यशोमती ठाकूर यांची महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे तक्रार !
अकोला – ‘राज्यातील बालसंगोपन निधी अनुदानात वाढ करण्याच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री अजित पवार सहकार्य करत नाहीत’, असा आरोप महिला आणि बालकल्याण मंत्री श्रीमती यशोमती ठाकूर यांनी येथे केला. जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात २१ ऑगस्ट या दिवशी आयोजित केलेल्या ‘अन्यायग्रस्त शेतकरी संवाद’ कार्यक्रमात त्या बोलत होत्या. याविषयी यशोमती ठाकूर यांनी कार्यक्रमात उपस्थित असलेले महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे तक्रार केली. यशोमती ठाकूर पुढे म्हणाल्या की, बालसंगोपनाचे पैसे कित्येक वर्षांपासून वाढलेले नव्हते. मुलांना ४५० रुपये मिळत होते. मी काही काळापूर्वी १ सहस्र १२५ रुपये केले आहेत; पण माझी अशी इच्छा आहे की, किमान २ सहस्र ५०० रुपये मुलांना द्यायला हवेत. आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे असा प्रस्ताव पाठवलेला आहे; पण उपमुख्यमंत्री आम्हाला पाहिजे तेवढी साथ देत नाहीत.