महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठाच्या परीक्षेतील प्रकार !
नागपूर – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठाकडून मुखशल्य चिकित्साशास्त्राच्या (‘एम्.डी.एस्.’च्या) अंतिम वर्ष पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे २ पेपर घेण्यात आले होते. या दोन्ही पेपरमधील तब्बल ८० टक्के प्रश्न सारखेच आहेत.
मुखशल्य चिकित्साशास्त्र अंतिम वर्षाचा अभ्यासक्रम पेपर १, पेपर २ आणि पेपर ३, अशा ३ भागांत विभागलेला असतो. पेपर एकमध्ये ‘मायनर ओरल सर्जरी’ आणि ‘मॅग्झिलोफेशियल ट्रामा’, तर पेपर दोनमध्ये ‘कॅन्सर’, ‘जी.एम्.जे. आर्थोस्कोपी’सह मुख शल्यचिकित्साशास्त्राशी संबंधित काही विषय येतात. पेपर १ हा १८ ऑगस्ट या दिवशी, तर पेपर २ हा २० ऑगस्ट या दिवशी झाला. पेपर दोनची प्रश्नपत्रिका पाहिल्यावर पेपर एकमध्ये विचारलेल्या प्रश्नांपैकी ७० ते ८० टक्के प्रश्न समानच असल्याचे आढळले. याविषयी विद्यार्थ्यांनी तातडीने आक्षेप नोंदवल्यावर परीक्षकांनी आरोग्य विद्यापिठाला सूचना केली.
३० मिनिटे विद्यार्थ्यांना बसवून ठेवल्यावर विद्यापिठाने तोच पेपर देण्याची सूचना केली.
राज्यातील दंत महाविद्यालयांतील काही विद्यार्थ्यांनी सांगितले की, पेपर १ आणि २ या दोन्ही पेपरमध्ये २५ गुणांचे २ प्रश्न, तर १० गुणांचे ५ प्रश्न येतात; परंतु पेपर दोनमध्ये ८० टक्के प्रश्न पेपर एकच्या अभ्यासक्रमानुसारच विचारले गेले होते. त्यामुळे ३ वर्षांपासून चांगले गुण मिळवण्यासाठी अभ्यास करणार्या हुशार विद्यार्थ्यांची हानी होण्याची भीती आहे. ही चूक विद्यापिठाची आहे. त्यामुळे हे पेपर पुन्हा होणार का ? असा प्रश्नही विद्यार्थ्यांनी उपस्थित केला.
‘‘परीक्षा नियमानुसारच होत आहे. २० ऑगस्ट या दिवशी काही विद्यार्थ्यांनी प्रश्न उपस्थित केल्यावर ‘मॉडरेटर’ला विचारणा केली गेली. त्यांनी ‘प्रश्नपत्रिका योग्य आहे’, असे स्पष्ट केले. प्रत्यक्षात नियमानुसार पदव्युत्तरमध्ये एका अभ्यासक्रमाचे प्रश्न दुसर्या अभ्यासक्रमाच्या पेपरमध्ये विचारता येतात. विद्यार्थ्यांना काही आक्षेप असल्यास ७ दिवसांच्या आत परीक्षा नियंत्रकाकडे ते नोंदवू शकतात. त्यावर सर्व बाजूंनी विचार करून नियमानुसार कारवाई केली जाईल.’’
– अजित पाठक, परीक्षा नियंत्रक, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक. |