प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना काढणे अपेक्षित आहे ! – संपादक
किरकटवाडी – पावसाळा चालू झाल्यापासून खडकवासला, किरकटवाडी आणि नांदेड या गावांमध्ये डेंग्यूच्या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राकडे केवळ ५-६ रुग्णांची नोंद असली, तरी खासगी चिकित्सालयांमध्ये डेंग्यूवर उपचार घेणार्या रुग्णांची संख्या अधिक आहे; मात्र असे असूनही महापालिका प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत आहे.
आरोग्य कर्मचारी आणि आशासेविका डेंग्यूच्या रुग्णांचे सर्वेक्षण करत असून ज्या परिसरात रुग्ण आढळून येत आहेत, तेथे प्रतिबंधात्मक औषध फवारणी करत असल्याचे खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. वंदना गवळी यांनी सांगितले.
‘डेंग्यूचा संसर्ग रोखण्यासाठी वेळीच उपाययोजना न काढल्यास अधिक संसर्ग होऊ शकतो’, असे मत खडकवासल्याचे सरपंच सौरभ मते यांनी व्यक्त केले. ‘मनुष्यबळ अल्प असल्याने सध्या औषध फवारणीमध्ये अडचणी येत आहेत; मात्र तक्रार येईल, त्याप्रमाणे आणि जेथे रुग्ण आढळतील, तेथे धूर आणि औषध फवारणी करण्यात येत आहे. प्रत्येक गावात फवारणीसाठी कर्मचारी उपलब्ध झाल्यास वेग वाढेल’, असे सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील औषध फवारणी विभागाचे श्याम माने यांनी सांगितले.