जुनी सांगवी (पुणे) – येथील महापालिकेचे ७६ गाळे असलेले ‘स्व. राजीव गांधी भाजी मार्केट’ गेली अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत विनावापर धूळखात पडून आहे. सद्यःस्थितीत शेजारीच मोकळ्या मैदानात भाजीमंडई भरते. येथील भाजीमंडई चालू करण्यात यावी. यामुळे येथील मोकळे मैदान धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच लहान मुलांना खेळासाठी उपयोगात येईल, असे सर्वसामान्यांमधून मत व्यक्त केले जात आहे. (जे सर्वसामान्यांना समजते, ते प्रशासनच्या लक्षात का येत नाही ? – संपादक) भाजीविक्रेत्यांची संख्या गाळ्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात असल्याने गाळे अपुरे पडतात. पूर्वी रस्त्याच्या कडेला होणारी भाजीविक्री, अरुंद आणि अपुरे गाळे या सर्व कारणांमुळे भाजीविक्रेत्यांनी या भाजीमंडईतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यासमवेत महापालिकेचे गाळ्यांसाठीचे भाडे न परवडणारे होते. कोरोनाच्या संकटकाळात लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि भाजीविक्रेते असा समन्वय साधून येथील दुरुस्त्या, सुशोभिकरण करून काही महिने ही भाजीमंडई चालू करण्यात आली; मात्र पुढे तीच कारणे देत भाजीविक्रेत्यांनी पुन्हा मोकळ्या मैदानात भाजीविक्री करण्यास प्रारंभ केला. औंध, पिंपरी यांच्या धर्तीवर मोठा ओटा आणि मोकळा परिसर असावा, सर्व भाजीविक्रेत्यांना सामावून घ्यावे, असे भाजीविक्रेत्यांचे म्हणणे आहे.
बंद असलेल्या भाजीमंडईचा रुग्णालयातील रुग्ण, कर्मचारी आणि नागरिक यांना त्रास सहन करावा लागत आहे. या वास्तूला लागूनच महापालिकेचे ‘स्वर्गीय इंदिरा गांधी रुग्णालय’ आहे. सांगवीसह इतर भागांतील रुग्ण नातेवाइकांची या रुग्णालयात मोठी वर्दळ असते. सध्या काही विक्रेते केवळ भाजीमाल ठेवण्यासाठी येथील गाळे आणि स्वच्छतागृह यांचा वापर करतात. उपद्रवी मंडळींचा वावरही या बंद असलेल्या वास्तूत वाढला आहे. बंद असलेल्या भाजीमंडईच्या जागेत रुग्णालयाचे तरी विस्तारीकरण करावे, असाही नागरिकांचा मतप्रवाह आहे.