शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचा घणाघात
नाशिक – ‘भाजीपाला विकणारे पालकमंत्री छगन भुजबळ २५ वर्षांत २५ सहस्र कोटी रुपयांचे मालक कसे झाले ? त्यांनी अधिकार नसतांनाही जिल्हा नियोजन निधीचे वाटप केले आहे. त्यामुळे त्यांचे पालकमंत्रीपद काढून घ्यावे’, अशी मागणी शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी ३० सप्टेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत केली.
ते पुढे म्हणाले की, भुजबळ हे केवळ भाई महाविद्यालयाचे विद्यार्थीच नाही, तर प्राचार्यही आहेत. त्यांच्या विरोधात माझ्याकडे पुरावे आहेत. हे सर्व पुरावे मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिले आहेत. गुन्हेगार ‘मी कधीच गुन्हा केला नाही’, हे सांगत असतो. जिल्हा नियोजन निधीचे १२ कोटी रुपये आले होते, त्यातील १० कोटी रुपये भुजबळ यांनी ठेकेदारांना वाटले. माझ्या मतदारसंघात फक्त २ कोटी रुपये दिले. भुजबळ यांना नियोजन निधी वाटपाचा अधिकार नाही. तरीही त्यांनी निधीचे वाटप करून अपव्यवहार केला आहे. त्यांचे पालकमंत्रीपद काढून घेतले पाहिजे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर म्हणाले की, भुजबळ यांनी नियोजनाचा निधी कंत्राटदारांच्या घशात घालायचे काम केले आहे. भुजबळ यांनी भ्रष्टाचार केला आहे. आमच्याकडे पुरावे आहेत. मी चर्चेला सिद्ध आहे.
आमदार सुहास कांदे यांच्यासह छोटा राजन याचा पुतण्या अक्षय निकाळजे यांना पोलिसांकडून समन्स बजावले जाणार !
नाशिक – येथील शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. ‘ही याचिका मागे घेण्यासाठी कुख्यात आंतरराष्ट्रीय गुंड छोटा राजन टोळीकडून स्वतःला धमकीचा दूरभाष आला आहे’, असे कांदे यांनी म्हटले होते. या आरोपानंतर येथील पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पोलीस आता आमदार कांदे यांच्यासह छोटा राजन याचा पुतण्या आणि रिपाई आठवले गटाचे युवा प्रदेशाध्यक्ष अक्षय निकाळजे यांना समन्स बजावणार आहेत.
‘आमदार कांदे यांचे भाऊ पथकर नाका चालवतात. या नाक्यावर स्वतःच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली होती, त्यासाठी मी सुहास कांदे यांना दूरभाष केला होता. त्यांना दूरभाषवर मी कोणतीही धमकी दिली नाही. ‘छगन भुजबळ यांच्या विरोधातील याचिका मागे घ्या’, असे म्हणालो नाही. मी मंत्री छगन भुजबळ यांना भेटलोही नाही. त्यामुळे मी कांदे यांच्याविरुद्ध तक्रार करून त्यांच्यावर मानहानीचा दावा ठोकणार आहे’, अशी चेतावणी अक्षय निकाळजे यांनी दिली आहे. ‘कांदे हे सर्व लोकप्रियतेसाठी करून पोलिसांची दिशाभूल करत आहेत. याविषयी गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार करणार आहे’, असेही त्यांनी सांगितले.