कारागृहाच्या नवीन नियमानुसार कारागृहातून बंदीवान पळाल्यास कारागृहातील उत्तरदायी अधिकार्‍यावर होणार कायदेशीर कारवाई !

पणजी, २२ ऑगस्ट (वार्ता.) – कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातून मागील दीड वर्षात अनेक बंदीवानांनी (कैद्यांनी) पलायन केले. अशा घटनांनंतर कारागृहातील उत्तरदायी कारागृहरक्षक आदींवर त्यांना सेवेतून काही काळासाठी निलंबित करण्याची कारवाई करण्यात येत होती; मात्र आता कारागृहाच्या नवीन नियमानुसार बंदीवानाने पलायन केल्याचे उघड झाल्यास कारागृहातील उत्तरदायी अधिकार्‍यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

कारागृहाच्या नवीन नियमानुसार कारागृहातील एखाद्या बंदीवानाने कारागृहरक्षकाच्या सेवेतील निष्काळजीपणामुळे कारागृहातून पलायन केल्यास कारागृहातील संबंधित अधिकार्‍यावर भारतीय दंड संहितेचे कलम २२२, २२३ आणि २२५ (अ) अंतर्गत गुन्हा प्रविष्ट करण्यात येणार आहे. कारागृहातून एखाद्या बंदीवानाने पलायन केल्यास कारागृह महानिरीक्षकाने त्वरित कारागृह अधीक्षक किंवा त्याहून अधिक पदाच्या व्यक्तीच्या माध्यमातून घटनेचे स्वतंत्र अन्वेषण करणे आवश्यक आहे. अन्वेषण करणारा हा अधिकारी घटना घडलेल्या कारागृहात सेवेला असू नये.

या नवीन कायद्याविषयी अधिक माहिती देतांना कारागृहातील एक अधिकारी म्हणाला, ‘‘कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातून बंदीवानाने पलायन केल्याने आतापर्यंत अनेक कारागृहरक्षकांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे आणि या शिक्षेचा त्यांच्यावर कोणताही परिणाम होत नव्हता. अनेक कारागृहरक्षक प्रतिदिन सेवेचे घंटे संपल्यानंतर ‘मोटारसायकल टॅक्सी पायलट’ (गोव्यात मोटरसायकल टॅक्सीसेवा असते.) आदी अन्य कामे करत असतात. कारागृहातील अनेक बंदीवानांनी ‘पॅरोल’ वर सुटून जाण्याच्या नियमाचा गैरवापर केला आहे.’’ कारागृहातील एक निवृत्त अधिकारी म्हणाले, ‘‘कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात अनेक बंदीवानांनी यंत्रणांमधील त्रुटींचा मोठ्या प्रमाणावर अपलाभ घेतलेला आहे.’’ (यंत्रणांमध्ये त्रुटी आहेत, तर त्या त्रुटी दूर करण्यासाठी निवृत्तीनंतर बोलणार्‍या कारागृह अधिकार्‍यांनी ते सेवेत असतांना कोणतेही प्रयत्न का केले नाहीत ? – संपादक)