्यच सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करत आहेत, हे दुर्दैवी आहे. महाराष्ट्रात रझा अकादमी संघटनेकडून मोर्चे काढले जात असतांनाही रझा अकादमीवर बंदी घालण्याची मागणी केली जात नाही. त्यामुळे सनातन संस्थेवर बंदी घालण्याऐवजी रझा अकादमीवर प्रथम बंदी का घातली जात नाही ? असा घणाघात भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत केला. वर्ष २०२१-२२ च्या पुरवणी मागण्यांवर झालेल्या चर्चेच्या वेळी ते बोलत होते. या वेळी श्री. मंगलप्रभात लोढा यांनी सनातन संस्थेवर बंदी घालण्याच्या मागणीचा कडाडून विरोध केला, तसेच ‘जो हिन्दू हित की बात करेगा, वही देशपर राज करेगा’, अशी जोरदार घोषणाही सभागृहात दिली.

सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी ‘सनातनवर बंदीची आग्रही मागणी करणार्‍यांचे सडेतोड खंडण करणारे आमदार मंगलप्रभात लोढा यांचे आभार’ असे म्हटले आहे.

श्री. मंगलप्रभात लोढा पुढे म्हणाले की,

१. सनातन संस्थेवर बंदीची भाषा करणार्‍यांना कधी रझा अकादमीची आठवण होते का ? सनातन संस्थेवर बंदीची मागणी करणार्‍यांना कधी आठवते का की, बंगालमध्ये (त्रिपुरामध्ये) एखादी घटना घडल्यानंतर देशात काही न होता महाराष्ट्रात ठिकठिकाणी मोर्चे (जुलूस) काढले जातात. हे जुलूस काढणारे लोक रझा अकादमी आणि अन्य जिहादी संघटना यांचे आहेत.

२. प्रथम रझा अकादमी आणि अन्य जिहादी संघटना यांवर बंदी घातली पाहिजे.

३. ‘गूगल’वर ‘सनातन संस्था’ सर्च केल्यानंतर प्रथम ‘आरती’चे चित्र येईल; मात्र रझा अकादमीच्या संकेतस्थळावर सर्च केल्यानंतर हुतात्मा बोधचिन्हाला लाथ मारल्याचे चित्र दिसून येते. (या वेळी विधानसभेतील सदस्यांनी ‘शेम शेम’ असे म्हटले.) रझा अकादमीच्या लोकांना संरक्षण देण्याचे काम कोण करते ? रझा अकादमीवर बंदी घालू शकत नाही; पण सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी केली जाते.

४. मला येथे एका गोष्टीची लाज वाटते की, वर्ष १९९३ मध्ये मुंबई येथे झालेल्या बाँबस्फोटात २५७ लोकांना ठार मारण्यात आले होते. त्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने बाँबस्फोट करणार्‍यांना फाशीची शिक्षा दिली. या निर्णयामुळे आनंदी होण्याऐवजी काही जणांनी राष्ट्रपतींना पत्र पाठवून ‘बाँबस्फोटातील आरोपी आणि दाऊदच्या गुंडांना माफ केले जावे’, अशी मागणी केली. त्या वेळी १२ लोकांनी या मागणीच्या पत्रावर स्वाक्षरी केली होती. ते १२ लोक आज विधानसभेत सदस्य म्हणून बसले आहेत. त्यांना प्रथम विधानसभेतून हाकलून लावा आणि त्यानंतरच ‘सनातन संस्थेविषयी बोलावे.’ (या वेळी काही सदस्यांनी त्या १२ लोकांची नावे विचारली, तेव्हा लोढा यांनी ‘ती नावे तुम्हाला ठाऊक आहेत, तुम्हीच शोधा’, असे सांगितले.)

५. मी जे काही बोलत आहे, ते विचारपूर्वक बोलत आहे. ते ‘रेकॉर्ड’वर येणार आहे. (काही सदस्य मोठ्या आवाजात बोलायला लागल्यानंतर लोढा यांनी मागणी केली की) ‘विधानसभा अध्यक्षांनी मला संरक्षण द्यावे.’

६. मी जोरात बोलीन आणि ते तुम्हाला ऐकून घ्यावे लागेल. जो हिन्दू हित की बात करेगा, वही देशपर राज करेगा । महाराष्ट्र आणि मुंबई येथे रहाणारे लोक अन् संस्कृती यांचे संरक्षण आणि त्यांचा सन्मान करण्याचे दायित्व माझे आहे. त्याविषयी सदनात चर्चा केली पाहिजे.

७. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव यांच्या वेळी लोकांच्या संख्येला प्रतिबंध घातला जातो. हे सण वर्षातून एकदाच येतात; मात्र प्रत्येक शुक्रवारी संपूर्ण रस्त्यावर नमाजपठण करणार्‍यांना प्रतिबंध केला जात नाही. सर्वोच्च आणि उच्च न्यायालये यांचा आदेश असतांनाही त्याचे पालन केले जात नाही.

८. देशातील संस्कृती वाचली, तर देश वाचेल आणि देश वाचला, तर आपण वाचू शकतो. जे काश्मीर आणि बंगाल येथे होत आहे, ते महाराष्ट्रात होण्यास वेळ लागणार नाही. गृहमंत्र्यांनी संवेदनशील विषय गांभीर्याने घ्यावेत. छोट्या छोट्या गोष्टी असून त्यामध्ये आत बाँब लपवले आहेत.

९. मुंबई येथे कोळी समाजाचा मासे विकण्याचा ९० टक्के मुख्य व्यवसाय होता. आता कोळी समाजाला बाहेर पडावे लागले आहे. त्यांच्याकडे हा व्यवसायच राहिलेला नाही. मुंबई येथील १५ व्यवसाय ‘एका जाती’च्या लोकांनी (धर्मांधांनी) स्वतःच्या कह्यात घेतले आहेत. पुढे येणार्‍या काळात मुंबई आणि संस्कृती यांचे संरक्षण कसे करता येईल, याविषयी सरकारला विचार करणे आवश्यक आहे.

१०. मंदिर आणि वक्फ मंडळ यांची भूमी हडप करण्यात आली आहे. वक्फ मंडळाची जवळपास १० सहस्र एकर भूमी हडप करण्यात आली आहे. यासाठी समितीची नियुक्ती करून १५ वर्षांतील घोटाळ्याची चौकशी करावी. प्रत्येक मंदिरावर धर्मादाय आयुक्तांच्या वतीने ५० प्रतिबंध लावले जातात. प्रत्येक वेळी छोट्या छोट्या कामांसाठी मंदिरांतील विश्‍वस्तांना ५ वेळा बोलावले जाते; मात्र वक्फ मंडळावर कुणाचे नियंत्रण आहे का ?