(म्हणे) ‘भारताचे ‘पाकिस्तान’ किंवा ‘तालिबान’ होऊ देणार नाही !’ – ममता बॅनर्जी

बंगालचे बांगलादेश होण्याकडे वाटचाल चालू आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी असे विधान करणे, हे हास्यास्पद होय ! ममता बॅनर्जी यांना राष्ट्रासाठी काही करावेसे वाटत असेल, तर त्यांनी बंगालमधील बांगलादेशी घुसखोरांना हुसकावून लावणे आवश्यक !

कोलकाता (बंगाल) – बंगाल भारताचे रक्षण करील आणि त्याला ‘पाकिस्तान’ किंवा ‘तालिबान’ होऊ देणार नाही; कारण ही रवींद्रनाथ टागोर आणि राष्ट्रीय कवी नझरुल इस्लाम यांची भूमी आहे. त्यामुळे इथे सर्व समुदायाचे लोक एकत्र रहातात, असे विधान बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले. त्या भवानीपूर येथील पोटनिवडणुकीपूर्वी आयोजित प्रसारसभेत बोलत होत्या. भवानीपूरमध्ये ४० टक्के लोकसंख्या ही बिगर बंगाली आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी भवानीपूरमधून निवडणूक लढवत असून त्यांच्या विरोधात भाजपने अधिवक्त्या प्रियांका टिबरीवाल यांना उमेदवारी दिली आहे. ३० सप्टेंबर या दिवशी येथे मतदान होणार आहे. बंगालमध्ये काही मासांपूर्वी पार पडलेल्या निवडणुकीच्या वेळी ममता बॅनर्जी या नंदीग्राम येथून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्या भाजपचे सुवेंदू अधिकारी यांच्याकडून पराभूत झाल्या. त्यानंतर भवानीपूर येथून निवडून आलेले तृणमूल काँग्रेसचे सोवनदेव चट्टोपाध्ये यांनी आमदारकीचे त्यागपत्र देऊन ही जागा रिक्त केली. त्यामुळे येथे पोटनिवडणूक होत आहे. घटनात्मक नियमांनुसार ७ नोव्हेंबर पर्यंत ममता बॅनर्जी यांना आमदार म्हणून निवडून येणे आवश्यक असल्याने ही निवडणूक जिंकणे त्यांना अपरिहार्य आहे.