हिंदूंच्या देवतांच्या प्रतिकांना विरोध करण्यात दलितांनी वेळ न घालवता स्वतःचे प्रश्न सोडवण्याकडे लक्ष केंद्रित करावे ! – डॉ. शरणकुमार लिंबाळे

हिंदु देवतांची उपासना केल्याने जीवन आनंदी होते. साधना केल्याने जीवनाचे सार्थक होते. आजपर्यंत विविध जातींतील लोकांनी हिंदु धर्मानुसार साधना केल्याने संतपद गाठले आहे. हे दलितांनी लक्षात घ्यावे ! – संपादक

डॉ. शरणकुमार लिंबाळे

नागपूर – सरस्वती पूजन असो कि सरस्वती सन्मान, हिंदु देवतांच्या प्रतिमा आणि प्रतीके यांची हेटाळणी करण्यात आता अर्थ नाही. या प्रतिकांची अवहेलना करण्यात पूर्ण पिढी संपून जाते. हिंदु प्रतिकांना विरोध करण्यात वेळ घालवण्यापेक्षा स्वतःचे प्रश्न काय आणि ते कसे सोडवता येतील ? याकडे दलितांनी लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन ‘सरस्वती सन्मान’ प्राप्त साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी १९ ऑगस्ट या दिवशी येथे केले.  वृषाली देशपांडे आणि अधिवक्त्या स्नेहल शिंदे यांनी डॉ. लिंबाळे यांची मुलाखत घेतली.

सामुदायिक शोषणाच्या विरोधात दलित आणि सवर्ण यांनी संघटित व्हावे !

डॉ. लिंबाळे या वेळी म्हणाले, ‘‘दलित आणि सवर्ण यांच्यात दरी निर्माण झाली असून ती दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. दलितांचे प्रश्न दलितांनीच सोडवावेत, असे नाही, तर सवर्णांनीही ते सोडवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. जातीच्या पलीकडे जाऊन माणूसपणाची संवेदना का विसरता ?’’ ‘पूर्वीप्रमाणे आता व्यक्ती किंवा समाज यांच्याकडून अत्याचार होत नाहीत, तर सामुदायिक शोषण होत आहे. त्याच्या विरोधात दलित आणि सवर्ण यांनी संघटित होण्याची आवश्यकता आहे’, असे त्यांनी सांगितले. (डॉ. लिंबाळे यांना अपेक्षित हिंदूसंघटन होण्यासाठी दलित पुढाकार घेतील का ? – संपादक)