अफगाणिस्तानातून अमेरिकी आणि अफगाणी नागरिकांना बाहेर काढण्याइतकी शक्ती तुर्तास अमेरिकी सैन्याकडे नाही !  – अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांची स्पष्टोक्ती

नागरिकांना सुरक्षित देशाबाहेर काढण्यासाठी तालिबानशी चर्चा चालू !

लॉईड ऑस्टिन

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकी नागरिक आणि संकटात असणारे अफगाणी नागरिक यांना अफगाणिस्तानातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यापासून ते काबूल विमानतळ सुरक्षित करण्यापर्यंत आवश्यक असणारे सैन्य आणि शस्त्रास्त्रे तेथील अमेरिकी सैन्याकडे तूर्तास नाहीत, अशी स्पष्टोक्ती अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी केली. ‘अफगाणिस्तानमध्ये अडकलेले अमेरिकी नागरिक सुरक्षितपणे बाहेर पडावेत, यासाठी तालिबानशी चर्चा चालू आहे’ अशी माहितीही त्यांनी दिली.

लॉईड ऑस्टिन म्हणाले की, विमानतळावर सध्या सुमारे साडेचार सहस्र अमेरिकी सैनिक परराष्ट्र मंत्रालयाद्वारा चालू असलेल्या या मोहिमेच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. या प्रक्रियेला वेग आणण्यासाठी आणखी काही राजनैतिक अधिकारी अफगाणिस्तानात पाठवले जाणार आहेत. सध्या काबुलमध्ये चालू असलेल्या मोहिमेची व्याप्ती वाढवण्याची क्षमता आमच्यात नाही. काबुलमध्ये अजून किती काळ वास्तव्य करायचे ? आणि सैन्याला आणखी किती वेळ या परिस्थितीशी तोंड द्यायला, भाग पाडायचे?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

तालिबान अजिबात पालटलेला नाही ! – अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटले की, तालिबानसह इतर आतंकवादी संघटनांचा जगाला धोका आहे. तालिबान अजिबात पालटलेला नाही. सध्या तालिबान अस्तित्वाची लढाई लढत आहे. जगातील पालटांमुळे अफगाणिस्तानच्या तुलनेत अल् कायदा आणि तिच्या सहकारी संघटना यांचा धोका जगातील इतर भागांना अधिक आहे.