केरळमधील ‘ललित कला अकॅडमी’कडून देश, हिंदु धर्म आणि गाय यांचा अवमान करणार्‍या व्यंगचित्राला पुरस्कार !

  • नास्तिकतावादी आणि राष्ट्रघातकी विचारांच्या कम्युनिस्ट सरकारच्या राज्यात याहून वेगळे काय होणार ? – संपादक 
  • हिंदूंनी याविरोधात संघटित होऊन पोलिसांत तक्रार करून पोलिसांना कारवाई करण्यास भाग पाडले पाहिजे ! – संपादक 

थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळमधील ‘ललित कला अकॅडमी’ने देश, हिंदु धर्म आणि गाय यांचा अवमान करणार्‍या एका व्यंगचित्राला पुरस्कार देऊन त्याचा सन्मान केल्याची घटना नुकतीच घडली. या व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहे की, कोरोनाविषयी जागतिक संमेलन चालू असून त्यामध्ये अमेरिका, इंग्लंड आणि चीन या देशांचे प्रतिनिधी बसले आहेत. त्यात भारताचा प्रतिनिधी म्हणून गाय दाखवण्यात आली आहे. या गायीला भगवे वस्त्र घालण्यात आले आहे. हे पाहून अन्य देश भारताकडे आश्चर्याने पहात आहेत. या चित्राला ‘कोविड -१९ इन इंडिया’ असे नाव देण्यात आले आहे. केरळच्या पोन्नुरुन्नि येथे रहाणार्‍या अनूप राधाकृष्णन् याने हे व्यंगचित्र काढले आहे.

(वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)

१. केरळमधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुरेंद्रन् यांनी या व्यंगचित्राला आणि त्याला देण्यात आलेल्या पुरस्काराला विरोध केला आहे. ते म्हणाले की, उच्चपदावर बसलेले काही जण जाणीवपूर्वक भारत आणि हिंदु धर्म यांना अपकीर्त करत आहेत.

२. ललित कला अकॅडमीचे अध्यक्ष नेमोन पुष्पराज यांनी स्पष्टीकरण देतांना म्हटले की, पुरस्कारासाठी व्यंगचित्राची निवड प्रतिष्ठित व्यंगचित्रकारांकडून केली जाते. या तज्ञांनीच ३ चित्रांची निवड केली. यात ॲकेडमीची कोणतीही भूमिका नाही. (जरी निवड तज्ञांनी केली असली, तरी अकॅडमीच्या नावाने पुरस्कार दिला जाणार असल्याने तिने हस्तक्षेप करून तो रहित करणे अपेक्षित आहे, तसेच अशा तज्ञांना चुकीची निवड केल्यासाठी आणि असे चित्र काढणार्‍याला खडसावणेही आवश्यक आहे ! – संपादक)