निसर्गानुकूल वर्तन करणे, हेच विश्वासमोरील सर्व समस्यांवरील उत्तर !

मनुष्याला उज्ज्वल पहाट हवी असेल, तर पृथ्वीवर हिंदु राष्ट्रच हवे ! – संपादक 

‘घोडा का अडला ?’ आणि ‘भाकरी का करपली ?’ या दोन्ही प्रश्नांचे उत्तर एकच आहे. ‘फिरवले नाही म्हणून !’

आजचे लोक मात्र याची उत्तरे घोड्याच्या आजूबाजूला जाऊन अथवा चुलीजवळ जाऊन पहात आहेत; पण उत्तर वेगळीकडेच आहे. ‘आज कोरोनामुळे शासनाच्या धोरणांविषयी जो चर्चेचा ऊहापोह चालू आहे’, त्यातून हीच गोष्ट लक्षात आली.

शासकीय नियमांचे उल्लंघन करून संकट ओढवून घेणारे नागरिक

१. सामाजिक अस्वस्थतेचा अपलाभ घेत समाजात नास्तिकता पसरवण्याचे उद्योग चालू !

२५.३.२०२० या दिवशी ‘ट्विटर’वर एक विषय (‘ट्रेंड’) दिवसभर चालू होता. ‘राममंदिर नको, तर त्या जागी रुग्णालय हवे ! अशा काळामध्ये मंदिरे कशाला हवीत ? सध्या रुग्णालयांची आवश्यकता आहे’, अशी चर्चा सामाजिक प्रसारमाध्यमांतून चालू होती. अनेकांनी याचीच ‘री’ ओढली. ‘कोरोना’मुळे सर्व बंद करायला (लॉकडाऊन) आरंभ झाल्यावर पहिला सूर हाच होता की, देवच भक्तांना सोडून गेले. समाजात कोरोनाची धास्ती आहे. समाजाच्या आताच्या या मनःस्थितीचा अपलाभ करून घेत समाजात नास्तिकता आणि साम्यवाद पसरवण्याचा अन् त्याच समवेत येनकेनप्रकारेण हिंदुविरोधी विचार पसरवण्याचा हा आंधळा आणि एकांगी प्रयत्न चालू होता. अनेकांनी त्याला सामाजिक प्रसारमाध्यमांतून उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. अर्थात् ‘अशा किती जणांना किती उत्तरे द्यायची ? खरोखरच झोपलेल्याला उठवता येते; मात्र झोपेचे सोंग घेणार्‍याला कसे उठवावे ?’, हा मोठाच प्रश्न आहे.

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

२. प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया ही असतेच !

‘अध्यात्मातील ‘कर्माचा सिद्धांत’ विज्ञान मानते’; पण हे या नास्तिकांना कळत नाही. ‘जे कर्म कराल, ते भरावे लागते. ते फेडावेच लागते’, असा अध्यात्मातील कर्माचा सिद्धांत अत्यंत साधा, सोपा आणि सरळ आहे. विज्ञानाच्या भाषेत असे म्हणता येईल की, प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया येतेच आणि ती तेवढ्याच क्षमतेची; पण विरुद्ध दिशेने येते. (एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोझिट रिॲक्शन), उदा. भिंतीवर चेंडू आपटला की, तो तुमच्याकडेच परत येणार आणि जेवढ्या जोराने तो भिंतीवर मारला जातो, तेवढ्याच जोराने तो परत तुमच्याकडे येणार, हे निश्चित ! हा नियम अध्यात्मात आधीपासून सांगितला आहे.

२ अ. ‘कर्माचा सिद्धांत’ हा समाजाला लागू होत असल्याचे न समजणारे नास्तिकतावादी ! : आपण जडजंबाल व्याख्या आणि सिद्धांत गोष्टी बाजूला ठेवल्या, तरी आपल्याला हे दिसेल की, निसर्ग या नियमांवर चालतो. वरून सोडलेली वस्तू खाली पडते, झाड सूर्याच्या दिशेने वर जाते, भूमीत जे बी पेरले, त्याचेच रोप उगवते. चिक्कूचे बी लावले, तर त्याला चिक्कूच येतील. लिंबू लावले, तर त्याला लिंबेच येणार. लिंबाच्या झाडाला आंबे येणे कदापि शक्य नाही. तसेच हे आहे. आता हे सिद्धांत खरे असतील, तर कर्माचा सिद्धांत खोटा कसा काय ठरतो ? जर एका व्यक्तीने पाप केले, तर त्या व्यक्तीला ते भोगावेच लागेल. मग समाजाने जर पाप केले, तर त्या समाजाला ते भोगावे लागणार नाही का ? मग जागतिक स्तरावर जी काही पापकर्मे झाली, ती संपूर्ण जगाला भोगावी लागणार नाहीत का ? भोगावीच लागणार !

२ आ. ट्विटरवरील ‘ट्रेंड’ आणि आंदोलने कर्माच्या सिद्धांताला लागू नाहीत ! : बरे, निसर्गनियमांना लोकशाहीचे नियम लागू नसतात. कितीही निषेध सभा घेतल्या किंवा ट्विटरवर ‘ट्रेंड’ चालवले अथवा देहलीतील शाहीनबागेसारखी कितीही आंदोलने केली, तरी सूर्य उगवायचा तेव्हाच उगवतो, मावळायचा तेव्हाच मावळतो आणि तापायचा तेवढाच तापतो. ‘लोकशाहीचे सिद्धांत अथवा नियम निसर्गाला लागू होत नसतील, तर कर्माच्या सिद्धांताला ते कसे लागू होणार ?’, याचे खरे उत्तर देण्याच्या फंदात कुणीच तथाकथित नास्तिकतावादी किंवा पुरोगामी पडत नाहीत; कारण त्यांचा अहंकार त्यांना ‘आपण निरुत्तर झालो’, हे मान्य करू देत नाही. यासाठी ते पळवाटा काढत रहातात. धार्मिक व्यक्ती या पळवाटा बुजवू शकत नाहीत; पण देव हे सगळे पहात असतोच ना !

३. विज्ञानाला कळत नाही; म्हणून पाप-पुण्य नसते, ही एक अंधश्रद्धाच !

पाप आणि पुण्य या अतीसूक्ष्म अन् तेवढ्याच व्यापक संकल्पना आहेत. आज विज्ञान तिथेपर्यंत पोचू शकले नाही. एका व्यक्तीच्या मनातील विचार आणि त्या विचारांतून निर्माण होणारे कर्म यांचा निसर्गावर काय परिणाम होतो ? ते कर्म पाप आहे कि पुण्य आहे ? त्यानुसार त्याचा निसर्गावर काय परिणाम होतो ?, हे आज विज्ञानाला ठाऊक नाही. या कारणाने ‘ते चुकीचे आहे’, असे म्हणणे म्हणजे प्रतिअंधश्रद्धा नाही का ? उदा. ‘पृथ्वी गोल असून ती सूर्याभोवती फिरते’, हे हिंदु धर्मशास्त्राने कधीच सांगितले आहे; मात्र आरंभी विज्ञानाला ते ठाऊक नव्हते; म्हणून ते खोटे होते का ?

४. जागतिक पातळीवरील नकारात्मकता वाढण्याची कारणे आणि परिणाम

आपण मागील शतक पाहिले, तर विज्ञानाने पुष्कळच प्रगती केल्याचे दिसते; परंतु त्याचसमवेत मनुष्याचा स्वैराचार आणि पापाचरण यांत वाढ झाली. धर्माचरण राहिले नाही, नैतिकता लयाला गेली. त्यामुळे जगातील गुन्हे वाढले. भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणात वाढला. योग्य आणि अयोग्य यांच्या सीमारेषा पुसट झाल्या. याचा अर्थ ‘जागतिक पातळीवरील नकारात्मकता वाढली’, असा घेतला, तर ‘त्या नकारात्मकतेचा परिणाम जागतिक निसर्ग आणि निसर्गनियम यांवर होणार नाही का ?’ हा मोठा कळीचा प्रश्न आहे. वैश्विक स्वरूपात असे मांडण्यापूर्वी त्या घटना आणि माणसांचे वागणे यांनुसार खालील उदाहरणे देता येतील. जिथे व्यक्ती किंवा समाज यांच्या चुकीचा परिणाम इतरांना भोगावा लागत आहे.

४ अ. जिव्हेची अती भोगलालसा आणि अती महत्त्वाकांक्षेपोटी इतरांचे बळी देण्याचा घातक विचार ! : ‘चीनमध्ये ‘कोरोना’ विषाणू कसा आला ?’ याचा विचार करता आजच्या क्षणाला या विषाणूचा संसर्ग होण्याविषयी दोन मते मांडली जातात. एका मतानुसार, एखाद्या पशूचे किंवा पक्ष्याचे मांस खाण्यातून तो विषाणू आला आणि पसरला. दुसर्‍या मतप्रवाहानुसार, जागतिक महासत्ता बनण्यासाठी जैविक शस्त्र म्हणून चीनने या विषाणूची निर्मिती केली होती. अपघाताने तो सुरक्षाकवचातून बाहेर आला आणि वुहान शहरामध्ये त्याचे थैमान चालू झाले. दोन्हीपैकी कुठलीही एक गोष्ट खरी मानली, तरी कुठल्याही चांगल्या कर्मातून ही गोष्ट चालू झाली नाही. वटवाघळे, कुत्री, गाढवे हे काही माणसाने खाण्याचे पदार्थ नव्हेत. ‘अभक्ष्य भक्षण’ हे अतीवासनेतून येते, जिव्हा लालसेतून म्हणजेच मोहातून येते. दुसरा सिद्धांत खरा मानला, तर तोच पराकोटीचा अहंकार दिसतो. हा अहंकार येतो महासत्तेच्या महत्त्वाकांक्षेतून ! स्वतः जगावर राज्य करण्याचा आणि निसर्गाला स्वतःचे गुलाम समजण्याचा विचार अहंकारातून येतो अन् तोच पराकोटीचा अहंकार व्यक्ती, समाज आणि देश यांचा घात करतो.

४ आ. ‘निसर्गाला न्यून लेखणे आणि स्वतःला श्रेष्ठ समजणे’ हा घातक अहंकार ! : आज ब्राझिल आणि मेक्सिको येथेही हा विषाणू पसरत आहे. ब्राझिलच्या अध्यक्षांनी नुकतेच ‘त्याची फारशी काळजी करू नका, त्याने काही होत नाही’, असे वक्तव्य केले आहे. इटलीमध्येही प्रारंभी असाच सूर लावला होता. भारतातही दळणवळण ठप्प केल्यानंतर लोक मार्गांवरून फिरत आहेत. त्यामागेही हीच भावना आहे. ‘मला काही होत नाही किंवा मला सगळे कळते. मी काय करायचे ? मी कसे वागायचे ?, ते मी ठरवीन’, म्हणजे ‘समाजापेक्षा मी महत्त्वाचा आहे. ‘मला काय वाटते ?’ हेच महत्त्वाचे आहे’, हा विचारही अशा व्यक्तींमधील अहंकारच आहे. त्यामुळे केवळ समाजाचीच नाही, तर संपूर्ण देश आणि जग यांचीही हानी होत आहे.

४ इ. मनुष्याची अती हव्यासी वृत्ती समाजाला घातक ठरणे : ‘कोरोना’ची चर्चा आणि सरकारी पातळीवर उपाययोजना चालू झाल्यावर ‘अत्यावश्यक वस्तूंचा साठा करणे’, ‘अवाजवी मूल्याने वस्तू विकणे’, यातून काय दिसते ? अती स्वार्थी वृत्ती ! म्हणजे द्रव्याचा अती हव्यास ! अशी स्वार्थी वृत्तीच मनुष्याच्या मनात घातक विचार निर्माण करते. त्याचे परिणाम समाजाला भोगावे लागतात. शेअर बाजार गडगडला, शेअर बाजाराने उसळी घेतली, या सर्व प्रक्रियेत लोक तोट्यात जातात अथवा नफा कमवतात. पुन्हा व्यक्तींच्या साखळीत सामायिक असणारा हा स्वार्थच घातक ठरतो.

अशी शेकडो उदाहरणे येथे देता येतील; परंतु विस्तारभयास्तव ती देत नाही. व्यक्ती, समाज अथवा देश यांच्या व्यवहारामागील अनैतिकता आणि अती हव्यास, अधर्माचरण या गोष्टींमुळे ही संकटे येत असल्याचे लक्षात येते.

५. दुखण्याचे मूळ कारण न शोधता केलेल्या उपाययोजना तात्कालिक !

‘आपत्ती व्यवस्थापनासाठी रुग्णालये बांधा’, ‘महामार्ग बांधा’, ‘औषधे निर्माण करण्याचे कारखाने चालवा’, ‘त्यासाठी लाखो कोटी रुपयांची तरतूद करा’ या अंतिम उपाययोजना नव्हेत. यामुळे या आपत्ती थांबणार नाहीत. आपत्तींचे मूळ उत्तर दुसरीकडेच आहे आणि ते उत्तर मनुष्याची नैतिकता, धर्माचरण आणि निसर्गानुकूल जगणे यांत आहे. व्यक्तींचा अहंकार, राग, लोभ, स्वार्थ, स्पर्धा, मत्सर, असूया, द्वेष, कारस्थानीपणा, दुसर्‍याला त्रास देण्याचा आसुरी आनंद मिळवणारी क्षूद्र वृत्तीच त्याच्या नाशाला कारणीभूत ठरते.

६. षड्रिपूंवर विजय मिळवणे, हेच समस्या सुटण्याचे मूळ उत्तर !

हिंदु धर्मामध्ये याचे विश्लेषण सहस्रो वर्षांपूर्वीच केले आहे. अनेक संत-महंत विविध उदाहरणांतून ते स्पष्ट करून सांगत आहेत. ‘स्वाध्याय’ परिवाराचे पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांनी त्यांच्या ग्रंथात एक सुंदर व्याख्या दिली होती. ‘जो देतो, तो देव आणि जो राखतो, तो राक्षस !’ जो केवळ स्वतःपुरते पहातो आणि स्वतःसाठी राखून ठेवतो, त्याला हिंदु तत्त्वज्ञानात ‘राक्षसी वृत्ती’ म्हटले आहे.

हिंदु धर्माने काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर यांना ‘षड्रिपू’ असे नाव दिले आहे. हे षड्रिपू मनुष्याचे खरे शत्रू आहेत. प्रत्यक्षातही याच दोषांची, रिपूंची मिश्रणे आपण व्यवहारात सगळीकडेच पहातो. हे षड्रिपू आणि अहंकार यातूनच गुन्हेगारी निर्माण होते. मनुष्याच्या हातून होणार्‍या चुका, गुन्हे हे या रिपूंच्या आहारी गेल्यानेच घडतात, मग ती हत्या असो, बलात्कार असो, चोरी असो किंवा नीरव मोदी यांच्यासारख्यांनी केलेला मोठा आर्थिक घोटाळा असो. अहंकाराला कामवासनेची जोड मिळाली, तर बलात्काराची घटना घडते. अहंकाराला लोभाची किंवा मोहाची जोड मिळाली, तर चोरी, दरोडा किंवा आर्थिक घोटाळे होतात. ‘माणसाच्या मनात या दोषांची अनेक मिश्रणे आहेत’, हे आपण जाणतो; पण त्यावरची योग्य उपाययोजना आपण काढत नाही.

अनेक विधीनियम (कायदे) केले जातात, न्यायालये स्थापन केली जातात, निकालांवर निकाल येतात, तरीही गुन्हे वाढतच रहातात; कारण आपली स्थिती ‘आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी’ अशी आहे. एकूणच जगाच्या आपत्ती वाढत आहेत. ‘त्याच्या मुळाशी याच मानवी भावभावनांचे, दोषांचे मिश्रण आहे’, हे आपण सोयीस्कररित्या विसरून उपाययोजना काढत आहोत.

७. उज्ज्वल पहाट हवी असेल, तर त्यासाठी आपला अहंकार आणि दोष यांच्याशी युद्ध करण्याविना गत्यंतरच नाही !

‘स्वतःत कोणता दोष प्रबळ आहे ? कोणत्या स्वरूपाचा अहंकार प्रबळ आहे ?’, हे शोधणे आणि त्यावर यशस्वीरित्या मात कशी करावी ?, हे शिकणे आणि प्रत्यक्ष कृतीत आणणे, हे जोपर्यंत एक व्यक्ती, एक कुटुंब, एक समाज करणार नाही, तोपर्यंत अशा समस्यांवरील निश्चित स्वरूपाची उत्तरे आपण शोधू शकणार नाही. सध्या असे शिक्षण कोणत्याही शाळांमध्ये दिले जात नाही.

‘पाप करायचे नसते’ हे हिंदु धर्म सांगतो; पण हिंदु धर्मातील पापांची व्याख्या आणि अन्य पंथातील पापांची व्याख्या भिन्नभिन्न आहेत, उदा. हिंदु संस्कृती ‘सर्वेषाम् अविरोधेन ।’ (अर्थ : कुणाचाही विरोध नाही.) अशा स्वरूपाची आहे. ‘इतर पंथ त्यांचा देव मानतात, तर तो त्यांचा देव आहे’, असे हिंदु धर्म मानतो, तर ‘आमचा आहे, तेवढाच देव आणि दुसर्‍याला त्याच्या धर्माप्रमाणे उपासना करू देणे, म्हणजे आमच्या प्रेषितांनी सांगितल्याप्रमाणे पाप आहे. दुसर्‍यानेही आमच्या प्रेषितांनी सांगितल्याप्रमाणेच वागले पाहिजे आणि तसे वागण्यासाठी आम्ही त्याला भाग पाडले नाही, तर आम्हाला मुक्ती नाही’, अशा स्वरूपांची विचारभिन्नता इतर पंथांत आहे.

हिंदु धर्माला तुच्छ समजणारे आणि पाश्चिमात्य देशांकडे डोळे लावून बसणारे हिंदूही ही गोष्ट समजून घेणार नाहीत. ‘आमचे देव खरे’, अशा भावनेने वावरणारे पाश्चिमात्य आमचे ऐकणार नाहीत. त्यामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीत जगावर येणार्‍या आपत्ती थांबणार नाहीत ! ही काळरात्र अशी संपणार नाही !

मनुष्याला उज्ज्वल पहाट हवी असेल, तर त्यासाठी आपल्याला स्वतःचा अहंकार आणि स्वभावदोष यांच्याशी युद्ध करण्याविना गत्यंतरच नाही ! अहंकार अन् स्वभावदोष विरहित आणि म्हणूनच निसर्गाला अनुकूल असे हिंदु राष्ट्रच आपल्याला या पृथ्वीतलावर आणावे लागेल !’

– अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद. (३०.३.२०२०)