पंजाब भारतापासून स्वतंत्र देश बनवण्यासाठी लंडन येथे खलिस्तानी संघटनेकडून जनमत संग्रह

या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यासाठी भारताने ब्रिटनवर दबाव आणला पाहिजे आणि अन्यत्र अशा घटना होणार नाहीत, यासाठी सतर्क राहिले पाहिजे ! – संपादक

खलिस्तानी संघटना ‘सिख फॉर जस्टिस’ ने जनमत संग्रहाची पहिली फेरी लंडन येथे आयोजित केली

लंडन (ब्रिटन) – खालिस्तानी आतंकवादी संघटनेने स्वतंत्र देशाच्या मागणीसाठी जनमत संग्रहाचा प्रयत्न चालू केले आहेत. ३१ ऑक्टोबर या दिवशी अमेरिकेतील खलिस्तानी संघटना ‘सिख फॉर जस्टिस’ ने जनमत संग्रहाची पहिली फेरी लंडन येथे आयोजित केली होती. यात शिखांना ‘पंजाब’ एक स्वतंत्र देश असला पाहिजे कि नाही ?’, यावर मतदान करायचे होते. अशा प्रकारच्या फेर्‍या युरोपमधील अन्य देश आणि अमेरिका अन् कॅनडा येथेही आयोजित करण्यात येणार आहेत. यात भारतीय वंशाच्या १८ वर्षांवरील लोकांना मतदान करण्याची अनुमती आहे. लंडनमध्ये हे मतदान वेस्टमिनिस्टरमधील एलिझाबेथ सेंटर येथे झाले. या वेळी भारतविरोधी घोषणाबाजी, तसेच ‘खलिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या, तसेच खलिस्तानचा झेंडाही फडकावण्यात आला.

या संघटनेचा संस्थापक गुरपतवंतसिंह पन्नू याने सांगितले की, या जनमत संग्रहामध्ये ३० सहस्र शिखांनी मतदान केले. ‘सिख फॉर जस्टिस’ या संघटनेवर भारतात बंदी घालण्यात आलेली आहे.