१९७१ च्या युद्धामध्ये भारताने पाकवर विजय मिळवलेल्या घटनेला ५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने..
वर्ष १९७१ च्या लढाईमध्ये ‘७ मराठा लाईट इन्फंट्री’चे योगदान !
‘वर्ष १९७१ च्या भारत-पाक युद्धामध्ये ‘७ मराठा लाईट इन्फंट्री’ने लढाई लढली. या युद्धात माझे ३ सैनिकी मित्र सुभेदार मेजर आणि ‘ऑननरी’ (मानद) कॅप्टन जयराम मुळीक, सुभेदार मेजर अन् ऑननरी कॅप्टन दयानंद मांढरे आणि सुभेदार मेजर, तसेच ‘ऑननरी’ कॅप्टन विजयकुमार मोरे यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला.
पूर्व पाकिस्तानमध्ये (आताच्या बांगलादेशमध्ये) मार्च-एप्रिल मासामध्ये प्रचंड हिंसाचार झाला. १ कोटीहून अधिक लोक पूर्व पाकिस्तानमधून भारतात आले. ४५ लाख लोकांना ठार मारण्यात आले. तेथे पाकिस्तान्यांनी बांगलादेशी लोकांचे शिरकाण करणे चालू केले होते. त्या वेळी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या, तर फिल्ड मार्शल माणेक शॉ हे सैन्याचे प्रमुख होते. त्यांनी ६ मास युद्धाची सिद्धता केली. त्यानंतर ३ डिसेंबर १९७१ या दिवशी हे युद्ध चालू झाले. १२ डिसेंबर २०२१ या दिवशी या युद्धाला ५० वर्षे पूर्ण झाली.
आपल्या राष्ट्राच्या जीवनामध्ये हा एक अतिशय महत्त्वाचा क्षण आहे. हे युद्ध भारताचे ‘वेस्टर्न फ्रंट’, म्हणजे सध्याचे पंजाब आणि काश्मीर यांच्या सीमेवर, तसेच ‘ईस्टर्न फ्रंट’, म्हणजे सध्याच्या बांगलादेशमध्ये लढले गेले. युद्धामध्ये बटालियन कशा प्रकारे काम करतात, हे समजण्यासाठी बांगलादेशमध्ये लढल्या गेलेल्या युद्धाविषयी माहिती पाहूया.
(पूर्वार्ध)
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.
१. युद्धाला ३ डिसेंबर या दिवशी प्रारंभ !
हे युद्ध ३ डिसेंबर या दिवशी चालू झाले; परंतु ‘७ मराठा लाईट इन्फंट्री’ने त्यापूर्वीच, म्हणजे नोव्हेंबरमध्ये अनेक कारवाया चालू केल्या होत्या. प्रथम ते कुचबिहारमध्ये होते. नंतर ते बागडोगरा येथे आले. त्यानंतर त्यांना भारत-पूर्व पाकिस्तान (आताचा बांगलादेश) सीमेवर पाठवण्यात आले. २६ नोव्हेंबर या दिवशी बटालियनला पाचागड येथे जे बांगलादेशात आहे, तेथे जाण्यास सांगितले. तेथे मोठ्या संख्येने पाकिस्तानी सैन्य होते. त्यांच्यासमवेत रझाकार आणि त्यांचे अर्धसैनिक दल होते. नंतर ते वीरगड येथे युद्धाच्या संवेदनशील प्रदेशात आले.
२. कांतानगर आणि पाचागड येथील लढाईमध्ये ‘७ मराठा लाईट इन्फंट्री’च्या सैनिकांनी मोठ्या प्रमाणात रक्त सांडले !
या युद्धात कर्नल बिडकीकर यांनी नेतृत्व केले. मेजर निजामुद्दीन, मेजर जाधव, मेजर कारखानीस आणि कॅप्टन विजय पाटील हे कंपनी कमांडर होते. त्या सर्वांनी पुष्कळ चांगले काम केले. ही लढाई पाचागड आणि कांतानगर या दोन ठिकाणी झाली. पाचागडवर ‘७ मराठा लाईट इन्फ्रंट्री’ने अनेक वेळा आक्रमण केले. या लढाईमध्ये सैनिकांची पुष्कळ हानी झाली. पाचागडमध्ये २६-२७ नोव्हेंबरची जी लढाई झाली, त्यामध्ये हवालदार मनोहर राणे, लान्सनायक परशुराम रेवणकर, शिपाई शंकर माने, पेड लान्सनायक गणपत पारटे, पेड लान्सनायक शिपाई खंडुगा बनसोडे यांनी त्यांच्या प्राणाचे बलीदान दिले. पाचागडला २८ नोव्हेंबरच्या रात्री लढाई झाली. त्यात शिपाई बाबू इंगळे आणि शिपाई रमेश जगनाडे यांनी प्राणांचे बलीदान दिले. ६ डिसेंबर या दिवशी कांतानगर येथे झालेल्या लढाईमध्ये शिपाई तुकाराम करांडे आणि शिपाई बलवान नरके हुतात्मा झाले. ७ डिसेंबर या दिवशी कांतानगर येथे झालेल्या लढाईमध्ये ‘७ मराठा’चे अधिक प्रमाणात रक्त सांडले. यात सुभेदार दौलतराव फडतरे, हवालदार बळीराम विचारे, लान्स हवालदार रामकृष्ण बोरलीकर, पेड लान्सनायक आशाराम तानपुरे, शिपाई हनुमान कोलपे, शिपाई शिवाजी जगदाळे, शिपाई गणपत सकपाळ, शिपाई विठ्ठल शिरसाट, शिपाई अंकुश तारी, शिपाई मनप्पा चव्हाण, शिपाई रामचंद्र देसाई, शिपाई रघुनाथ सावंत, शिपाई व्यंकटराव देशमुख, शिपाई महादेव परब, शिपाई रमेश इंगवले, शिपाई बाळकृष्ण जाधव, शिपाई विजय कोतवाल या सर्वांनी प्राणांचे बलीदान दिले. त्या सर्वांना अभिवादन करायला पाहिजे. बांगलादेशातील कांतानगर आणि पाचागड येथील लढाईमध्ये ‘७ मराठा’ने किती रक्त सांडले आहे, हे सध्याच्या पिढीला कळणे आवश्यक आहे.
त्यामुळे ज्यांनी या लढाईमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला आणि कर्तृत्व गाजवले, त्यांनी अनुभवलेले क्षण त्यांच्या शब्दांमध्ये पाहूया.
२ अ. सुभेदार मेजर आणि ऑननरी कॅप्टन विजयकुमार मोरे
२ अ १. लढाईत पाकिस्तानचे पुष्कळ सैनिक ठार झाले, तर अन्य सैनिक पळाले ! : मी ‘७ मराठा लाईट इन्फंट्री’मध्ये वर्ष १९६९ मध्ये रुजू झालो. त्या वेळी आमची बटालियन नागालँडमध्ये होती. आमच्या बटालियनला ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या कालावधीमध्ये सिलीगुडी येथे येण्याचा आदेश मिळाला होता. तेथून आम्ही बागडोगरा येथे गेलो. तेथे आम्हाला आमचे अधिकारी वर्ष १९७१ च्या लढाईची माहिती देत होते. आमच्या बटालियनला आधी पाचागडला आक्रमण करायचे होते. या आक्रमणामध्ये आमच्या बटालियनने पुष्कळ चांगले काम केले. त्यात पाकिस्तानचे पुष्कळ सैनिक ठार झाले, तर अन्य सैनिक त्यांचे साहित्य सोडून पळून गेले. त्यानंतर आमच्या बटालियनला कांता पूल कह्यात घेण्याचे ‘टास्क’ (ध्येय) मिळाले. त्या ठिकाणी आम्हाला कांता नदी ओलांडणे भाग होते.
२ अ २. पाकिस्तानी सैनिक भूमीगत भुयारामध्ये असल्याने त्यांचा ठावठिकाणा न कळणे आणि बटालियनच्या तोफखान्याद्वारे त्यांचा ठावठिकाणा समजणे : आम्ही बागडोगरा येथे सराव करत होतो. त्या वेळी सर्व सैनिक आणि अधिकारी पोशाख घालूनच हेल्मेट आणि साहित्यासह नदी पार करायचे अन् रांगत रांगत परत यायचे, असा सराव चालू होता. त्या वेळी पाकिस्तानी सैनिक हे त्यांच्या भूमीगत भुयारामध्ये होते. त्यामुळे आम्हाला त्यांचा ठावठिकाणा कळत नव्हता. त्यांनी शस्त्रे कुठे तैनात केली आहेत, हेही कळत नव्हते. केवळ ‘७ मराठा’च नाही, तर संपूर्ण भारतीय सैन्य मोकळ्या जागेत होते. त्यानंतर भारतीय अधिकार्यांनी पाकिस्तानी सैन्याची माहिती काढण्यासाठी नियोजन केले. ‘८१ एम्एम् मॉर्टर’ आणि ‘मिडियम मशीनगन’ हा आमच्या बटालियनचा तोफखाना होता. हे प्लॅटून (सैनिकांचा लहान गट) पुढे जायचे आणि पाकिस्तानच्या मोर्च्यावर गोळीबार करायचे. तेथून परत आल्यानंतर पाकिस्तानी सैनिकांनी जेथून गोळीबार केला, त्या ठिकाणावर गोळीबार करायचे. त्यामुळे आम्हाला त्यांच्या ठिकाणांची माहिती मिळायची. त्याप्रमाणे आमचे अधिकारी आम्हाला नियोजन समजावून सांगायचे.’
या लेखाचा उत्तरार्ध वाचण्यासाठी येथे क्लिक करा ः https://sanatanprabhat.org/marathi/536134.html