आंध्रप्रदेशात पुरामुळे १७ जणांचा मृत्यू, तर १०० जण बेपत्ता

आंध्रप्रदेशातील पूरस्थिती

अमरावती (आंध्रप्रदेश) – आंध्रप्रदेश राज्यात मुसळधार पावसामुळे आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १०० जण बेपत्ता झाले आहेत. वायूदल, ‘एस्.डी.आर्.एफ्.’ आणि अग्नीशमन दल यांच्या साहाय्याने पुराच्या पाण्यात अडकलेल्या अनेकांना वाचवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याशी दूरभाषवरून संवाद साधला आणि पूरस्थितीचा आढावा घेऊन ‘राज्याला सर्वोतोपरी साहाय्य केले जाईल’, असे आश्‍वासन दिले.

१. मुसळधार पावसाने नद्या आणि नाले यांना पूर आला आहे. त्यामुळे अनेक गावे पुराने वेढली गेली आहेत. काही ठिकाणी रस्तेही वाहून गेले आहेत. तिरुमला येथील डोंगरांवरून वहाणार्‍या पाण्याचे रौद्ररूपही येथे पहायला मिळत आहे. तिरुपतीच्या बाहेरील स्वर्णमुखी नदीला पूर आला आहे. पुरामुळे परिस्थिती एवढी बिकट झाली आहे की, बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टर आणि जेसीबी यांचे साहाय्य घ्यावे लागत आहे.

२. कडप्पा जिल्ह्यातील अन्नामय्या परियोजनेतील बांध फुटल्यामुळे अचानक पूर आला आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी येथील शिवमंदिरात पूजा करण्यासाठी गेलेले भाविक अचानक आलेल्या पुरामुळे अडकले, तर काही जण वाहून गेले. बेपत्ता लोकांना शोधण्यासाठी बचाव अभियान चालू आहे.