‘सर्व कला ईश्वरनिर्मित आहेत. त्यामुळे ‘ईश्वरप्राप्तीचा साधनामार्ग’ या दृष्टीने त्या कलांकडे पाहिल्यास त्यांतून ईश्वरी तत्त्वाची अनुभूती आल्याविना रहात नाही. पूर्वीच्या काळी संगीतातून साधना करून ईश्वरी तत्त्वाची अनुभूती घेतलेल्या अनेक भक्तीमार्गी संतांची नावे सर्वपरिचित आहेत. त्यांत ‘संत मीराबाई, अंध असूनही संगीताद्वारे भगवंताला प्रसन्न करणारे संत सूरदास, गुजरात येथील संत नरसी मेहता, प्रसिद्ध गायक तानसेन यांचे गुरु श्रीकृष्णभक्त स्वामी हरिदास’, अशी कितीतरी नावे घेता येतील. ‘संगीताच्या माध्यमातून ईश्वरी तत्त्वाची अनुभूती घेता येणे केवळ त्याच काळात शक्य होते’, असे नसून आजच्या काळातही आपण ही अनुभूती घेऊ शकतो. अशाच प्रकारे ईश्वरी तत्त्वाची अनुभूती घेतलेले आणि संतपदापर्यंत पोचलेले पुणे येथील एक प्रसिद्ध बासरीवादक पू. पंडित केशव गिंडे यांच्याशी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा संपर्क झाला. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी त्यांच्याशी साधलेल्या संवादातून ‘संगीताच्या माध्यमातून ईश्वराच्या समीप कसे जाऊ शकतो ? संगीत साधना करत असतांना अध्यात्मात प्रगती करण्यासाठी साधकात कोणते गुण असणे आवश्यक आहे ? कोणत्याही साधनामार्गात गुरुकृपेविना तरणोपाय नाही’, हा सिद्धांत संगीत साधना करतांनाही कसा लागू पडतो ?’, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली.
पू. पंडित केशव गिंडे हे लहानपणापासून कोणत्याही कार्यक्रमाचा आरंभ ईशस्तवनाने (भगवान श्रीकृष्णाच्या स्तुतीने) आणि दैवत श्री गजानन यांच्या भजनाने करतात. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ त्यांना भेटल्या, त्या दिवशीही त्यांनी प्रश्नोत्तराचा आरंभ विनायकी चतुर्थीचे औचित्य साधून विद्येची देवता श्री गणेश आणि गुरु यांना नमन करून ‘प्रथम तुला वंदितो…’ या भजनाचे बासरीवादन करून केला. हे भावपूर्ण वादन ऐकून श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा भाव जागृत झाला. ‘संगीताच्या माध्यमातून साधना कशी करावी ?’, हे सर्व वाचकांना अभ्यासता यावे, यासाठी पू. पंडित केशव गिंडे यांचा साधनाप्रवास संवादरूपी लेखाद्वारे येथे दिला आहे. ‘हा लेख वाचून सर्व कलाकारांना साधनारत होण्याची प्रेरणा मिळो’, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !’
– कु. तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) (संगीत विशारद), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.
पू. पंडित केशव गिंडे यांचा परिचय‘पू. पंडित केशव गिंडे यांचा जन्म बेळगाव येथे झाला. त्यांच्या घराण्यात वारकरी संप्रदायाची आणि भजन-कीर्तनाची परंपरा होती. आजोबा पखवाजवादक, तर भावंडे सतार, दिलरूबा, तबला आणि व्हायोलीन ही वाद्ये वाजवत. या संगीतसंस्कारामुळे आणि आईच्या आवडीमुळे बालपणीच पू. पंडित गिंडे यांचे बासरी अन् पखवाजाचे शिक्षण चालू झाले. त्यांनी पंडित पन्नालाल घोष यांच्याकडून बासरी-वादनाचे शिक्षण घेतले. पू. पंडित गिंडे यांनी वाद्यातील त्रुटींचा अभ्यास करून अनेक प्रयोगांमधून वाद्यात सुधारणा केल्या. त्यातून अतिखर्ज ते अतितार स्वरांमध्ये वाजणार्या केशव वेणू, खर्ज बासरी, श्रीकृष्ण मुरली, माधव वेणू अशा बासर्यांची त्यांनी रचना केली. पंडित गिंडे यांनी आजपर्यंत दूरदर्शन आणि आकाशवाणी यांवरून संगीताचे अनेक अखिल भारतीय कार्यक्रम, तसेच देशविदेशांत संगीत समारंभातून बासरीवादनाच्या मैफिली घेतल्या आहेत. त्यांनी देशविदेशांतील विश्वविद्यालयांतील संगीत विभागात व्याख्याने आणि प्रात्यक्षिके घेतली आहेत, तसेच संगीतविषयक नियतकालिके, पुस्तके अन् वृत्तपत्रे यांतून बासरीविषयी विपुल लेखन केलेले आहे. आजपर्यंत त्यांनी केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण वेणूनिर्मितीची ‘गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’, ‘लिम्का बूक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘गोल्डन बूक ऑफ रेकॉर्ड्स’ यांमध्ये नोंदणी झाली आहे.’ |
१. पू. पंडित केशव गिंडे यांच्या बासरीवादनाचा प्रवास
१ अ. रेल्वेच्या प्रवासात आईने एक बासरी घेऊन देणे आणि तेथूनच बासरीवादनाचा प्रवास चालू होणे
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ : आपला बासरीवादनाचा आरंभ कसा झाला ?
पू. पंडित केशव गिंडे : बेळगावच्या जवळ असलेल्या खानापूर गावात श्री महालक्ष्मीदेवीची मोठी जत्रा होती. त्या वेळी मी साधारण ५-६ वर्षांचा असेन. आम्ही रेल्वेने प्रवास करत असतांना रेल्वेत पुष्कळ गर्दी होती. त्यामुळे आम्हा सर्व भावंडांची रडारड चालू झाली. तेव्हा आईने मला एक बासरी विकत घेऊन दिली. त्यामुळे मी ती वाजवण्यात पूर्णपणे गुंग झालो. हा माझा बासरीचा पहिला परिचय ! अजूनही ती बासरी माझ्याकडे आहे.
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ : तेव्हा साक्षात् भगवंतानेच तुमच्या हातात बासरी दिली !
१ आ. पंडित पन्नालाल घोष यांची बासरी ऐकल्यावर भावजागृती होणे, त्यांच्यासारखी बासरी वाजवायचे ठरवणे
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ : आम्हाला तुमचे गुरु पंडित पन्नालाल घोष आणि तुमची गुरुपरंपरा यांविषयी सांगा.
पू. पंडित केशव गिंडे : माझे पहिले गुरु पंडित नारायणराव बोरकर हे बालगंधर्व आणि मास्टर दिनानाथ मंगेशकर यांच्या नाटक कंपनीत ‘ऑर्गन’ वादक होते. त्यांच्याकडे मी उभ्या बासरीवर (हातामध्ये बासरी उभी धरण्ो) २५-३० राग शिकलो. ते बेळगावच्या गांधर्व महाविद्यालयाचे प्रमुख होते. वर्ष १९५० मध्ये एका राष्ट्रीय कार्यक्रमात मी पंडित पन्नालाल घोष यांची आडवी बासरी (हातामध्ये बासरी आडवी धरण्ो) ऐकली. ती ऐकल्यावर माझी पुष्कळ भावजागृती झाली. त्यानंतर मी ठरवले, ‘बासरी वाजवायची, तर अशीच !’; पण त्या काळी एवढी मोठी बासरी कुठेही मिळत नसे. संपूर्ण भारतात तशी बासरी केवळ पंडित पन्नालाल घोष आणि त्यांचे २-३ शिष्यच वाजवायचे. अशी बासरी बनवायची, तर त्यांच्याकडेच जाणे आवश्यक होते; परंतु तेव्हा मी ८ वर्षांचा होतो. माझी आई मला म्हणायची, ‘‘आधी तू शिक्षण घे. नंतर बासरी इत्यादी बघ.’’ त्याच वेळी व्हायोलिनवादक असलेल्या माझ्या चुलत बंधूंचे एक मित्र एका प्रसिद्ध बासरीवादकांकडे बासरी शिकायला जायचे. त्यांनी मला एक छोटी आडवी बासरी आणून दिली; पण ‘ती कशी धरायची आणि वाजवायची कशी ?’, हे मला ठाऊक नव्हते. मग मी माझ्याकडे असलेल्या पंडित घोष यांच्या छायाचित्रातील बासरी धरण्याची पद्धत बघून आरशात बघून बासरी वाजवायला आरंभ केला.
१ इ. श्री गुरूंकडे बासरी शिकण्यासाठी गेल्यावर त्यांनी बासरी धरण्याची पद्धत चुकीची असल्याचे सांगणे
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ : तुमचा पुढचा संगीताचा प्रवास कसा झाला ?
पू. पंडित केशव गिंडे : बेळगावला मी ज्या बासरीवादकांकडे शिकत होतो; त्यांच्याकडे बासरीवादनाचे तंत्र नव्हते. ‘चांगली बासरी शिकवणारे गुरु मिळावेत’, अशी माझी तळमळ होती. त्या कालावधीत माझ्या वडिलांचे नोकरीनिमित्त बेळगावहून पुण्याला स्थानांतर झाले. तेथे पोलीसदलात श्री. मोरे नावाचे एक बासरीवादक रहायचे. ते पोलिसांच्या पथकामध्ये उत्तम बासरी वाजवायचे. त्यांनी मला एक बासरी आणून दिली. माझी १० वीची परीक्षा झाल्यावर मी वरळीला (मुंबई) एका सरोदवादकांकडे गेलो. त्यांनी मला पंडित हरिपद चौधरी या प्रसिद्ध बासरीवादकांचा पत्ता दिला. मी मालाडला त्यांच्या घरी गेलो. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘तुला काय वाजवता येते, ते वाजव.’’ मी बासरीवर वाजवायला सगळ्यात सोपा असलेला राग ‘हंसध्वनी’ वाजवला. ते म्हणाले, ‘‘आता ‘भैरवी’ वाजव.’’ मला ‘भैरवी’ चांगली वाजवता येत नव्हती. ती माझी सत्त्वपरीक्षा होती. मी त्यांना सांगितले, ‘‘मला भैरवी चांगली वाजवता येत नाही.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘मला ठाऊक होतेच; कारण तुझी बासरी धरण्याची पद्धतच चुकीची आहे.’’ त्यानंतर त्यांनी मला बासरी धरण्याची योग्य पद्धत सांगून बासरीवादन शिकवले.
१ ई. गुरु पंडित हरिपद चौधरी यांना गुरुदक्षिणेविषयी विचारल्यावर त्यांनी ‘किती गुरुदक्षिणा देऊ शकतोस ?’, असे विचारणे; परंतु पंडित चौधरी यांना कोणतेही शुल्क न घेता विद्यादान करणारे गुरु (पंडित पन्नालाल घोष) लाभल्याने गुरुऋण फेडण्यासाठी त्यांनीही कोणतेही शुल्क न घेता बासरीवादन शिकवणे
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ : तुम्ही गुरूंकडे शिकत असतांना गुरूंनी परीक्षासुद्धा घेतली असेल ना ? त्याविषयी सांगा.
पू. पंडित केशव गिंडे : मी पहिल्याच दिवशी गुरु पंडित हरिपद चौधरी यांना प्रश्न विचारला, ‘‘आपली गुरुदक्षिणा काय ?’’ ते २ मिनिटे शांत राहिले आणि त्यांनी मला प्रतिप्रश्न केला, ‘‘तू किती देऊ शकतोस ?’’ मी म्हटले, ‘‘मला काही सांगता येत नाही. आपली विद्या आणि कला यांची मी काय दक्षिणा देणार ? माझी पंडित घोष यांच्या पद्धतीने बासरी शिकण्याची मनापासून इच्छा आहे. आपण आपले शुल्क सांगा. मी देण्याचा प्रयत्न करीन.’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘तुला ठाऊक आहे का ? ‘एखादा शिष्य चांगले गुरु मिळावे’, यासाठी वाट पहात असतो, तसे गुरुसुद्धा ‘चांगला शिष्य मिळावा’, यासाठी वाट पहात असतात. आज मला तुझ्यासारखा शिष्य मिळाला आहे, तर तुझ्याकडे पैसे मागून मी तुला शिकण्यापासून वंचित करू इच्छित नाही. आपल्या या गुरुपरंपरेमध्ये पैसे घेऊन कुणीही विद्यादान केले नाही. ही परंपरा ‘उस्ताद अल्लाउद्दीन खांसाहेब’ यांच्यापासून चालत आली आहे. माझे गुरु पंडित पन्नालाल घोष यांनी माझ्याकडून कधीही पैसे घेतले नाहीत. वर्ष १९६६ मध्ये मी त्यांच्याकडे गेलो होतो. तेव्हा ते १०२ वर्षांचे होते. तोपर्यंत ते कोणतेही शुल्क न घेता विद्यादान करत होते. अशा गुरुपरंपरेत आल्याने गुरुऋण फेडण्यासाठी मीही आजपर्यंत कोणतेही शुल्क न घेता बासरीवादन शिकवत आहे.’’
१ उ. श्री गुरूंकडे संगीत शिकतांना संगीताच्या समवेत इतरही अनेक चांगले संस्कार होणे
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ : म्हणूनच त्या सुरांत त्यागाचा भाव आहे. केवढा मोठा संस्कार आहे !
पू. पंडित केशव गिंडे : हो. ‘श्री गुरूंकडे शिकतांना संगीताचे संस्कार होतांनाच इतरही अनेक चांगले संस्कार कसे होतात ?’, याचे हे एक उदाहरण आहे.
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ : खरोखर आज हा त्यागाचा संस्कार लुप्तच झाला आहे. ‘असेही योगदान असू शकते’, अशी आजच्या काळात कल्पनाही करता येत नाही. गुरु खरोखरच तुमची वाट बघत होते. ‘सत्पात्रे दानम्’ म्हणतात ना, तसेच हे आहे.
पू. पंडित केशव गिंडे : केवळ तुम्हीच नव्हे, तर सुप्रसिद्ध संतुरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांनीही हीच खंत व्यक्त केली आहे. ते म्हणतात, ‘‘मीही चांगल्या शिष्याची वाट पहात आहे. मला शिष्य मिळण्यात आनंद आहे, दक्षिणा मिळण्यात नाही.’’
१ ऊ. श्री गुरूंनी बासरीवादनाचे ध्वनीमुद्रण करू न देता ते डोक्यात पक्के करून ठेवण्यास सांगणे
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ : गुरु कधी तुमच्यावर रागावले होते का ?
पू. पंडित केशव गिंडे : माझ्या संदर्भात तसे कधी झाले नाही; पण पंडित मुर्डेश्वरजी नावाचे दुसरे गुरु थोडे कडक होते. नीट वाजवता आले नाही, तर ते रागवायचे. त्यामुळे नीट सराव करून जावे लागायचे. ते ध्वनीमुद्रण करू द्यायचे नाहीत. ते म्हणायचे, ‘‘ध्वनीमुद्रण केलेले ध्वनीफितीतच रहाते. शिकवलेले डोक्यात ध्वनीमुद्रण (रेकॉर्ड) करून ठेव आणि जे डोक्यात राहील, तेवढेच शिक अन् वाजव; पण जे शिकशील, ते पक्के हवे.’’ त्यामुळे त्या २-३ घंट्यांत ते जे काही शिकवायचे, त्याचे मी हृदयात पक्के ध्वनीमुद्रण करून ठेवायचो.’
२. पू. पंडित केशव गिंडे यांचा आध्यात्मिक प्रवास
पू. पंडित केशव गिंडे : ‘आमच्या घरामध्ये नियमित पूजा चालायची. घरामध्ये वैश्वदेव, काकबली, गोग्रास हे प्रतिदिन व्हायचे आणि प्रतिदिन सोवळ्यात पवमान सूक्त (श्रीविष्णूची कृपा संपादन करण्यासाठी म्हणायचे सूक्त) म्हणत अभिषेक करून श्रीकृष्णाची पूजा व्हायची. आमच्या काकांना पू. पांडुरंग महाराज (चिदंबर दीक्षित महास्वामी यांचे नातू) यांनी दीक्षा दिली होती. माझ्या चुलत भावामध्ये त्यांचा (पू. पांडुरंग महाराजांचा) संचार व्हायचा. त्यांनी मला सांगितले, ‘‘तू गणपतीची आराधना कर.’’ एके दिवशी माझा अकस्मात् रामाचा त्रयोदशाक्षरी मंत्रजप (श्रीराम जय राम जय जय राम ।) चालू झाला. मी रामाच्या देवळात जाऊन दमेपर्यंत प्रदक्षिणा घालायचो. अशा सहस्रो प्रदक्षिणा मी घालत असे. हळूहळू माझी साधनेची ओढ वाढत गेली आणि ‘साधनेत मार्गदर्शन करणारे गुरु हवेत’, असे मला वाटू लागले.
२ अ. प.पू. गुळवणी महाराज यांची भेट !
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ : खरंच ‘गुरुकृपेविना काही नाही’, हे लक्षात येते. जीवनात गुरु हवेच !
पू. पंडित केशव गिंडे : वर्ष १९६६ मध्ये मी प.पू. गुळवणी महाराज यांच्याकडे पुण्याला गेलो. तेव्हा ते त्यांच्या अनेक भक्तांसह बसले होते. सगळ्यांची प्रश्नोत्तरे झाली. मग त्यांनी माझ्याकडे दृष्टी वळवून मला विचारले, ‘‘तुम्हाला काही विचारायचे आहे का ?’’ मी त्यांना सांगितले, ‘‘मला एकांतात विचारायचे आहे.’’ मग ते मला त्यांच्या झोपायच्या खोलीत घेऊन गेले. आमच्यात पुढील संवाद झाला.
प.पू. गुळवणी महाराज : काय विचारायचे आहे ?
मी (पू. पंडित केशव गिंडे ) : आपल्याला एकमुखी दत्तात्रेयाची भेट झाली आहे. (प.पू. टेंबेस्वामींनी त्यांना दत्तात्रेयांच्या रूपात दर्शन दिले होते.) तशी भेट आपण मला घडवून आणू शकाल का ?
प.पू. गुळवणी महाराज (खिडकीतून दिसणार्या झाडाकडे बोट दाखवून) : याला किती पाने आहेत ?
मी : अनेक पाने आहेत.
प.पू. गुळवणी महाराज : दत्तात्रेयांच्या भेटीसाठी तेवढे जन्म घ्यावे लागतात.
मी : आपल्यासारखे गुरु असतांना आता किती जन्म वाया घालवायचे ?
प.पू. गुळवणी महाराज : तुमची भेट होणार आहे; पण मी इतक्यात काही सांगू शकत नाही. तुम्ही तुमची सध्या करत असलेली साधना चालू ठेवा.
मी : आपल्यासारखे सद्गुरु समोर असतांना माझी साधना गुरुविना चालू आहे. असे करणे कितपत योग्य आहे ? आपण मला दीक्षा द्यावी आणि अनुग्रहित करावे. ‘तुम्ही कुंडलिनी जागृतीची दीक्षा देता’, असे मला समजले आहे.
प.पू. गुळवणी महाराज : तुम्हाला दीक्षेची आवश्यकता नाही.
(असे सांगून गुरु आपली परीक्षा बघतात. ‘आपली ईश्वरप्राप्तीची तळमळ किती आहे ?’, हे ते पहातात. – पू. पंडित केशव गिंडे)
मी : परमेश्वराच्या भेटीसाठी तुम्ही इतकी पाने पाहिली. माझ्या जीवनात सद्गुरु भेट आहे, तर माझ्यावर पहिले पान पडू द्या.
प.पू. गुळवणी महाराज : ठीक आहे. तुम्ही एक मासाने माझ्याकडे या. मी तुम्हाला दीक्षा देतो.
२ अ १. श्री गुरु प.पू. गुळवणी महाराज यांनी ‘स्पर्श दीक्षा’ दिल्यावर साडेतीन घंटे भावसमाधी लागणे
पू. पंडित केशव गिंडे : एक मासाने मी प.पू. गुळवणी महाराज यांच्याकडे गेलो. ते दीक्षा घेण्यासाठी आलेल्यांना सकाळी ६ वाजता अंघोळ करून पंचा नेसून आश्रमातील एका मोठ्या खोलीत बसायला सांगतात. त्याप्रमाणे मी सकाळी ६ वाजता अंघोळ केली आणि पंचा नेसून त्या खोलीत बसलो. नंतर महाराज आले. त्यांनी मला त्यांच्या समोर बसवून डोळे बंद करायला सांगितले. त्यांनी माझ्या डोक्याच्या टाळूवर हात ठेवला आणि दत्तात्रेयांचा मंत्र पुटपुटला. नंतर त्यांनी माझ्या बेंबीला आणि छातीला हात लावला. ते म्हणाले, ‘‘किती वाजले पाहिले का ?’’ मी सांगितले, ‘‘सकाळचे ६.३० वाजले आहेत.’’ नंतर त्यांनी पुन्हा माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला सांगितले, ‘‘डोळे उघड.’’ तेव्हा ‘ते एका क्षणात ‘डोळे उघड’, असे का सांगत आहेत ? आताच त्यांनी मला बसवले आणि इतक्या लवकर का उठवले ?’, असे मला वाटले. ते म्हणाले, ‘‘किती वाजले बघितले का ?’’ तेव्हा सकाळचे १० वाजले होते. ही माझी पहिली अनुभूती. मी ३.३० घंटे ध्यानावस्थेत होतो. त्या वेळी ‘शरिरात कोणतीही क्रिया नव्हती आणि सभोवताली काय चालले आहे ?’, याचे मला भान नव्हते. ‘मनामध्ये आनंद भरून राहिला आहे’, अशा स्थितीत मी बसलो होतो. ‘हे मी कसे काय अनुभवले ?’, हे आठवून अजूनही माझ्या अंगावर काटा (रोमांच) येतो.
२ अ २. प.पू. गुळवणी महाराज यांनी प्रतिदिन ध्यान करण्यास सांगणे, त्यानुसार नियमित ध्यान करणे : त्यानंतर त्यांनी मला सांगितले, ‘‘आता घरी जायचे आणि प्रतिदिन सकाळी किंवा संध्याकाळी बसून ध्यान करायचे.’’ त्यानंतर माझ्या ध्यानाला आरंभ झाला. वर्ष १९६६ पासून वर्ष २०१९ पर्यंत मी नियमित पहाटे ३.१० वाजता उठतो आणि सकाळी ६ वाजेपर्यंत जपजाप्य, ध्यान आदी करतो. अशा प्रकारच्या दीक्षेला ‘स्पर्श दीक्षा’ (गुरूंनी शिष्याला स्पर्श करून स्वतःतील दैवी ऊर्जा शिष्यामध्ये प्रक्षेपित करणे आणि त्याची कुंडलिनी जागृत करणे) म्हणतात. या दीक्षेमध्ये मंत्र नसतो. केवळ डोळे मिटून कोणताही विचार न करता जे होईल, ते पहायचे. त्यामुळे शांत वाटते आणि आनंद होतो. हीच साधना असते. याला कुंडलिनी जागृतीची ‘सहजयोग साधना’ असेही म्हणतात.
२ अ ३. प.पू. गुळवणी महाराज यांनी ‘अशी समाधी लागणारा तू माझा दुसरा शिष्य आहेस’, असे सांगणे : प.पू. गुळवणी महाराज मला म्हणाले, ‘‘तू माझा दुसरा शिष्य आहेस, ज्याला ३.३० घंटे भावसमाधी लागली.’’ त्यांचे पहिले शिष्य पंडित सातवडेकर होते. त्यांनी वयाच्या १०१ व्या वर्षी प.पू. गुळवणी महाराज यांच्याकडून दीक्षा घेतली. त्यांना चारही वेद पाठ होते आणि उपनिषिदांविषयी ज्ञान होते. मी दीक्षा घेतली, त्या वेळी माझे वय साधारण २३ वर्षे होते.
(क्रमशः)
गुरुकृपेविना ‘मन निर्विचार करणे’, हे सर्वथैव अशक्य असणेगुरुकृपेमुळेच ‘निर्विचार स्थिती’ प्राप्त होते. नाहीतर मनाला शांत करणे शक्य नाही. श्रीकृष्णानेही गीतेत अर्जुनाला सांगितले आहे, ‘मन इतके चंचल आहे की, ते तुझ्या नियंत्रणात येणे शक्यच नाही.’ ते क्षणात पाताळात जाते, तर क्षणात स्वर्गात जाते. अशा मनावर गुरुकृपा किंवा परमेश्वरी आशीर्वाद या दोनच गोष्टींनी नियंत्रण मिळवणे शक्य आहे. – पू. पंडित केशव गिंडे |
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
भाग २ पहाण्यासाठी येथे क्लिक करा ः https://sanatanprabhat.org/marathi/520609.html