‘वर्ष १९८० पासून सत्तेवर आलेल्या आतापर्यंतच्या सरकारांनी स्वतःच्या हीन, स्वातंत्र्यमूल्यद्रोही कृत्यांनी गोव्याच्या सांस्कृतिक मूल्यांशी आणि देवभूमी असलेल्या या सोज्वळ, आध्यात्मिक प्रतिमेशी अन् पोर्तुगीजपूर्व काळापासून अबाधितपणे चालत आलेल्या भारतीय संस्कृतीशी अक्षम्य किळसवाणा द्रोह केलेला आहे ! ज्या असंख्य सर्वधर्मीय स्वातंत्र्यसैनिकांनी ऐन तारुण्य, संसारसुख, कुटुंब, स्वतःचे भवितव्य आदी सगळेच पणाला लावून, शत्रू पोर्तुगिजांच्या गुलामीतून गोवा मुक्त करण्यासाठी प्रसंगी प्राणांचे बलीदान दिले, त्या सर्वांच्या त्यागाचा आणि स्वातंत्र्यमूल्य आकांक्षांचा पार चुराडा अन् घोर अपमान आतापर्यंतच्या सत्तांनी केलेला आहे ! हे परमेश्वरा, हे भारतमाते, हे क्रांतीदेवते, यांना कदापि क्षमा नको ! ते क्षमेस पात्र नाहीत. १९ डिसेंबर १९६१ या दिवशी भारतीय सैन्याने गोवा मुक्त केला. आपण सर्व स्वतःलाच आधी एक प्रश्न विचारू आणि त्याचे प्रामाणिक उत्तर शोधू.
यासंदर्भातील सूत्र क्रमांक ३ आणि ४ आपण १५.८.२०२१ या दिवशी पाहिली. आज त्यापुढील सूत्रे पाहूया.
५. रस्ते आणि गावांची पोर्तुगिजांनी ठेवलेली नावे अन् अपभ्रष्ट केलेली ‘स्पेलिंग्ज’ आणि उच्चार जसेच्या तसे ठेवले गेले आहेत.
६. काँग्रेस राजवटीत पर्यटनाचे निमित्त करून गोव्याची प्रतिमा ‘पूर्वेकडील रोम’ (रोम ऑफ द ईस्ट) अशी हेतूपुरस्सर करण्यात आली. काँग्रेसने पहिला कॅसिनो गोव्यात आणला. भाजपने त्यांची संख्या वाढवून ती ६ वर आणली. याखेरीज कॅसिनोंना ‘ऑफशोअर’ असतांनाही मांडवीत कायमचा स्थिर कायदेशीर दर्जा दिला.
(क्रमशः)
– प्रा. सुभाष वेलिंगकर, ‘भारतमाता की जय’ संघटना, गोवा.