राज्यातील निवासी आधुनिक वैद्य बेमुदत संपावर !

मुंबई – राज्यातील निवासी आधुनिक वैद्य १ ऑक्टोबरपासून बेमुदत संपावर गेले आहेत. संपाच्या काळात सेंट जॉर्ज रुग्णालयात प्रशासन आणि निवासी आधुनिक वैद्य यांची ३ घंटे चर्चा झाली. या वेळी प्रशासनाकडून आधुनिक वैद्यांच्या मनधरणीचे प्रयत्न निष्फळ ठरले. राज्य सरकारकडून लेखी आश्वासन न मिळाल्याने संप चालू ठेवण्यात आला आहे.

कोरोनाच्या काळातील शुल्कमाफी, प्रोत्साहन भत्ता, वसतीगृह समस्या, पालिकेतील निवासी आधुनिक वैद्यांच्या वेतनातून टी.डी.एस्. वजा होणे, अशा विविध सूत्रांविषयी केवळ आश्वासने मिळाली; परंतु मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. ‘संपाच्या काळात कोरोनाबाधितांच्या उपचारांत खंड पडणार नाही’, असे ‘मार्ड’ संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. १८ वैद्यकीय महाविद्यालयांतील ५ सहस्र निवासी आधुनिक वैद्य संपात सहभागी झाले आहेत. रुग्णालयातील अत्यावश्यक सेवेतील आणि कोरोना कक्षातील निवासी आधुनिक वैद्य संपात सहभागी न होता सेवेत कायम रहातील.