हिंदु रक्षा अधिवेशनात भारतमाता की जय संघाच्या वतीने हिंदूरक्षण आणि हिंदूहित यांसाठी महत्त्वाचे ४ कृतीसंकल्प घोषित !

पणजी – गोव्यातील संघकामाची (रा.स्व. संघाच्या कामाची) षष्ट्यब्दि आणि प.पू. डॉ. हेडगेवार यांनी स्थापन केलेल्या रा.स्व. संघाची स्थापनाशताब्दी या २ संघपर्वण्या साधून, यामधल्या कालावधीत राज्यात १०० प्रभावी दैनंदिन शाखा निर्माण करण्यासमवेतच, गोवा सुरक्षा मंचच्या राजकीय कार्यासाठी ४ वर्षांपूर्वी मुक्त केलेल्या २०० कार्यकर्त्याना हिंदूसंघटनाच्या आजच्या स्थितीतील प्रथम प्राधान्याच्या कार्यासाठी पुन्हा ‘भारतमाता की जय संघा’त सामील करून घेण्याचा ऐतिहासिक निर्णय २२ ऑगस्टला पणजी येथील गोमंतक मराठा समाज सभागृह येथे झालेल्या ‘हिंदु रक्षा अधिवेशनात’ भारतमाता की जय संघाचे राज्य संघचालक प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी टाळ्यांच्या गजरात घोषित केला.

या वेळी व्यासपिठावर उत्तर, मध्य आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांचे संघचालक (भारतमाता की जय संघाचे चालक) अनुक्रमे श्री. पुरुषोत्तम कामत, डॉ. गोविंद देव, श्री. वासुदेव उपाख्य अभय खंवटे, तसेच राज्य कार्यवाह श्री. प्रवीण नेसवणकर, सहकार्यवाह प्रा. दत्ता पु. नाईक आणि श्री. संदीप पाळणी; व्यवस्थाप्रमुख श्री. सूर्यकांत गावस, राज्य मातृशक्ती प्रमुख सौ. शुभांगी गावडे अन् मावळते गोवा सुरक्षा मंचचे अध्यक्ष श्री. नितीन फळदेसाई उपस्थित होते.

१. संकल्पांतील प्रत्येक विषयाची मांडणी करणारे श्री. विनय नाईक, श्री. प्रवीण नाईक, अधिवक्ता रोशन सामंत, श्री. श्रीगणेश गावडे आणि श्री. जितेंद्र आमशेकर हेही व्यासपिठावर आसनस्थ होते. त्यांनीच कार्यसंकल्पाच्या संदर्भातील ५ ठराव मांडले आणि ओंकाराच्या गजरात दोन्ही हात उंचावून ते एकमताने संमत करून घेतले.

२. सध्या गोव्यातील व्यावसायिक, धनाधारित, तत्त्वहीन आणि अधःपतित राजकारणाची पार्श्वभूमी गोवा सुरक्षा मंचचे मावळते अध्यक्ष श्री. नितीन फळदेसाई यांनी स्पष्टपणे मांडली.

३. सर्व गोवा सुरक्षा मंचच्या कार्यकर्त्यांना सामावून घेण्यासाठी आणि संघकार्य सर्वस्पर्शी सर्वव्यापी करण्यासाठी ‘भारतमाता की जय’ यंत्रणेचे ३ जिल्हे आणि दोडामार्गसह २० तालुके यांची पुनर्रचना कार्यवाह प्रा. प्रवीण नेसवणकर यांनी मांडली.

४. अधिवेशनाचा प्रारंभ श्री. ओंकार केळकर यांच्या ‘धर्म के लिए जिए, समाज के लिए जिए, ये धडकने ये श्वास हो, मातृभूमी के लिए, पुण्यभूमी के लिए’ या सांघिक गीताने झाला.

५. प्रास्ताविक सहकार्यवाह प्रा. दत्ता पु. नाईक (शिरोडा) यांनी केले. भारतमाता की जय संघाच्या स्थापनेपासूनच्या कामाच्या वाढत्या आलेखाचा आढावा त्यांनी घेतला.

६. अधिवेशनाचा समारोप संघचालक प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी केला. सर्वांत शेवटी भगवा ध्वज लावून ‘नमस्ते सदा वत्सले मातृभूमे’ ही प्रार्थना म्हणून अधिवेशनाची सांगता झाली.


१०० दैनंदिन शाखांव्यतिरिक्त हिंदूरक्षण आणि हिंदूहित यांसाठी पुढील महत्त्वाचे ४ कृतीसंकल्प घोषित करण्यात आले.

१. सर्व हिंदु संस्था आणि संघटना एका व्यासपिठावर आणून ‘हिंदु महासंघ’ स्थापन करणे.

२. प्रौढ आणि विवाहित महिलांसाठी धर्मसंघटन, सामाजिक प्रबोधन विषयासाठी अन् युवती तथा बालिकांसाठी संस्कार, धर्मशिक्षण आणि आत्मरक्षण प्रशिक्षण यांसाठी समर्थ संघटित ‘मातृशक्ती’ विभाग स्वतंत्रपणे उभा करणे.

३. हिंदु समाजावरील आक्रमणे, धोके, आव्हानांची सखोल माहिती आणि अभ्यास करणारी २० ‘राष्ट्रीय जागृती केंद्रे’ संघरचित प्रत्येक तालुकास्थानी स्थापन करणे.

४. प्रतिकारक्षम प्रशिक्षित निडर धाडसी युवकांचे ‘धर्म रक्षा दल’ उभे करणे.

हे चारही निर्णय जून २०२२ या गोव्यातील संघकामाच्या (गोव्यातील रा.स्व. संघकामाच्या) षष्ट्यब्दिपर्यंत कार्यान्वित करण्याची ग्वाही अधिवेशनात देण्यात आली.