कणकवली – चिपी विमानतळाला जोडणार्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी घोषित केलेला साडेसात कोटी रुपये निधी पूर्वानुभव पहाता मिळेल कि नाही याविषयी शंका आहे. त्यामुळे घोषित केल्याप्रमाणे या रस्त्यांच्या कामांना प्रारंभ न झाल्यास मनसे आंदोलन करील, अशी चेतावणी मनसेचे राज्य सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिली.
मुंबईहून चिपी येथे विमानाने प्रवासी दीड घंट्यात पोचतील; मात्र रस्त्यांची दुरवस्था पहाता विमानतळापासून जिल्ह्यातील घरी जायला प्रवाशांना ३ घंटे लागतील. सत्ताधारी आणि विरोधक मात्र केवळ विमानतळाच्या श्रेयवादात अडकले आहेत. कोकण रेल्वेच्या ‘दिवा पॅसेंजर’ने मुंबईतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवघ्या १०० रुपयांत येता येते; मात्र रेल्वेस्थानकापासून घरी पोचण्यासाठी शेकडो रुपये अन्य वाहनांसाठी मोजावे लागतात. तशीच अवस्था चिपी येथे विमानाने येणार्यांची होणार आहे. त्यामुळे या विमानतळाचे भवितव्य अधांतरी आहे, अशी शंका उपरकर यांनी व्यक्त केली.