शिर्डीतील साईबाबांच्या मूर्तीची तज्ञांकडून अडीच घंटे पहाणी !

शिर्डी – शिर्डीतील साईबाबांच्या मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी, तसेच या मूर्तीची झीज रोखण्यासाठी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या तज्ञांनी साईमूर्तीची अडीच घंटे पहाणी केली. ही पहाणी करतांना मंदिरातील ‘सी.सी.टी.व्ही.’ यंत्रणा बंद करण्यात आली होती. मूर्तीच्या बाजूने पडदे लावून मूर्तीचे ‘मायक्रो इन्स्पेक्शन’ करण्यात आले. मूर्तीला जिथे काळे डाग आले आहेत, त्या ठिकाणची विशिष्ट पद्धतीच्या छायाचित्रक संचाने छायाचित्रण करून ते अभ्यासासाठी संगणकात संरक्षित करण्यात आले. मूर्तीचे पावित्र्य जपण्यासाठी तज्ञांनी सोवळे परिधान केले होते.

या संदर्भात अधिक माहिती देतांना साई संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर म्हणाले, ‘‘याविषयीचा लेखी अहवाल दीड महिन्यात मिळेल. साईबाबांच्या मूर्तीची झीज टाळण्यासाठी तज्ञांनी काही तोंडी सूचना केल्या आहेत. मूर्तीच्या स्नानासाठी अल्प पाण्याचा वापर करणे, मूर्तीला शक्यतो स्पंजिग करणे, दही-दुधाचा आणि गंधाचा वापर टाळणे, गंधासाठी चंदनाचाच वापर करणे, आदी सूचना करण्यात आल्या. मूर्तीची झीज झाल्याचे तज्ञांनी मान्य केले आहे.’’